तळपती `वीज`

सुषमा स्वराज म्हणजे फक्त वक्तृत्व नव्हतं. त्यात भारतीय संस्कृतीचा त्यांनी ठरवून केलेला अंगीकार होता, सगळ्यांना आपलंसं करण्याची हातोटी होती, सर्वोच्च नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाशी कनेक्ट होता, विलक्षण अभ्यासू वृत्ती होती, परिस्थितीचा अदमास घेण्याची बुद्धिमत्ता होती, काळाबरोबर बदलत जाण्याचं धाडस होतं, पण तरीही सगळ्याला लपेटून जाणारं होतं त्यांचं अमोघ, अफाट, अस्खलित, अद्वितीय असं वक्तृत्व.
तळपती `वीज`

कपाळावर भलंमोठं कुंकू, केसांत सिंदूर, किंचित घरगुती वाटावी अशी साडीची बांधणी... आणि चेह-यावर विलक्षण आत्मविश्वास. दोन्ही बाजूला कागद आणि फायलींचे गठ्ठे, मधल्या कागदांवर स्टिकी नोट्स चिकटवलेल्या आणि स्वतः काढलेल्या नोंदीचा कागद वेगळा. एका बाजूला काचेचा ग्लास आणि डोळ्यांत `आता तुम्हाला पाणी पाजते` असा किंचित खट्याळ भाव. एवढी सगळी सामग्री जमवून त्या भाषणाला उभ्या राहायच्या आणि `अध्यक्षजी` अशी सुरवात करायच्या, तेव्हा लोकसभेतले सदस्यच काय, पण अवघा देश सावरून बसायचा. ही विद्युल्लता आता चमकणार अशी खात्रीच असायची.

अर्थात व्हायचंही तसंच. एखादी वीज कोसळावी तशी ही विद्युल्लता विरोधी पक्षांवर इतक्या जोरात कोसळायची, की भलेभले धारातीर्थी पडायचे. एक शब्दसुद्धा `फंबल` नाही, चुकीचा नाही़; अनेक जबरदस्त दाखले, अफाट हिंदीला इंग्रजी आणि संस्कृतची जोड, मार्मिक निरीक्षणं, हजरजबाबी स्वभाव, एकीकडं समोरच्याचं बीपी वाढवणारी जोरदार टीका आणि त्याच वेळी खुसखुशीत `वन लायनर्स.`... सुषमा स्वराज यांनी गेली जवळजवळ पंचवीस वर्षं हे सगळं समीकरण इतकं विलक्षण पद्धतीनं तयार केलं होतं, की त्यांचं भाषण म्हणजे डोळे, कान, विचार, हृदय या सा-यांचे ठाव घेऊन जायचं. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे नेते एकीकडं वक्तृत्वाचे मापदंड तयार करत असताना प्रमोद महाजन, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्यासारखे नेते वक्तृत्वाची स्वतःची एकेक स्कूल्स तयार करत होते. राजकारण हा विषय कनिष्ठ मध्यमवर्गीय घरांमध्ये जेव्हा फारसा चर्चेचा नसायचा, त्याच्याबद्दल पूर्वग्रह असायचे, तेव्हा सुषमाजी, प्रमोद महाजन, जेटली अशा नेत्यांमुळं नव्वदीच्या दशकात अनेकांना राजकारणाची गोडी लावली होती, हेही तितकंच खरं.

सुषमा स्वराज म्हणजे फक्त वक्तृत्व नव्हतं. त्यात भारतीय संस्कृतीचा त्यांनी ठरवून केलेला अंगीकार होता, सगळ्यांना आपलंसं करण्याची हातोटी होती, सर्वोच्च नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाशी कनेक्ट होता, विलक्षण अभ्यासू वृत्ती होती, परिस्थितीचा अदमास घेण्याची बुद्धिमत्ता होती, काळाबरोबर बदलत जाण्याचं धाडस होतं, पण तरीही सगळ्याला लपेटून जाणारं होतं त्यांचं अमोघ, अफाट, अस्खलित, अद्वितीय असं वक्तृत्व.

खरं तर त्यांच्या वक्तृत्वाची पहिल्यांदा ओळख झाली ते त्यांच्या आवाजानं. थोडा अॅब्नॉर्मल वाटावा असा आवाज. ऐंशी टक्के वेळा तारस्वरात जाणारा. सुरवातीला या आवाजाबद्दलच जास्त उत्सुकता वाटायची. याच विशिष्ट पट्टीच्या, वेगळ्या आवाजामुळं लोकसभेतल्या सगळ्या गदारोळात हा आवाज उठून दिसतोय हेही लक्षात यायला लागलं. मग हळूहळू त्या आवाजामागची धार लक्षात यायला लागली, विचार लक्षात यायला लागला, त्यातलं सौंदर्य जाणवायला लागलं आणि मग त्यांच्या वक्तृत्वाच्या प्रेमात पडण्याशिवाय तरणोपाय नव्हता. सुषमाजींचं भाषण रटाळ झालं आहे असा एकही क्षण मला जाणवलेला नाही. त्या वक्तृत्वाच्या प्रेमातच असल्यामुळंही असेल तसं. `मै तथ्य और तर्क सदनके सामने रखना चाहती हूं` असं त्यांचं वाक्य आलं, की पुढं विलक्षण रसाळ भाषण असणार याची खात्रीच असायची. `मुझे झिंझोडकर रख देती है`सारखी वाक्यरचना असो, किंवा `आय चार्ज` या शब्दाला प्रतिवाद करताना `वुई डू नॉट प्लीड गिल्टी` अशा वाक्यरचनेतलं नाट्य असो, `जटा कटा हसंभ्रमं`सारखा संस्कृत श्लोक असो, किंवा दुस-या दिवशी हेडलाईन होऊ शकणारं- आणि म्हणूनच त्यांनी दोन-तीनदा उच्चारलेला शब्दसमूह असो, त्या वक्तृत्वात विलक्षण धार होती. त्यांच्या भाषणात एखादा पंच येणार असला, की त्याच्या आधीच त्यांच्या चेह-यावर एक मिश्कील हास्य पसरायचं. डावा हात थोडा मागं करून त्या स्वतःच्या पक्षातल्या लोकांना शांत बसायला सांगायच्या आणि मग थोडा पॉज घेऊन तो पंच टाकायच्या. त्या पंचमध्ये विखार कधीही नव्हता, हे जास्त महत्त्वाचं. त्यांचं भाषण फक्त शब्दप्रचुर नव्हतं. त्या `तथ्यां`शी खेळायच्या. इतरांच्या भाषणांमधले मुद्दे अगदी नजाकतीनं बाहेर काढून त्यांच्या चिंध्या करायच्या. अनेकदा त्यांच्या भाषणात अडथळे यायचे, तेव्हा त्या अक्षरशः पदर बांधून तुटून पडायच्या. विलक्षण टिपेचा त्यांचा स्वर त्या स्वतःच काही वेळा अचानक नाट्यमयरित्या खाली आणायच्या, त्यात भावनांचं सिंचन करायच्या. त्यानंतर सभागृहांमध्ये उमटलेली शांतता ही काळीज चिरून जाणारी असायची हे आपण अनेकदा अनुभवलंय.

राजकीय मतं काहीही असोत, पण त्यांनी वक्तृत्वामध्ये, त्यातल्या जागा शोधण्यामध्ये, अनेक गाळलेल्या जागासुद्धा प्रभावी करण्यामागे त्यांचा अभ्यास होता. खरं तर वक्तृत्व कला त्यांनी स्वतः कशी फुलवली, त्या कोणते बदल करत गेल्या, प्रयत्न कसे केले याबद्दल मला विलक्षण कुतूहल आहे. एखादं पुस्तक त्यांनी लिहिलं असतं या विषयावर तर पुढच्या अनेक पिढ्यांना उपयोग झाला असता हेही खरंच.

राजकीयदृष्ट्या विचार केला, तरी विलक्षण कारकिर्द. सोनिया गांधी बळ्ळारीत उभ्या राहणार हे कळल्यावर रातोरात त्यांनी केलेला अर्ज. तेरा दिवसांमध्ये कन्नड शिकल्या, अक्षरशः जिवाचं रान केलं. त्या पराभूत झाल्या, पण त्यांनी मनं जिंकली. नंतर केंद्रीय मंत्रिपदावरून दिल्लीच्या मुख्यमंत्री बनण्यासाठी पक्षानं गळ घातली, तेव्हा त्यांना ते मान्य नसावं, पण तरीही त्यांनी हिरीरीनं ते आव्हान स्वीकारलं. त्या वेळीही भाजपचा पराभव झाला, पण पराभव होणार याची पुरेपूर कल्पना असून शेवटच्या क्षणापर्यंत खिंड लढवत राहण्याचा त्यांचा बाणा लोकांच्या मनावर ठसला.

दोन-तीन गोष्टी मला अजून उल्लेखनीय वाटतात. सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद न स्वीकारण्याच्या घेतलेल्या निर्णयात सुषमा स्वराज यांनी केलेल्या कमालीच्या विरोधाचा भाग भरपूर होता. अनेकांनी सोनिया गांधी यांना विरोध केला, पण सुषमा स्वराज यांनी `सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या, तर मी मुंडन करीन, चणे खाऊन राहीन आणि जमिनीवर झोपीन` अशी केलेली प्रतिज्ञा सोनिया गांधी यांना विलक्षण लागली असणार असं मला जास्त वाटतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या 2014च्या विजयामध्ये, 2009 ते 2014 या काळात विशेषतः सुषमा स्वराज आणि अरुण जेटली या दोघांनी तत्कालीन यूपीए सरकारबाबत जे विलक्षण विरोधाचं वातावरण केलं होतं त्यानं पाया रचला होता, हे जास्त उल्लेखनीय आहे. सुषमा स्वराज यांच्या वक्तृत्वाला या काळात कमालीची धार चढली होतीच, पण त्यांनी विलक्षण आक्रमक असा बाणा तयार केला होता, सूत्रं ताब्यात घेतली होती ती फार महत्त्वाची होती. या काळात अटलबिहारी वाजपेयी अज्ञातवासात गेले होते, लालकृष्ण अडवानी थोडे मलूल झाले होते, प्रमोद महाजन यांच्यासारखा स्ट्रॅटेजिस्ट भाजपनं गमावलेला होता; नरेंद्र मोदी, मनोहर पर्रीकर यांच्यासारखे नेते राज्यांतून केंद्रापर्यंत यायचे होते. त्या काळात सुषमा यांनी भाजपच्या पुढच्या विजयाचा पाया रचला होता, असं आपण ठामपणे सांगू शकतो. पुढं मोदी यांचं नेतृत्व इतकं पुढं येणार याचं आकलन अरुण जेटली यांना जितक्या लवकर झालं तेवढं सुषमा यांना झालं नाही, असंही मला वाटतं. अर्थात किंचित उशीर झाला तरी त्यांनी वास्तव स्वीकारलं.

खरं तर पंतप्रधानपदाच्या उमेदवार बनण्याची शक्यता असताना, एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यानं पुढं येणं आणि त्याचे कनिष्ठ सहकारी बनून राहणं हा भाग सुषमा स्वराज यांच्यासाठी थोडा कठीण नक्की गेला असणार; पण त्यांनी ते वास्तव नंतर स्वीकारलं. कोणत्याही वातावरणाला त्या `ऍडॅप्ट` झाल्या, की मग विलक्षण तळपायच्या, हे त्यांनी परराष्ट्रमंत्रिपदाच्या यशस्वी कारकिर्दीतून दाखवून दिलं. विशेषतः शेवटच्या दोन-तीन वर्षांत प्रकृती इतकी नाजूक असूनही त्यांनी त्यासाठी कोणतेही एक्स्क्युज घेतले नाहीत आणि तडफेनं काम करत राहिल्या हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गुणच होता.

2019ची निवडणूक न लढवण्याचा निर्णय हा त्यांच्या दूरदर्शीपणाचा निर्णय आहे असं एकीकडं तटस्थपणानं निरीक्षण करताना जाणवत असतानाच, सध्याच्या लोकसभेतलं त्यांचं नसलेलं अस्तित्व मनाला डाचत होतं हेही खरं. विशेषतः नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभात त्यांचं वावरणं. काय चाललं असेल तेव्हा त्यांच्या मनात? भाजपची किंवा एनडीएची सत्ता असूनही त्या मंत्री नाहीत, असं पहिल्यांदाच झालं असेल. गंमत म्हणजे सुषमा स्वराज आंध्र प्रदेशच्या राज्यपाल होणार वगैरे बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. सुषमा स्वराज यांना ओळखणा-यांना त्यात अजिबात तथ्य नाही हेही अर्थात माहीतच होतं. सिंहीण गवत खाईल?

सुषमा स्वराज ही खरी सिंहीण होती. कालच्या त्यांच्या धक्कादायक `एक्झिट`नंतर कुणी त्यांना `आयर्न लेडी` म्हटलंय, कुणी `मदर इंडिया.` बरोबरच आहेत ही विशेषणं. पण खरं सांगायचं तर ती वीज होती. ती तळपली, अनेकदा तळपली, त्यातून अनेकांना वेळोवेळी प्रकाशही मिळाला. तळपलेली वीज अचानक गायब होते तशी ही वीज गायबही झाली.... आकाशात गडगडाट होईल तेव्हा दर वेळी वर लक्ष जाणार हे तर नक्कीच! लोकसभेत ज्या आवाजाचा गडगडाट व्हायचा त्याचा आकाशातही होईलच ना?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com