24 तास डोक्यात फक्त राजकारण ठेवून वागणाऱ्यांनो काहीतरी शिका!

24 तास डोक्यात फक्त राजकारण ठेवून वागणाऱ्यांनो काहीतरी शिका!

राजू शेट्टी निवडणूक हरले असतील पण त्यांच्या खिलाडूवृत्तीचा पराभव झालेला नाही, असेच म्हणावे लागेल.

महाराष्ट्रात ज्या लोकसभेच्या लढती गाजल्या त्यात हातकणंगलेची लढत खूपच लक्ष वेधून घेणारी ठरली. या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या विरोधात शिवसेनेकडून धैर्यशील माने रिंगणात होते. लढत अतिशय अटीतटीची लढत झाली. यात थोड्या का मताने होईना पण राजू शेट्टी यांचा विजय होईल असेच सगळ्यांना वाटत होते. त्याचे कारण म्हणजे कृष्णा आणि वारणा काठावरचा ऊस उत्पादक शेतकरी नेहमी राजू शेट्टींच्या सोबत असतो. याच शेतकऱ्यांच्या बळावर शेट्टी विजयी होतील असे खात्रीशीर सांगण्यात येत होते. मात्र निकालादिवशी मात्र वेगळा कौल मिळाला. शेट्टी यांचा पराभव करत माने विजयी झाले. शेट्टी यांच्या पराजयाची बातमी येताच त्याची चर्चा सुरु झाली कारण सर्वांसाठी हा पराभव अनपेक्षित होता.

राजू शेट्टी यांचा पराभव झाल्यावर त्याची अनेक कारणे समोर आली. शेट्टींनी साखर सम्राटांच्या सोबत जवळीक केली इथपासून ते त्यांना मराठा समाजाने मते दिली नाहीत अशी कारणे सांगण्यात आली. या पराभवाची कारणे शोधली जात असतानाच राजू शेट्टी यांचा पराभव करणारे नूतन खासदार धैर्यशील माने हे राजू शेट्टी यांना भेटायला शिरोळला गेले. माने शेट्टी यांच्या घरी गेल्यावर शेट्टी आणि त्यांच्या कुटुंबियांनी जो उमदेपणा दाखवला ते पाहिल्यावर राजू शेट्टी निवडणूक हरले असतील पण त्यांच्या खिलाडूवृत्तीचा पराभव झालेला नाही, असेच म्हणावे लागेल. 

या विधानसभा निवडणुकीत जो प्रचार झाला होता तो टोकाचा होता. कार्यकर्त्यांनी  निवडणूक मुद्द्यावरून गुद्द्यांवर आणली होती. सोशल मीडियावर त्याचे पडसाद उमटत होते. शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांच्या आई निवेदिता माने यांचा पराभव करत २००९ साली राजू शेट्टी पहिल्यांदा लोकसभेत पोहचले. या पराभवानंतर माने कुटुंबाची राजकारणात पीछेहाट झाली. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांत खूपच अस्वस्थता होती. २००९ नंतर दहा वर्षांनी माने घराण्यातील उमेदवार रिंगणात आला आणि चुरस वाढली. २००९ साली शेट्टी यांच्या बाजूने स्टार प्रचारक असलेले सदाभाऊ खोत आणि उल्हास पाटील यावेळी माने यांचे स्टार प्रचारक बनले होते. त्यांनी जोरदार प्रचार केला. शेट्टी यांना टार्गेट केले. सलग दोन निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या विरोधात असणारे जयंत पाटील यावेळी शेट्टी यांच्या सोबत होते तर खोत, शिवाजीराव नाईक, वैभव नायकवडी हे विरोधात होते. विरोधी बाजूने शेट्टी यांच्यावर जी टीका झाली त्याचा योग्य प्रतिवाद त्यांना जमला नाही.

निकालानंतर चार दिवसांतच खासदार माने यांनी "शेतकऱ्यांच्या आंदोलनात राजू शेट्टी यांना सोबत घेऊ"असे विधान केले. त्यानंतर माने यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार शेट्टी यांच्या शिरोळ येथील घरी भेट दिली. या भेटीत शेट्टी यांनी खासदार माने यांना कोल्हापुरी फेटा बांधलाच पण सगळ्यात महत्वाचे शेट्टी यांच्या पत्नीने खासदार माने यांना ओवाळले. त्यांचे औक्षण स्वीकारत माने यांनी त्यांना नमस्कार केला. या भेटीत राजू शेट्टी अगदी दिलखुलास पणे संवाद साधत होते. शेट्टी यांच्या आईच्या पाया पडून माने यांनी दर्शन घेतले. यावेळी त्या माऊलीने आपल्या पोराला ज्या पोराने पराभूत केले आहे त्याला एकच सांगितले,"माझ्या पोराने जसं काम केलं तस तू कर. माझा तुला आशीर्वाद आहे." 

हा सगळा प्रसंग बघताना राजकीय वैमनस्यातून घडलेल्या अनेक घटना आठवत होत्या. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील पराभव दोन दोन पिढया विसरले जात नाहीत. काही गावात दोन पार्ट्या एवढया समोरासमोर असतात की अगदी दुसऱ्या पार्टीतला माणूस मरण पावला तरी जात नाहीत. २४ तास १२ महिने फक्त राजकारण डोक्यात ठेवून वागणाऱ्या कार्यकर्त्यांनी माने आणि शेट्टी या दिलदारपणाचा पॅटर्न समोर ठेवावा. वैर विसरावे. मी पणा सोडून द्यावा. 
शेट्टी आणि माने यांच्या भेटीत काहींना राजकारण दिसलं त्यांनी ते शोधलं. सोशल मीडियावर तसे सल्ले मिळालेही. पण कालची माने- शेट्टी भेट सहज होती. मतदारसंघातील वातावरण या भेटीने निवळले जाईल.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com