मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱयाचा राज्यव्यापी राजकीय अर्थ

उद्याच्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची फळी भाजपने कशी हळू हळू ताब्यात घेतली आहे, याचं उदाहरण म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुरूवारच्या कागल (जि. कोल्हापूर) दौऱयाकडं पाहावं लागेल. काँग्रेसच्या विचार परंपरेतले दिवंगत नेते विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होतेय आणि घाटगे यांचे पूत्र समरजित यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तबही.
मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱयाचा राज्यव्यापी राजकीय अर्थ

लिकडच्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील सुजय विखे पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, रणजितसिंह मोहिते पाटील असे तरूण नेते भाजपमध्ये दाखल झाले. देशातील अग्रगण्य शाहू सहकारी साखर कारखान्याचे समरजित घाटगे अध्यक्ष आहेत. विक्रमसिंह यांच्या काळात या कारखान्याचा देशभरात लौकिक झाला. सहकार हे काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीचे क्षेत्र. या क्षेत्रातल्या सर्वोत्तम कारखान्याचा तरूण अध्यक्ष भाजपच्या सोबत असणं, हे बदललेल्या राजकारणाचे प्रतिक आहे. 

लोकसभा निवडणुकीत आणि त्या आधीच्या महापालिका-नगरपालिका निवडणुकांमध्ये नेमकं काय चुकलं, यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी खरंच काही विचार करत असेल, तर त्यांना समरजित घाटगेंच्या विचारधारेचाही अभ्यास करावा लागेल. उद्याचं नेतृत्व उगवूच नये आणि प्रस्थापितांची चलती कायम राहावी, यासाठी असंख्य तडजोडी दोन्ही पक्षांतील जाणत्यांनी सातत्यानं केल्या. त्याचे हे परिणाम आहे.कागल तालुक्यात पाच दशके घाटगे आणि मंडलिक असे दोनच गट अस्तित्वात आहेत. घाटगेंचा गट विक्रमसिंह घाटगेंच्या नेतृत्वाखाली आणि मंडलिक गट म्हणजे दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक यांना मानणारा. दोन्ही गटांतून विस्तव कधी गेला नाही. दोन्ही गटांचे प्रमुख अंतरावर ठेवण्यात अनेकांचा राजकीय लाभ होता. 

गेल्या पाच वर्षांत आलेला नवा प्रवाह प्रस्थापित समीकरणं उधळून लावतो आहे. सदाशिवराव मंडलिक यांचे पूत्र संजय मंडलिक आज शिवसेनेचे खासदार आहेत. उद्या कदाचित समरजित घाटगे भाजप (किंवा शिवसेनेतूनही) आमदार होऊ शकतात. दोघेही राजकारण पाहात पाहात लहानाचे मोठे झालेले आहेत. येत्या दोन-तीन दशकांचा राजकारणाचा पट त्यांच्यासमोर आहे. 

पाच दशकांहून अधिक काळ दोन्ही गटांना समोरासमोर ठेवून केलेलं राजकारण पुढच्या काळात चालणार नाही, हे उद्याचा मुख्यमंत्र्यांचा दौरा सांगतोय. ते कळलं नाही, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचं पश्चिम महाराष्ट्रातील उरलंसुरलं राजकारणही धोक्यात यायला वेळ लागणार नाही. कारण, असेच गट-तट ही दोन्ही काँग्रेसची एकेकाळची बलस्थानं होती. अशा स्थानिक गटा-तटांना एकाच ताटात वाढणारी नवीच व्यवस्था भाजपने बसवलीय. ती व्यवस्था समजण्याचा आणि त्यानुसार बदल करण्याचा पुरेसा वेळ दोन्ही काँग्रेसकडे गेल्या पाच वर्षांत जरूर होता. तो वाया घालवल्याचं लोकसभा निवडणुकीच्या निकालानं दाखवलं. विधानसभेतही त्याची पुनरावृत्ती नको असेल, तर दोन्ही काँग्रेसना बदललेलं राजकारण समजून घ्यावं लागणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com