छिंदम आणि मतीन हे एकाच माळेचे मणी ! 

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक भाष्य करणारा नगरचा छिंदम असेल किंवा ऋषितुल्य अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यास विरोध करणारा "एमआयएम'चा नगरसेवक सय्यद मतीन असेल. आपण काहीही बोललो तर लोक खपवून घेत नाही. तर तुडवतात याचा अनुभव या दोघांनाही आला. म्हणूनच समाजाचे जे दैवत किंवा आदर्श आहेत त्यांच्याविषयी जीभ घसरू द्यायची नाही याची खबरदारी प्रत्येक लोकप्रतिनिधींनी घ्यायला हवी.
छिंदम आणि मतीन हे एकाच माळेचे मणी ! 

आत्मा हा अमर आहे. मृत्यूनंतर सर्वकाही क्षम्य असते असे तत्त्वज्ञान आपला हिंदू धर्म सांगतो. जे हिंदू धर्माचे तेच इस्लाम, ख्रिस्ती असेल किंवा अन्य कुठलाही धर्म. प्रत्येक धर्मात मानवतावादाला स्थान आहे. राजकारण तर असे क्षेत्र आहे, की जेथे विरोध, आरोपप्रत्यारोप अगदी टोकाचे मतभेद असतात. हे मतभेद काही भिन्न विचारसरणीच्या पक्षांतच असतात असे नव्हे. तर एखाद्या पक्षांतर्गतही असतात. 

सत्तेसाठी म्हणजेच सरपंच, जिल्हापरिषद सदस्यापासून ते आमदार, खासदार, मंत्रिपदापर्यंत स्पर्धा असते. या स्पर्धेमुळे अगदी जीवश्‍चकंठश्‍च मित्र असलेले नेतेही एकमेकांचे तोंड पाहत नाही. हे सर्व आपण पाहत असलो तरी काही मंडळी त्याला अपवाद असतात. अगदी भिन्न विचारसरणी असलेले दोन पक्षाचे नेते परममित्र असू शकतात. मैत्री आयुष्यभर जपलेले. मैत्रीत कुठेही कटुता येणार नाही. याची काळजी घेतलेले नेतेही असतात. 

भारताचा विचार केला तर येथे भिन्न विचारसरणी, विविध धर्म, प्रांत, जातीपाती पिढ्यान्‌पिढ्या गुण्यागोविंदाने नांदत आल्या. राजकारणाचा विचार केला तर भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट आदी एक ना अनेक पक्ष आहेत. या सर्वच पक्षांचे नाते जगजाहीर आहे. कम्युनिस्टांनी तर आपले तत्त्व कधीच सोडले नाही. या पक्षाने कधीच हिंदुत्वाच्या मांडीला मांडी लावली नाही. मात्र द्वेष, कटुता नव्हती. अटलबिहारी वाजपेयींचे मोठेपण डाव्या नेत्यांनीही मान्य केले. किंवा डाव्यांची तत्त्वनिष्ठा, साधेपणा भाजपमधील नेत्यांना मान्य नव्हती असेही काही समजण्याचे कारण नाही. 

मृत्यूनंतर तर झाले गेले गंगेला मिळाले. असे समजले जाते. त्याला श्रद्धांजली अर्पण केली जाते. हीच आपली संस्कृती आणि परंपराही. या परंपरेला छेद देण्याचे काम काही मंडळी जाणीवपूर्वक करीत असतात. अटलबिहारी वाजपेयींसारखा जननायक अनंतात विलीन झाल्याने संपूर्ण देश दुख: सागरात बुडाला. वाजपेयी तर असे आदर्श व्यक्तिमत्त्व होते की ते नेहमीच पक्षापलिकडे जाऊन विचार करीत. असे असताना "एमआयएम' सारख्या पक्षाचा एक नगरसेवक अटलजींना श्रद्धांजली अर्पण करण्यास नकार देतो हे संताप आणणारे आहे.

औरंगाबादमधील सर्व पक्षांनी त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली ते बरेच झाले. मतीन या नगरसेवकाला भाजप-शिवसेना नगरसेवकांनी चोपही दिला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक भाष्य करणाऱ्या नगरच्या छिंदमलाही असाच चोप दिला होता हे ही लक्षात घेणे गरजेचे आहे. मतीन असो की छिंदम याची जातकुळी एकच आहे. 

कुठे आणि कधी काय बोलावे. काय बोलू नये याचा सारासार विचार खरे तर प्रत्येकाने करायला हवा. मराठीत एक म्हण आहे, "" तोंड बोलते आणि अंग मार खाते'' या म्हणीचा अनुभव "एमआयएम'च्या या नगरसेवकाला आला असेल. तसाच अनुभव नगरच्या छिंदमलाही आला. म्हणजे छत्रपती शिवाजीमहाराज असोत की वाजपेयी. ज्या कोट्यवधी लोकांच्या हृदयात ज्यांना आदराचे स्थान आहे.

त्यांना धक्का लावण्याचे किंवा त्यांची निंदा करण्याचा अधिकार यांना दिला कोणी ? महान मानवांविषयी विष ओकणाऱ्यांना लोक कसे तुडवतात याचा अनुभव आपण पुन्हा एकदा औरंगाबादेत घेतला. खरेतर "एमआयएम' च्या नेत्यांनीही या नगरसेवकांवर कठोर कारवाई करायला हवी. 

मतीन यांच्या अशा विचित्र वागण्यावरून संताप आणि चीड निर्माण केली जात आहे. तसाच संताप काही वर्षापूर्वी महाराष्ट्रात व्यक्त केला गेला याची आठवणही आज झाली. ज्येष्ठ समाजवादी नेते ना. ग. गोरे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्याविषयी शिवसेनेच्या मुखपत्रात भोंदूना श्रद्धांजली कशासाठी ? असा जहाल लेख प्रसिद्ध झाला होता. निधनानंतर गोरेंची हेटाळणी करण्यात आली होती. त्यांना भोंदू म्हणणाऱ्यांनाही निषेध करण्यात आला होता. हे ही लक्षात घेण्याची गरज आहे. वाजपेयींच्या बाबतीत मतीन जे बोलला तेच ना. ग. गोरेंविषयी घडले असे आपण आज म्हटले तर चालेल का ? 

खरेतर मतीन याचा निषेध करावा तितका थोडाच आहे. आपण एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर जेव्हा त्याची हेटाळणी करतो. त्याला ढोंगी म्हणतो किंवा त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यास विरोध करतो. याचे तरी कसे समर्थन करता येईल. असो. 

राजकारण, समाजकारण असो की अन्य कोणतेही क्षेत्र. आपल्या आचारविचाराने समाजमनावर ज्यांनी प्रभाव टाकला. द्वेषाचे, सुडाचे राजकारण ज्यांनी कधीच केले नाही. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवून राज्याच्या देशाच्या हितासाठी आपले आयुष्य खर्ची केलेल्या त्यागी माणसांचा आपला देश. मग ती माणसं कोणत्याही धर्माची किंवा पक्षाची असोत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तरी सार्वजनिक जीवनात वाटचाल करायला हवी.

विशेषत: लोकप्रतिनिधींनी तर वाणीवर नियंत्रण ठेवायला हवे ! एखादी गोष्ट पटत नसेल तर मौन पाळणे योग्य होईल. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायलाच हवी का ? याचा विचार ज्याने त्याने करायला हवा ! तसे झाले नाहीतर "लाथो के भूत बातोसे नही मानते' असे समजून जनता वाचाळ नेत्यांना तुडवतच राहील ! त्यामुळेच जिभेवर लगाम ही हवीच !  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com