अरुण जेटली : प्रमोद महाजनांनीही ताकद जोखलेला नेता

जेटलींचे कुटुंब सधन. त्यांनी पक्षाकडून कधीही पैसे घेतले नाहीत. त्यांचा समावेश देशातल्या अत्यंत महत्वाच्या वकिलांमध्ये. ते न्यायालयात उभेरहाण्याची जी फी आकारत ती लाखात असे.जे टली आसपासच्या प्रत्येकाची काळजी करत. नोकरमंडळींच्या नावाने इन्शुरन्स काढत. त्यामुळे त्यांच्या आसपासचे लोक त्यांचे भक्‍त होत. पंचतारांकित मंडळीत या सर्व बाबींचे अप्रूप असे. अशा मंडळींचे समर्थन आपोआप मोदींच्या मागे उभे राहिले.
Arun Jaitley
Arun Jaitley

सोनिया गांधी राजकारणात नुकत्याच सक्रीय झाल्या होत्या तेंव्हाची ही गोष्ट. लोकसभा निवडणुकीचा प्रचार भरात होता. स्व.प्रमोद महाजन अमरावतीत रात्री उशीरा निवडक पत्रकारांशी चर्चा करत होते. कॉंग्रेसने नव्याने उभी राहू शकेल काय हा विषय. प्रमोदजी 'ऑफ द रेकॉर्ड' गप्पा मारत असल्याने अनेक पदर त्यांच्या शैलीत उलगडून सांगत होते. गांधी घराण्याच्या वारशाचा लेखाजोखा मांडत असताना प्रमोदजी वारंवार उल्लेख करीत होते अरूण जेटलींचा. ते काय म्हणताहेत, विदेशी जन्म असलेल्या नेत्या देशाच्या प्रमुख होवू शकतात काय, याबददलची त्यांची मते प्रमोदजी सतत सांगत होते. 

प्रमोदजींनी असे कुणालाही महत्व देणे म्हणजे जरा वेगळे होते. त्याबददल छेडताच प्रमोदजी म्हणाले : जेटली आमच्यातला सर्वात प्रभावी युवक.आणिबाणीच्या काळात त्याने दिल्ली विदयापीठात अख्खे पॅनेल निवडून आणले होते.तो भलताच हुषार आहे, अत्यंत अभ्यासू, घटना जाणणारा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचा. खरे तर त्याने तेंव्हाच राजकारणात यायचे ठरवले असते, तर तो मलाही ज्येष्ठ ठरला असता....

...अरूण जेटलीने त्याला राजकारणात आताच रस नाही, असे सांगितले. खरे तर दिल्लीतला कोणताही विदयार्थी नेता हा राजकारणात दिल्ली बाहेरच्यांच्या कितीतरी वरचा असतो. त्यांच्या ज्ञानामुळे ते अत्यंत महत्वाचे आहेत. जयप्रकाश नारायण यांच्या काळातच त्यांचे नेतृत्व सिध्द झालेआहे, त्या काळात विदयार्थी आंदोलनात सक्रीय असलेले नेतेच आता देशाचे राजकारण चालवत आहेत....असे प्रमोदजी सांगत होते.

प्रमोदजींचे शब्द खरोखरच महत्वाचे होते. जेटलींचे महत्व झपाटयाने वाढत होते, कोणत्याही वादात न गुंतता ते पक्षाचे बॅकरूम बॉयही झाले होते आणि राष्ट्रीय प्रवक्‍तेही. जनता पक्षाचे सरकार आले तेंव्हा जेटलींचे वय होते जेमतेम 23 वर्षे. तरीही त्यांनी मंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्‍त केली गेलीच. त्यांनी ठाम नकार दिला. कायदयाच्या प्रांतात मुशाफिरी करणे त्यांनी पसंत केले होते. 

भाजप या संपूर्ण कालावधीत मोठया आवर्तातून जात होता. लालकृष्ण अडवाणी हे पक्षाचे कर्तेधर्ते. त्यांनी अत्यंत हुषार ,कर्तृत्ववान तरूणांना हाताशी धरले होते. प्रमोद महाजन ,सुषमा स्वराज , उमा भारती, नरेंद्र मोदी आणि जेटली हे त्यांचे पंचप्यारे. जेटली पडदयामागे कायदा उलगडून दाखवत असत. त्यांची अन्य पक्षातील उठबस महत्वाची होती. खरे तर दिल्लीच्या वातावरणात वाजपेयी ,अडवाणींखालोखाल रूजलेले नेते होते ते जेटलीच. वाजपेयींच्या काळात जसवंतसिंग , यशवंत सिन्हा अशा मंडळींचे महत्व होते. तो काळ संपला अन मग भाजपचे विरोधी पक्षातले जे पर्व सुरू झाले त्यात जेटली हे दिल्लीतले सर्वाधिक प्रभावी नेते होते. 

सत्ता होती गुजरातेत , मध्यप्रदेशात,छत्तीसगडमध्ये अन कधीतरी कर्नाटकात. भाजपसाठी हा संपूर्ण काळ अडचणीचा होता. 2009 साली थोडक्‍यात सत्ता गेली अन मोदींनी दिल्ली जवळ करण्याची तयारी सुरू केली. या तयारीत त्यांना खरी मदत केली ती अरूण जेटलींनी. मोदींचे हनुमान अन कुशाग्र संघटक अमित शहा त्या वेळी दिल्लीत नव्हते. ती कामगिरी पार पाडली होती जेटली यांनी. 'ल्यूटन' दिल्ली मोदींना भावत नाही. पण तेथे त्यांच्या आगमनाच्या लाल पायघडया जेटलींनीच घातल्या. 

जेटली सकाळ संध्याकाळ पत्रकारांना समवेत घेवून बसत. आपण लोकनेते नाही याची त्यांना जाणीव होती. पण भारतीय समाजाबाबतची त्यांची जाणिव तीव्र होती. प्रमोद महाजनांचे दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर भाजपकडचा एकमेव विटी नेता होता ते जेटली. मोदींनी स्वत:ला चहावाला म्हणून नंतर 'ब्रॅण्ड' केले. पण आधीपासूनच त्यांच्या मनात अभिजनांबददल राग. तो लक्षात घेत जेटलींनी त्यांच्या पासून दूर राहून एक समर्थक वर्तुळ तयार केले होते. लोधी इस्टेट ही दिल्लीतील महत्वाची वस्ती. तेथे जेटलींचे सकाळची सभा असे. मॉर्निंग वॉकला येणारी मंडळी तेथे गप्पा मारत बसत. 

जेटलींचे कुटुंब सधन. त्यांनी पक्षाकडून कधीही पैसे घेतले नाहीत. त्यांचा समावेश देशातल्या अत्यंत महत्वाच्या वकिलांमध्ये. ते न्यायालयात उभेरहाण्याची जी फी आकारत ती लाखात असे.जे टली आसपासच्या प्रत्येकाची काळजी करत. नोकरमंडळींच्या नावाने इन्शुरन्स काढत. त्यामुळे त्यांच्या आसपासचे लोक त्यांचे भक्‍त होत. पंचतारांकित मंडळीत या सर्व बाबींचे अप्रूप असे. अशा मंडळींचे समर्थन आपोआप मोदींच्या मागे उभे राहिले. माध्यमांच्या मालकात जेटलींची उठबस,पत्रकारांशी मैत्र. पक्षातल्या अंतर्गत विरोधकांना शांत करत मोदी दिल्लीत सक्रीय झाले. त्यापूर्वी मनमोहन सरकार नाकर्ते तर आहेच, पण भ्रष्टदेखील, हे राज्यसभेचा विरोधी पक्षनेता या नात्याने जेटलींनी देशासमोर ठसवले होते.

2 जी घोटाळा असेल किंवा कोळसा खाणी, जेटली त्यांच्या अर्थगामी कायदाज्ञानाने ही राजवट भ्रष्ट आहे हे समजावून सांगण्यात कमालीचे प्रभावी ठरले होत. सुषमा स्वराज यांच्यासारखे घरगुती वाटणारे नेतृत्व जनतेचे सभागृह असलेल्या लोकसभेत अन जेटली अभिजनांच्या राज्यसभेत. दोघेही तळपत होते अन मोदींच्या नेतृत्वातले भाजप सरकार सत्तेत येण्याचा मार्ग प्रशस्त होत होता. जेटलींना पैशात काडीचाही रस नसल्याने न खाउंगा न खाने दुंगा वाल्या मोदींना ते जवळचे आहेत, हे दाखवण्यात अडचण नसे. मोदी सत्तेत आले अन पहिल्या सरकारमध्ये जेटली अत्यंत महत्वाचे झाले. ते स्वाभाविक होते. फसलेली आर्थिक धोरणेअसोत ,जेटली त्यात होतेही आणि नव्हतेही. 

त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. जेटलींनी त्याचा योग्य तो अर्थ घेतला होता. निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.सन 2019च्या निवडणूक प्रचारात जेव्हा भाजप काहीसे माघारी पडले आहे हे त्यांच्या लक्षात आले तेंव्हा जेटली घरातूनच प्रचारयंत्रणा राबवू लागले. सर्व पक्षीय मैत्री विशेषत: अन्य पक्षातील तरूण नेत्यांकडे जेटलींचे वडिलपणाच्या नजरेतून लक्ष असे. ते खाजगीत जेटली आजारपणातही जे मुददे समोर आणताहेत ते महत्वाचेच आहेत असे सांगत असत. मोदी पुन्हा निवडून आले. पण जेटली मात्र पैलतीराकडेच पहात होते. लठठपणा कमी करण्यासाठी केलेली शस्त्रक्रीया ,मधुमेह अशी अनेक कारणे सांगितली जात होती.मुंबईतले काही तज्ज्ञ डॉक्‍टर सारेच कमालीचे कठीणआहे हे गेल्या दोन वर्षापासून सांगत होते. अखेर जेटली नावाचे एक पर्व संपले. 
मृणालिनी नानिवडेकर 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com