Blog About Crowd Mentality | Sarkarnama

झुंडीचे मानसशास्र त्यांना समजले आहे काय?

संतोष शाळिग्राम 
सोमवार, 22 एप्रिल 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेच तेच का बोलत आहेत? थोडी विकास कामे सांगून नंतर राष्ट्रवाद, राष्ट्रसुरक्षा आणि पाकिस्तानवर हल्ला याच मुद्द्यांवर त्यांचा भर आहे. मग लोकांना त्याच त्याच भाषणांचा वीट येत नसेल का? या गोष्टींचा असा विचार ते करीत असतील की नाही, असेही वाटत होते. पण ते असे का करताहेत, याचे उत्तर शेवटी ग्युस्ताव ल बॉं यांच्या अभ्यासात सापडले. बॉं हा फ्रान्समधील विद्वान होता. त्याने 'द क्राऊड' या पुस्तकात प्रेरित जमावाच्या मानसिकतेची मांडणी केलेली आहे. या प्रेरित जमावाला झुंड देखील म्हणता येईल.

लोकसभेची निवडणूक रंगात आली आहे. काही ठिकाणी मतदान झाले, तर काही ठिकाणी व्हायचे आहे. परंतु या निवडणुकीतील प्रचारा दरम्यान जाणवलेल्या दोन गोष्टी. एक, सर्वच पक्षांनी मोदींना केलेले लक्ष्य आणि दुसरे म्हणजे भारतीय जनता पक्षाने तेच तेच मुद्दे वापरून केलेला प्रचार. मोदींना होणारा विरोध हा समजण्यासारखा आहे. कारण जनतेवर प्रभाव पाडून एकहाती सत्ता मिळविलेली ही व्यक्ती आहे. पण दुसऱ्यांदा सत्ता मिळविण्यासाठी भाजपकडून तेच तेच मुद्दे का वापरले जात आहेत, हा प्रश्‍न होता. विचार करणाऱ्या प्रत्येकाचे हेच म्हणणे होते की प्रचारात, भाषणांमध्ये नवे मुद्दे का नाहीत? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेच तेच का बोलत आहेत? थोडी विकास कामे सांगून नंतर राष्ट्रवाद, राष्ट्रसुरक्षा आणि पाकिस्तानवर हल्ला याच मुद्द्यांवर त्यांचा भर आहे. मग लोकांना त्याच त्याच भाषणांचा वीट येत नसेल का? या गोष्टींचा असा विचार ते करीत असतील की नाही, असेही वाटत होते. पण ते असे का करताहेत, याचे उत्तर शेवटी ग्युस्ताव ल बॉं यांच्या अभ्यासात सापडले. बॉं हा फ्रान्समधील विद्वान होता. त्याने 'द क्राऊड' या पुस्तकात प्रेरित जमावाच्या मानसिकतेची मांडणी केलेली आहे. या प्रेरित जमावाला झुंड देखील म्हणता येईल. म्हणजे या झुंडीचे मानसशास्त्र भाजप नेत्यांना समजले आहे का? म्हणूनच ते त्याच त्याच मुद्द्यांच्या आधारे मतदारांना प्रभावित करू पाहात आहेत का?... त्यांच्या भाषणांचा अभ्यास केला, तर कदाचित त्यांना जमावाचे मानसशास्त्र समजले असावे. 

एकट्याने तार्किक विचार करणारी व्यक्ती जमावात आली की ती विचारशील राहात नाही. बॉं यांच्या मते, झुंडीला बौद्धिक विचार नसतो, त्याची बौद्धिक जाणीव देखील लुप्त होऊन जाते. तो समूहात वा जमावात सामील झाला की संमोहित होऊन जातो. असा जमाव एकजिनसी करून तो एका विचाराने प्रेरित करणे सहज होऊन जाते. या तंत्राचा वापर आताच नव्हे; तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून होत आला आहे. 

झुंड एकदा बांधली की तिच्या मनावर ताबा घेऊन त्यांच्या डोक्‍यात कोणत्याही विचारांची पेरणी सोपी होते. त्यासाठी चित्र, प्रतिके आणि शब्दप्रतिमांचा वापर चपखलपणे केला जातो आणि यापूर्वी देखील केला गेला आहे. कोणत्याही राज्यक्रांतीच्या मुळाशी हेच तंत्र असल्याचे दिसते. भारतीय जनमानसासाठी पहिल्यांदा वापरलेली गेलेली शब्दप्रतिमा म्हणजे स्वातंत्र्य. त्यानंतर लोकशाही, समाजवाद, साम्यवाद अशा अनेक शब्द आणि चित्रप्रतिकांचा वापर करण्यात आला. त्यात आता नव्याने भर पडली ती 'राष्ट्रवाद' या शब्दाची. 

झुंड ही नेहमी तिला बांधणाऱ्या नेत्याच्या चरणी निष्ठा अर्पण करीत करते. मग त्याने उच्चारलेला प्रत्येक शब्द एवढा ताकदवान बनतो की तो झुंडीच्या काळजात जातो. तो जमाव मग कितीही शिकलेला असला, तरी एकाच पद्धतीने, एकाच दिशेने विचार करू लागतो. स्वप्ने दाखवणारा नेता जसजसा कल्पनाविस्तार करीत राहतो, तशी झुंड त्या कल्पनांभोवती फिरत राहते. या भारलेल्या जमावाच्या भावनांवर स्वार होण्यासाठी कल्पनांच्या असंख्य छटा वापरल्या जातात. त्यातून नेता आपल्याला हवा तसाच एकनिष्ठ, एकजिनसी समुदाय तयार करीत असतो. एकच मुद्दा वारंवार आणि प्रभावीपणे रुजविला जातो. सामान्यांच्या मनातील खदखद चेतविण्यासाठी आवेशपूर्ण भाषेचा उपयोग करून इप्सिस साध्य केले जाते. ल बॉं यांनी मांडलेले हे सैद्धांतिक तंत्र आजचे नव्हे; त्याचा वापर होत आलेला आहेच. 

यापूर्वीही त्याचा अनेक पक्षांनी वापर केलेला आहेच. पण भाजपच्या आताच्या प्रचारामुळे या तंत्राची प्रकर्षाने जाणीव झाली. मोदी असोत की फडणवीस, त्यांची भाषणे ऐकली की बॉं यांची 'थियरी' पटू लागते. तसेच एकच भाषण सर्व सभांमध्ये का केले जाते? विकासकामे संयत भाषेत आणि राष्ट्रवाद, राष्ट्रीय सुरक्षा, पाकिस्तानवर हल्ले यांवर तावावाने का बोलले जाते, याचे उत्तरही मिळते. जमावाच्या भावनांवर स्वार होण्याचा हा प्रयत्न होत असला, तरी त्यांना हवा असलेला परिणाम कितपत साधला जाईल जातो, हे मात्र आपल्याला २३ मे रोजी पाहावे लागणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख