मोदी-शहा आणि भागवतांच्या पोतडीत दडलयं काय?

मोदी-शहा आणि भागवतांच्या पोतडीत दडलयं काय?

मोदी आणि शहा या दोघांनी राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीबाबत चुणूकही लागू दिलेली नाही. फक्त या वेळी नव्ह तर या पूर्वी देखील ही जोडी इतरांचे राजकीय अंदाज चुकविण्यात आतापर्यंत पूर्णपणे यशस्वी झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून आदित्यनाथ येतील, असा अंदाज कोणीच व्यक्त केला नव्हता. त्यामुळे राष्ट्रपती पदासाठी मोदी काय करतील, याचा नेम नसल्याचे बोलण्यात येते.

"कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर "कौन बनेगा राष्ट्रपती', या प्रश्‍नाचे उत्तर देशातील जनता शोधत आहे. जो तो आपल्या पद्धतीने यासाठी तर्क लढवित आहे. कोणालाच कसलाच अंदाज येत नाही. सर्वसामान्य मंडळी सोशल मिडियातून फिरत असलेल्या नावांवर चर्चा करत आपला वेळ दवडतात. अर्थात यात चूक सर्वसामान्यांची नाहीत. तर जे खासदार म्हणून राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान आहेत, ती मंडळी सुद्धा संभ्रमावस्थेत आहेत. याबाबत एक किस्सा सांगितलाच पाहिजे. राज्यातील एका भाजप खासदाराला राष्ट्रपतीपदासाठी भाजप कोणाचे नाव पुढे करणार, याबाबत प्रश्‍न विचारला होता. तर या खासदाराने हे नाव फक्त दोघांनाच म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनाच माहिती असेल, असे उत्तर दिले.

 
"अहो, हे उत्तर तर सामान्य जनतेलाही माहिती आहे. तुम्ही नवीन माहिती द्या. खासदार म्हणून तुम्ही तुमच्या पक्षातील इतर खासदारांशी या राष्ट्रपती निवडणुकीबाबत चर्चा करत असालचं. त्या चर्चेचा सूर काय आहे,'' असा प्रतिप्रश्‍न या खासदाराला यावर विचारला. तर ते म्हणाले, "असते ना. आमच्यात चर्चा सुरूच असते...विषय हाच असतो की आपल्याला काहीच कसे माहीत नाही...,'' या उत्तरावर हास्य पिकले. पण कोणालाच काहीच माहीत नसल्याचे आणखी पक्के झाले. 

हा किस्सा मी माझ्या दिल्लीतील पत्रकार मित्राला सांगितला. तर त्यानेही त्याचा अनुभव सांगितला. त्याने हाच प्रश्‍न महाराष्ट्रातील एका केंद्रीय राज्यमंत्र्याला विचारला होता. तर या मंत्र्यांने राष्ट्रपती पदाचा उमेदवार कोण असेल, याची माहिती तिघांनाच आहे, असल्याचे या मंत्र्याचे म्हणणे होते. "मोदी, शहा आणि आकाशाकडे बोट करून प्रत्यक्षात असला तर देव अशा या तिघांनाच राष्ट्रपती कोण होणार याची आजच्या घडीपर्यंत पूर्वकल्पना आहे,' अशी या मंत्र्याची माहिती होती. एकूणच काय तर राष्ट्रपती कोण होणार, या प्रश्‍नाचे उत्तर फारच कमी लोकांना माहिती आहे. या मंत्र्याने तिघांनाच कल्पना आहे, ही जी माहिती सांगितली ती बरोबर आहे. या तिघांत देवाऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा समावेश करावा लागेल. मोदी, शहा आणि भागवत हे त्रिकुटच भारताचा भावी राष्ट्रपती निवडणार आहे. 

राष्ट्रपतिपदाची निवडणूक जाहीर झाली आहे आणि तरीही अधिकृत उमेदवारांचा थांगपत्ताही लागू नये, हे मिडियाचे अपयशच आहे. "सहमती'चा उमेदवार ठरविण्यासाठी भाजपने अरुण जेटली, राजनाथसिंह आणि व्यंकया नायडू या तीन मंत्र्यांना विरोधी पक्षांशी चर्चा करण्यासाठी नियुक्त केले आहे. इतर पक्षांतील नेत्यांनी भाजपचा उमेदवार कोण असेल, असा प्रश्‍न या तिघांना विचारला तर त्यांनाही सांगता येणे अवघड होणार आहे. रोज नवे नाव येत आहे. शिवसेनेने तर जणू काही नावे सुचविण्याचा मक्ताच घेतल्याचे दिसते. मराठी माणूस म्हणून शरद पवार, नंतर मोहन भागवत आणि आता कृषी संशोधक स्वामिनाथन यांचे नाव सेनेने सुचविले आहे. अमिताभ बच्चन, रतन टाटा, नारायणमूर्ती यांच्यापासून ते मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांचे नाव नव्याने चर्चेत आले.

झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुरमू यांच्या नावाची ग्वाही सोशल मिडियातून फिरली. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पुढील काही दिवस दिल्ली न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. अयोध्येतील बाबरी मशीद प्रकरणी पुन्हा खटला सुरू झाल्याने लालकृष्ण अडवानी यांचे नाव मागे पडल्याचे माध्यमांनी जाहीर केले. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होईल, असेही काही मंडळी सांगतात. एकूणच मोदी आणि शहा या जोडीने नाव निवडण्यात कमालीची गोपनीयता राखली आहे. 

कॉंग्रेसच्या काळात सोनिया गांधी या इतर ज्येष्ठ मंत्र्यांशी अनौपचारीक चर्चा करायच्या. त्यातून काही ठोस नावांवर चर्चा व्हायची. त्यामुळे निवडणाऱ्यांनाही अंदाज यायचा. यातील एखाद्या नावावर शिक्कामोर्तब व्हायचे. "आम्हीच, हे नाव आधी जाहीर केले होते,'अशी एक्‍सक्‍लुजिव्ह बातमी देण्याचीही संधी काहींना मिळायची.

 
मोदी आणि शहा या दोघांनी मात्र राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत चुणूकही लागू दिलेली नाही. फक्त या वेळी नव्ह तर या पूर्वी देखील ही जोडी इतरांचे राजकीय अंदाज चुकविण्यात आतापर्यंत पूर्णपणे यशस्वी झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून आदित्यनाथ येतील, असा अंदाज कोणीच व्यक्त केला नव्हता. त्यामुळे राष्ट्रपती पदासाठी मोदी काय करतील, याचा नेम नसल्याचे बोलण्यात येते. 
या निवडणुकीबाबत मोदींच्या आधीच्या वक्तव्यांची आठवण येते.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी "आप की अदालत'मध्ये रजत शर्मांनी मोदी यांना थेट प्रश्‍न विचरला होता. "तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर अडवाणी यांना तुम्ही राष्ट्रपती करणार का, या शर्मा यांच्या प्रश्‍नावर टाळ्याही पडल्या. टाळ्या थांबल्यानंतर मोदी म्हणाले,""जिन्हो नें मुझे एक नेता बनाया है. मै उन्हे क्‍या बनाऊंगा,' असे गोलमाल उत्तर दिले होते. म्हणजे तेव्हाही मोदी यावर किती सावध होते, हे दिसून येते. म्हणूनच सध्या सर्वांची अडचण झाली आहे. 

या नावांपेक्षाही ही निवडणूक इतर अर्थानेही महत्त्वाची आहे. हे समजून घेतले पाहिजे. देशात लोकसभेत पहिल्यांदाच उजव्या समजल्या जाणाऱ्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले आहे. इतर राज्यांतही भाजपची सत्ता आहे. म्हणजे भाजप स्वतःच्या इच्छेनुसार राष्ट्रपतिपदाचा उमेदवार निवडू शकतो. या आधी सेक्‍युलर, डाव्या, विचारांनी उदारमतवादी समजल्या जाणाऱ्या पक्षांची सत्ता होती. भाजपचे या आधी सरकार होते. तेव्हा वाजपेयी सरकारने आपल्या उजव्या विचारांना दूर सारत ज्येष्ठ संशोधक डॉ. कलाम यांचे नाव राष्ट्रपतिपदासाठी पुढे करून सर्वांना धक्का दिला आहे. असा "धक्का' देण्याची ही वेळ नाही. उलट देशाचा गौरवशाली इतिहासाशी परंपरेचा अभिमान बाळगणारा राष्ट्रपती भाजप नेमू शकतो, असा आता उजव्या विचारवंतांचा आग्रह आहे. 

कॉंग्रेसमधील नेत्यांचा बहुतांश वेळा"रबर स्टॅंप' राष्ट्रपती नेमण्याकडे कल होता. याबाबत उजवे विचारवंत आता उदाहरणे देत आहेत. राष्ट्रपतींनी स्वतःहून काही निर्णय घेऊ नये आणि सरकारला विचारल्याशिवाय जाहीर कार्यक्रमाही स्वीकारू नयेत, अशी कॉंग्रेसची नेहरूंपासून "परंपरा' असल्याचे या विचारवंतांचे म्हणणे आहे. कॉंग्रेसची सत्तेची जरब अशी होती की पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला उपस्थिती लावल्याबद्दल त्यांना दोष देण्यात आला होता.

नेहरू यांनी प्रसाद यांच्या या वर्तनाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रपतींच्या अशा वर्तनामुळे देशाची बदनामी होत असल्याचा सूर नेहरू यांचा होता. याउलट प्रसाद यांनी सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार हा आपल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीचा वारसा असल्याने त्यात चूक काय, अशी भूमिका घेतली होती. उजव्या विचारवंतांच्या म्हणण्यानुसार या परंपरेशी नाळ सांगणारा नवा राष्ट्रपती देशाला हवा आहे. 

या उजव्या विचारवंतांचे मोदी ऐकतीलच असे नाही. मोहन भागवत या साऱ्या निर्णय प्रक्रियेत असल्याने खरेच राष्ट्रपती कशाच्या आधारावर निवडला जाईल, यावर मोदी सरकारची पुढील दिशा समजू शकेल. मोदी "विकासाचे मॉडेल' म्हणून जे जनतेसमोर मांडतात त्यात गोहत्याबंदी देखील येते, हे आता कळून चुकले आहे. हिंदूच्या धार्मिक संवेदना जपण्याचा अजेंडा मोदींना सोडलेला नाही. त्यामुळेच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत संघाच्या पठडीतील, भाजपमधील कर्मठ नावे येतात का, याकडे देशाचे लक्ष असेल. तोपर्यंत तरी सोशल मिडियात फिरत असलेल्या नावांवर चर्चा सुरूच ठेवावी. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com