Modi fadnavis
Modi fadnavisSarkarnama

लोकसभेबरोबर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक !

विधानसभा निवडणुकीपासूनच दोन्ही पक्षांतील सुरू झालेला विसंवाद आता वाढतच चालला आहे. शिवसेनेने सत्ता असतानाही विरोधी पक्षाची भुमिका बजावण्यास सुरवात केली.

उत्तर प्रदेशातील निवडणुकीतील विजयानंतर भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली असून, लोकसभा निवडणुकीसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका घेण्याबाबतचा विचार भाजपच्या प्रदेश नेते करू लागले आहेत. त्यासाठी राज्यभर राजकीय सर्वेक्षण करण्यास करण्याची सूचना त्यांनी दिली असल्याची चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांत सध्या सुरू आहे.

तसे झाले तर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक मुदतीपूर्वी किमान सहा महिने होऊ शकते. भाजनपची देशात सत्ता आल्यानंतर, महाराष्ट्रात शिवसेनेची 25 वर्षांची युती तोडून भाजपने स्वबळावर निवडणुका लढवित सर्वांधिक जागा मिळविल्या आणि राज्यात सरकार बनविले. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे एकमेकांविरोधात निवडणुका लढविल्या.

भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरल्याने त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केली. पहिल्या महिनाभर दोघांत वाद झाला. शिवसेनेने विरोधी पक्ष म्हणून दावा सांगितला होता. महिन्याभराच्या वादानंतर त्यांची युती झाली. ते एकत्रितरित्या सत्तेवर आले. मात्र, विधानसभा निवडणुकीपासूनच दोन्ही पक्षांतील सुरू झालेला विसंवाद आता वाढतच चालला आहे. शिवसेनेने सत्ता असतानाही विरोधी पक्षाची भुमिका बजावण्यास सुरवात केली.

त्यांच्यातील वाद मिटण्याची चिन्हे दिसून येत नसल्याने पुन्हा निवडणुकांच्या माध्यमातून स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा विचार भाजपच्या नेत्यात जोर धरू लागला आहे. विधानसभा निवडणुका मुदतीपेक्षा लवकर घेतल्यास त्याचा फायदा होईल का, याचा प्राथमिक अंदाज बांधण्यासाठी त्यांनी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

राज्यातील मुख्य विरोधी पक्षांची भुमिका असलेले कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष सध्या गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांना कर्जमाफी हा विषय सोडला, तर त्यांनी अन्य कोणत्याही विषयांवर भर दिल्याचे दिसून येत नाही. भाजपतर्फे जे वेगवेगळे विषय मांडले जात आहेत, त्याच्या विरोधी प्रतिक्रिया व्यक्त करणे सोडल्यास त्यांचा काहीही ठोस कार्यक्रम नसल्याचे जाणवते. जनमानसातही त्यांच्याबद्दल सकारात्मक मत तयार करण्यासाठी ते फारसे प्रयत्नशील असल्याचे दिसून येत नाही.

शिवसेनेची ताकद मुंबई, कोकण, मराठवाडा परिसरात आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने त्यांना तोडीस तोड उत्तर दिले. त्यांना शिवसेनेपेक्षा दोन जागा कमी मिळाल्या, तरी त्यांची ताकद निश्‍चित वाढली आहे. मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रात शिवसेनेचे आमदार असले, तरी त्यांच्या पक्षातील सत्तेच्या किल्ल्या मुंबईतील नेत्यांच्याच हाती आहेत. त्याबाबतची नाराजी शिवसेनेत असल्याचे दिसून येते. भाजपची चाल ओळखत शिवसेनेने मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या बाजूने संघर्षाची भुमिका घेतली आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता संघर्षाची भुमिका घेतली आहे. या पक्षाला भाजपला पश्‍चिम महाराष्ट्रात उपयोग झाला होता. आता निवडणुकीत राजकीय युतीसाठी भाजपला म्हणावा असा चांगला राजकीय मित्र शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे त्यांना स्वबळावरच सर्व विरोधकांशी लढावे लागेल.

भाजप देशपातळीवर मोठा पक्ष झाल्याने, तसेच विरोधक विस्कळीत असल्याने त्यांनी राज्यातील विरोधकांच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामध्ये कोणत्या जागा मिळू शकतील. अन्य पक्षातील कोणते नेते भाजपमध्ये येऊ शकतील, याची चाचपणी करण्यास त्यांनी सुरवात केली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षातील सुमारे तीस ते चाळीस उमेदवार भाजपमध्ये आले व ते आमदार झाले. त्याच पद्धतीने आणखी काही नेते मिळू शकतील, याचा अंदाज भाजपचे प्रदेशातील श्रेष्ठी घेतील. त्याच अनुषंगाने राज्यातील राजकीय वातावरणाचे मतदारसंघनिहाय सर्वेक्षण करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे.

या सर्वेक्षणानंतर त्यांना कोणत्या ठिकाणी कमकुमत स्थिती आहे, कोठे थोडीफार ताकद लावल्यास जागा जिंकता येऊ शकेल, याचा पक्षनेत्यांना अंदाज येईल. त्यामुळे लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीची तयारी त्यांनी इतरांपेक्षा अगोदर सुरू केल्याचे लक्षात येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com