खेड-आळंदीत युतीधर्म संकटात : भाजपने केली बंडखोरांची हकालपट्टी

खेड-आळंदीत युतीधर्म संकटात : भाजपने केली बंडखोरांची हकालपट्टी

आळंदी : खेड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार व विद्यमान आमदार सुरेश गोरे यांच्या विरोधात भाजपचे तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी भरल्याने शिवसेनेपुढे आव्हान निर्माण झाले आहे. खेड-आळंदीतील भाजपचे पदाधिकारी युती धर्म निभावण्याऐवजी अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांचा प्रचार उघडपणे करत आहेत.

शिवसेनेने याबाबत तक्रार केल्यानंतर भाजपने देशमुख यांची पक्षातून काल हकालपट्टी केली आहे. त्यानंतर काही फरक पडणार का, याबाबत तर्क लावण्यात येत आहेत.

खेड विधानसभा मतदारसंघात नेहमीच कुणी ना कुणी निष्ठावंत बंडखोरी करत असतो. यंदाच्या निवडणुकीतही हीच परिस्थिती आहे. तरीही आलात तर तुमच्यासोबत, अन्यथा तुमच्याशिवाय, याप्रमाणे सध्या उमेदवारांचा प्रचार सुरू आहे.

राष्ट्रवादीकडून माजी आमदार दिलीप मोहिते, शिवसेनेकडून आमदार सुरेश गोरे आणि अपक्ष उमेदवार भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांच्यात जोरदार लढत सुरू आहे. ठिकठिकाणी सभा, प्रचार फेरी घेतल्या जातात. मात्र, मतदारांमध्ये चर्चा होते ती सर्वाधिक युतीच्या कट्टीचीच. भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी युतीचे अधिकृत उमेदवार सुरेश गोरे यांच्याऐवजी सध्या तरी अतुल देशमुख यांच्या पाठीशी ठाम असून निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावरून देशमुख यांचा प्रचार सुरू केला. काही जण थेट पदयात्रेत सहभागी होऊन प्रचार करत आहेत.

भाजपचे पक्षातील तालुका आणि शहर पातळीवरील पदाधिकारीही खालच्या कार्यकर्त्यांना आपल्याला पक्षाचा आदेश आला असून देशमुख यांचे काम करायचे, असे सांगत आहेत. यामुळे देशमुख यांच्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी राहिली आहे. एवढेच काय जिल्हा परिषद सदस्य आणि ज्येष्ठ नेते शरद बुट्टे हेही देशमुख यांच्यासाठी जाहीर सभा घेत आहेत. यामुळे युतीचे उमेदवार सुरेश गोरे हे चिंतेत आहेत. तरीही आलात तर बरोबर, नाही तर तुमच्याशिवाय याप्रमाणे गोरे यांनीही प्रचार नेटाने सुरू ठेवलाय.

बंडाचा फायदा कोणाला होणार?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नुकतीच खेडची सभा जोरात झाल्याने सुरेश गोरे सुसाट सुटले आहेत. युतीच्या कट्टीमुळे राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप मोहिते यांना कितपत फायदा होईल याचे गणित चौकाचौकात नागरिकांमध्ये चर्चिले जात आहे. राज्यात युती धर्म न पाळणाऱ्या बंडोबांना थंड करण्याचे काम सुरू आहे. असा प्रयत्न खेड आळंदीसाठी होताना दिसत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com