bjp`s survey shows four mp`s in danger zone | Sarkarnama

खासदार धोत्रे, शिरोळे, बनसोडे आणि पूनम महाजन तिकिट वाटपात `डेंजर झोन`मध्ये?

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 20 जानेवारी 2019

भाजपमधील सर्वेक्षणाने विद्यमान खासदारांच्या पोटात गोळा आहे. त्यातही चार लोकसभा मतदारसंघातील खासदार धोक्यात असल्याची चर्चा आहे. 

मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास काही दिवसांचा अवधी असताना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची आघाडी होऊन जागा वाटपाचा तिढा सुटल्यात जमा आहे. दुसरीकडे भाजप आणि सेनेत जागावाटपात अद्याप चर्चाही सुरू नाही.

शिवसेना आणि भाजप यांच्या युतीचे घोंगडे भिजत पडले असताना भाजपची सारी मदार लोकसभा मतदारसंघात दर महिन्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणावर आहे. मतदारसंघातील राजकीय वातावरण, स्वपक्षातील तुल्यबळ उमेदवार, विरोधी पक्षातील ताकदवर उमेदवार यांच्याशी निगडीत सर्वेक्षण केल्यावर त्यातून आलेल्या शिफारशीनुसार भाजपमध्ये तिकीट वाटप आणि उमेदवार अंतिम केले जातात. त्यामुळे अद्याप युती झालेली नसताना शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या लोकसभा मतदारसंघात उमेदवार शोधण्याचे भाजपपुढे आव्हान उभे राहिल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येते. 

चार मतदारसंघांत सर्वाधिक फटका? 
सोलापूर, अकोला, उत्तर मध्य मुंबई, पुणे आदी लोकसभा मतदारासंघातील विद्यमान सदस्यांना धोका असल्याचे सर्वेक्षणात समोर आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे येथील उमेदवार बदलण्याबाबत भाजप पक्षश्रेष्ठी विचार करू शकतात, असे सांगितले जाते. सोलापूरमध्ये शरद बनसोडे, पुण्यात अनिल शिरोळे आणि अकोल्यात संजय धोत्रे यांना या सर्वेक्षणाचा फटका बसण्याची शक्यता आहे. उत्तर-मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांनाही सर्वेक्षणात कमी पसंती मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

मागील लोकसभा निवडणुकीत भाजप -शिवसेनेची युती होती. विधानसभेला युतीचा काडीमोड झाला. मात्र नरेंद्र मोदी यांच्या लाटेत शिवसेना-भाजपला घवघवीत यश मिळाले. युतीत लढताना भाजप लोकसभेला 26 तर शिवसेना 22 असे जागा वाटपाचे सूत्र होते. मात्र 2019 च्या निवडणुकीत अद्याप युती झालेली नाही. तसेच मागील चार वर्षात देशातील राजकीय वातावरण बदलत आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या ताब्यातील जागासाठी उमेदवार शोधण्यासाठी भाजपला कसरत करावी लागत आहे. या मतदारसंघात भाजपला तुल्यबळ उमेदवारांचा शोध घेताना आयारामांना चुचकारावे लागत आहे.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आदी पक्षांतील ताकदवर नेत्यांना पक्षात घेण्याची भाजपची रणनीती आहे. यासाठी सर्व्हेत ज्या उमेदवाराचे पारडे जड असेल त्या उमेदवाराला पायघडया घालण्याचे धोरण राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र मागील निवडणुकीत इतर पक्षातून आलेले उमेदवार यावेळेस भाजपमधूनच निवडणूक लढवतील याचा नेम नाही, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख