भाजपचे राजेंद्र मस्के म्हणतात बीड क्षीरसागर मुक्त करु ...

राजेंद्र मस्के यांनी बोलविलेल्या बैठकीला भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या कामांचे फुकटचे श्रेय क्षीरसागर घेत असल्याचा आरोपही मस्के यांनी केला.
भाजपचे राजेंद्र मस्के म्हणतात बीड क्षीरसागर मुक्त करु ...

बीड : महायुती सरकारच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड मतदारसंघात विविध विकासाच्या योजना राबवण्यासाठी भरीव निधी दिला.

बीडसह मराठवाडा पाणीटंचाई मुक्त करण्यासाठी वॉटरग्रीड  योजना मंजूर केली. या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न दोन दिवसात मंत्रीपद मिळवलेले क्षीरसागर करत आहेत, असा आरोप करत सामान्यांच्या पाठबळावर बीड क्षीरसागर मुक्त करु अशी आरोळी भाजपचे राजेंद्र मस्के यांनी ठोकली आहे.

राजेंद्र मस्के हे भाजपचे नेते असून ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे संचालकही आहेत. त्यांच्या पत्नी जयश्री मस्के या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा आहेत. युतीत बीडची जागा शिवसेनेची असून या ठिकाणी जयदत्त क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली  आहे. 


एकिकडे क्षीरसागरांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची फेरी सुरु असतानाच मस्के यांनी समर्थकांची बैठक बोलावून ही घोषणा केली. विशेष म्हणजे बैठकीला भाजपचे पदाधिकारीही उपस्थित होते.

विकासाच्या नावाखाली बीड शहराचे तीन - तेरा वाजले असून कामे न करता शासनाकडून येणारा प्रत्येक कामाचे श्रेय घेण्याचे महापाप क्षीरसागर करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. सर्वसामान्य मतदारांच्या प्रगतीच्या वाटेत अडथळे निर्माण करणाऱ्या क्षीरसागरांना जनता धडा शिकविण्यासाठी सज्ज आहे.  

महायुतीकडून भाजपा मार्फत उमेदवारी मागितली होती. परंतु, दुर्दैवाने ती मिळाली नाही त्यामुळे बीड मतदारसंघातही बंडखोरी करून सामान्य जनतेच्या हितासाठी क्षीरसागर मुक्तीचा लढा आपण लढणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

राज्यात युतीचा पेच सुटला असला तरी बीड मतदारसंघात मतदारांसमोर मोठा पेच आहे. राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षाचे उमेदवार क्षीरसागर कुटुंबातील आहेत. ‘एमआयएम’ कडून क्षीरसागरांच्या सलगीतील असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

बैठकीला भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गलधर, भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा, मराठा क्रांती मोर्चाचे अशोक हिंगे, शिवसेनेचे गणेश उगले, सोमनाथ माने, गुरसाळे महाराज, संजय नलावडे, आदींची उपस्थिती होती. आता मस्के यांनी ठोकलेल्या आरोळीनुसार ते खरेच मैदानात उतरुन लढतात का फक्त घोषणाच करतात हे लवकरच कळणार आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com