भाजपच्या अंतर्गत सर्व्हेने वाढवली भारती लव्हेकर यांची चिंता  - BJP's internal survey increases Bharti Lavhekar's tension | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

भाजपच्या अंतर्गत सर्व्हेने वाढवली भारती लव्हेकर यांची चिंता 

उर्मिला देठे 
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

काँग़्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या या मतदार संघात आता भाजपच्या मित्र पक्ष असलेल्या शिवसंग्रामच्या भारती लव्हेकर आणि अपक्ष उमेदवार राजूल पटेल यांच्यात खरी चुरस आहे.

मुंबई  : भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत सर्व्हेनुसार मुंबईतील वांद्रे आणि वर्सोवा मतदार संघात कडवी झुंज होणार असल्याचे सांगण्यात आले. या सर्व्हेमुळे मात्र शिवसंग्रामच्या उमेदवार भारती लव्हेकर यांची चिंता वाढली आहे.  

वर्सोवा विधानसभा क्षेत्रात मुस्लिम, मराठी आणि उत्तर भारतीय अशी लोकसंख्या आहे. काँग़्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या या मतदार संघात आता भाजपच्या मित्र पक्ष असलेल्या शिवसंग्रामच्या भारती लव्हेकर आणि अपक्ष उमेदवार राजूल पटेल यांच्यात खरी चुरस आहे.

प्रचाराच्या सुरूवातीपासूनच भाजपच्या लव्हेकर आणि अपक्ष उमेदवार राजुल पटेल या दोघांनीही प्रचारात आघाडी घेतली. पटेल यांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी उतरल्यानंतर पटेल यांची बाजू भक्कम झाली आहे. दुसरीकडे लव्हेकर यांच्या प्रचारात भाजप पदाधिकारी दुर्मिळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चित्रकुट येथे नुकतीच सभा झाली. लव्हेकरांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या या सभेला म्हणावी तशी गर्दी नसल्याची चर्चा मतदारसंघात आहे.

उलट राजूल पटेल यांना सर्वच स्तरातून चांगला पाठिंबा मिळत असल्याची चर्चाही मतदारसंघात आहे. तर मागील पाच वर्षाच्या काळात आमदार म्हणून लव्हेकर यांना छाप पाडता आली नसल्याने मतदारसंघात त्यांच्याविषयी नाराजी देखील आहे. काँग्रेसकडून संजय निरुपम यांच्या पसंतीचा उमेदवार न दिल्याने ते नाराज असून नाराजीचा फटका कॉग्रेसच्या बलदेव खोसा यांना बसण्याची शक्यता  आहे. निरुपम आणि त्यांचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारापासून दूर असल्याने खोसा प्रचारात पिछाडीवर पडले आहेत.

 निरुपमांची नाराजी पटेल यांच्या पथ्यावर पडू शकते असा अंदाज राजकीय क्षेत्रात चर्चिला जात आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढल्याने या मतदारसंघात चौरंगी लढत होती. भाजपकडून भारती लव्हेकर, काँग्रेसकडून बलदेव खोसा, एमआयएमकडून अब्दुल हमीद शेख, मनसेकडून मनिष धुरी रिंगणात होते. तर शिवसेनेच्या राजूल पटेल यांचा अर्ज बाद झाला होता. 

काँग्रेसच्या मतांची एमआयएममुळे विभागणी झाल्याने त्याचा फायदा भाजपला झाला आणि भारती लव्हेकर या निवडून आल्या. लव्हेकर यांना 49 हजार 182  इतकी मते मिळाली होती. तर दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या बलदेव खोसा यांना 22 हजार 784 मते मिळाली होती. शेख यांच्या वाटयाला 20 हजार 129 मते आली. तर मनसेच्या धुरी यांना 14 हजार 508 मते मिळाली होती.

      2019 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याने लढत रंगतदार होणार असल्याचेही मतदारसंघात बोलले जात आहे. मात्र या विभागात सर्वाधिक व निर्णायक अशी 1 लाख 7 हजार मुस्लिम मते जर काँग़्रेसच्या पारड्यात पडली तर या मतदारसंघातील चित्र वेगळे असू शकते, अशीही चर्चा मतदारांमध्ये आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख