खडकवासल्यात मतांचा टक्का वाढल्याने भाजपच्या `चमत्कारा`च्या आशा उंचावल्या! 

खडकवासल्यात मतांचा टक्का वाढल्याने भाजपच्या `चमत्कारा`च्या आशा उंचावल्या! 

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातही यंदा सर्वाधिक मतदान झाले आहे. गेल्या लोकसभेच्या तुलनेत खडकवासल्यातून तब्बल 54 हजारांनी मतदान वाढले आहे. बारामती शहरात मतदानाची टक्केवारी वाढली असली, तरी सर्वाधिक मतदान खडकवासल्यात झाले आहे. त्यामुळे हेच मतदान निर्णायक ठरणार आहे. पर्यायाने राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे अथवा भाजपच्या कांचन कुल यांचे भवितव्य ठरविताना खडकवासला महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

याबाबत बोलताना भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांनी सांगितले की मतदानाची टक्केवारी वाढलेली असल्यामुळे त्याचा फायदा आम्हालाच होणार आहे. 2014 च्या विधानसभा निवडणूकीत मला 63 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यापेक्षा जास्त मिळण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले आहेत.

शहरी भागात नगरसेवकांच्या माध्यमातून झालेली विकासकामे, ग्रामीण भागात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून रस्त्यासाठी हजार कोटींचा निधी आणला. यासह अनेक योजनेतून नागरिकांना लाभ मिळवून दिला आहे. यंदा आमचा उमेदवार याच मतदारसंघातील होता. त्याने पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. याचा जास्तीचा फायदा आम्हला होणार आहे. या मतदारसंघात मागील चार- पाच निवडणुकांमध्ये भाजपवर सामान्य मतदारांनी विश्वास दाखवलेला आहे. आमच्या उमेदवाराचे नाव उशिरा जाहीर झाल्यामुळे, प्रचाराला फार कमी वेळ मिळाला. पंरतु  शिवसेनेसह भाजप व महायुतीचे कार्यकर्त्यांनी उमेदवाराचे नाव घरोघरी पोहोचवण्यासाठी मदत केली. सोसायटी, ग्रामीण व झोपडपट्टी भागातून आम्हालाच जास्त मतदान होईल, असा विश्वास तापकीर यांनी व्यक्त केला.

पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी तापकीर यांचा दावा खोडून काढला. खडकवासल्यातील झालेल्या मतदानापैकी 65 टक्के मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेसला तर 35 टक्के मतदान हे भाजपला होईल.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नियोजनात्मक व खोलवर प्रचार केला. सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघासाठी गेल्या पाच वर्षांत भरपूर कामे केली. त्यांचा संपर्कही चांगला होता. राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनापासून आणि एकजुटीने काम केले. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला येथून मताधिक्य मिळण्याची शक्यता नाही. 

 गेल्या निवडणुकीत खडकवासला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांना 27 हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. त्या वेळीही बारामती शहरातून मिळालेल्या मताधिक्‍यावर राष्ट्रवादी तरली होती. त्यामुळेच यंदा राष्ट्रवादीने कात्रज, धनकवडी, आंबेगाव, तसेच सिंहगड रस्ता आणि वारजे, शिवणे, बावधनवर लक्ष केंद्रित केले होते. त्यासाठी सातत्याने जाणीवपूर्वक प्रयत्नही केले होते.

लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही या मतदारसंघातून भाजपला सुमारे 62 हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. त्यामुळे ते टिकविण्यावर आणि वाढविण्यावर भाजपने नेटाने प्रयत्न केले. या मतदारसंघातील भाजपचे सुमारे 17, तर राष्ट्रवादीचे 11 नगरसेवक आहेत. विद्यमान आमदारही भाजपचे आहेत. त्यातच लगतच्या ग्रामपंचायतीमधील सदस्यांची कुमकही होती. आघाडीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, तर युतीच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या होत्या. तसेच संघटनात्मक पातळीवरही भाजपने खडवासल्यावर अधिक लक्ष दिले होते. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला, तरी वाढलेले मतदान कोणाला मिळणार, यावरच या मतदारसंघातील खासदारांचे नाव निश्‍चित होणार आहे.
 
बारामती मतदारसंघात 61. 54 टक्के मतदान झाले. गेल्या वेळेस 58. 87 टक्के मतदान झाले होते. यंदा सुमारे तीन टक्‍क्‍यांनी मतदानात वाढ झाली. या मतदारसंघात यंदा एकूण 12 लाख 99 हजार 792 मतदान झाले. त्यातील दोन लाख 51 हजार 606 मतदान खडकवासल्यातून झाले आहे. बारामती शहरातून 2 लाख 38 हजार 283, दौंडमधून 1 लाख 94 हजार 572, इंदापूरमधून 1 लाख 94 हजार 572, पुरंदरमधून 2 लाख 10 हजार 396 आणि भोरमधून 96 हजार 596 मतदान झाले. बारामती शहरातून यंदा 28 हजार 350, तर खडकवासल्यातून 54 हजार 509 मतदान वाढले आहे. त्यामुळे हे वाढलेले मतदानही निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com