BJP"s Gangurde new standing committee chairman | Sarkarnama

स्थायी समिती सभापती पदी भाजपचे शिवाजी गांगुर्डे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017


शहराच्या विकासासाठी कटिबध्द आहोत. पारदर्शकता व विकास हाच आमच्या कामाचा अजेंडा स्थायी समितीतही राहील. स्थायी समितीत चांगले काम करून दाखवू

- शिवाजी गांगुर्डे, सभापती, स्थायी समिती.
 

नाशिक: स्थायी समितीच्या सभापती पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे शिवाजी गांगुर्डे यांचा विजय झाला. त्यांच्या विरोधात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस मनसेच्या नगरसेवकांनी एकत्र येवून मोट बांधली परंतू विरोधकांना अवघ्या सात मतांवर समाधान मानावे लागले. गांगुर्डे यांना विरोधकांपेक्षा दोन अधिक अशी एकुण नऊ मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. सदस्य बळ कमी असले तरी मतदानावेळी चमत्कार घडेल असा विरोधकांचा दावा फोल ठरला आहे. सोळा सदस्यांच्या स्थायी समिती मध्ये भाजपचे नऊ सदस्य तर शिवसेनेचे चार, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसेचे प्रत्येकी एक असे तीन सदस्य आहेत. महासभेत रिपाईचा एक सदस्य आहे. शिवसेना व रिपाईच्या एकत्रित गटनोंदणी झाली असती तर भाजपचा एक सदस्य कमी होवून शिवसेनेचा एक सदस्य वाढला असता अशा वेळी समसमान मते असल्याने चिठ्ठी पध्दतीने सभापती पद निश्‍चित केले असते परंतू विभागिय आयुक्तांनी शिवसेनेचा प्रस्ताव फेटाळला त्याविरोधात शिवसेनेनेन उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर 27 एप्रिलला सुनावणी ठेवली असतानाचं त्यापुर्वी सभापती पदासाठी आज निवडणुक झाली. भाजपकडून शिवाजी गांगुर्डे यांच्या बाजूने शशिकांत जाधव, जगदीश पाटील, विशाल संगमनेरे, श्‍याम बडोदे, अलका आहिरे, सुनिता पिंगळे, सिमा ताजणे, मुकेश शहाणे यांनी हात उंचावून मतदान केले तर शिवसेनेचे उमेदवार डी.जी. सुर्यवंशी यांच्या बाजूने प्रविण तिदमे, भागवत आरोटे, सुर्यकांत लवटे, मनसे गटाचे मुशीर सैय्यद, कॉंग्रेसच्या वत्सला खैरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेंद्र महाले यांनी मतदान केले. श्री. गागंर्डे यांना नऊ तर श्री. सुर्यवंशी यांना सात मते मिळाल्याने गांगुर्डे यांना पिठासन अधिकारी ज्योतीबा पाटील यांनी विजयी घोषित केले. नवनिर्वाचित सभापती गागुंर्डे यांचे महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, आमदार बाळासाहेब सानप यांनी स्वागत केले. माजी सभापती उद्दव निमसे, विजय साने, संभाजी मोरुस्कर आदी यावेळी उपस्थित होते. विरोधकांची हरकत निवडणुक प्रक्रिया सुरु होण्यापुर्वी मनसे गटाचे मुशीर सैय्यद यांनी सदस्य नोंदणी वरून उच्च न्यायालयात दावा दाखल असल्याने निवडणुक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली. शिवसेना गटनेत्यांचे पत्र त्यांनी निवडणुक निर्णय अधिकायांना दिले. परंतू न्यायालयाचा कुठलाचं निकाल लागला नसल्याने निवडणुक प्रक्रिया थांबविता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यानंतर विरोधकांनी दाखविलेला आक्रमकपणा थंडावला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख