अखेर वर्सोव्यात  भाजपच्या लव्हेकर यांनीं शिवसेनेचे बंड  मोडून काढले 

..
अखेर वर्सोव्यात  भाजपच्या लव्हेकर यांनीं शिवसेनेचे बंड  मोडून काढले 

मुंबई  : वर्सोवा मतदारसंघात बंडखोरीवर मात करून भारतीय जनता पक्षाच्या डॉ. भारती लव्हेकर यांनी कॉंग्रेसच्या बलदेव खोसा यांचा पाच हजारांहून जास्त मतांनी पराभव केला.'ती फाऊंडेशन' मार्फत तळागळातील महिलांना विनामूल्य सॅनिटरी पॅड वाटप करणाऱ्या लव्हेकर यांच्या कामाला मतदारांनी दिलेली ही पावती असल्याचे बोलले जात आहे.

ही लढत मतमोजणीच्या अठराव्या फेरीपर्यंत अत्यंत दोलायमान अवस्थेत होती. पहिल्या सहा फेऱ्यांपर्यंत शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार राजूल पटेल आघाडीवर होत्या. नंतर बलदेव खोसा हे आघाडीवर गेले व 13 व्या व 15 व्या फेरीत तर ते चार हजारांपेक्षाही जास्त मतांनी आघाडीवर होते. मात्र 19 व्या फेरीत लव्हेकर यांनी आघाडी घेतली व ती त्यांनी शेवटपर्यंत टिकवली. वर्सोवा कोळीवाडा व चार बंगला मॉडेल टाऊन परिसरातून त्यांना मोठ्या प्रमाणावर मतदान झाले व तेच त्यांना विजयाकडे घेऊन गेले.

पहिल्यापासून लव्हेकर यांची उमेदवारी निश्‍चित नव्हती, येथून मोहित कंबोज यांना उमेदवारी द्यावी, असे भाजप श्रेष्ठींच्या मनात होते. शिवसंग्रामच्या विनायक मेटेंनी आग्रह धरल्याने लव्हेकर यांनाच उमेदवारी मिळाली. मात्र सेनेच्या राजूल पटेल यांनी बंडखोरी केल्याने दोघींच्या मतविभागणीत खोसा विजयी होतील, अशीही भीती व्यक्त केली जात होती. पण 2014 पेक्षा (49 हजार 182) सुमारे आठ हजार मते कमी पडूनही लव्हेकर यांच्या गळ्यात पुन्हा आमदारकीची माळ पडली.

अंधेरीच्या शहाजीराजे क्रीडा संकुलात मतमोजणी सुरु झाल्यावर दुपारपर्यंत फारसे कार्यकर्ते जमले नव्हते. खोसा यांनी आघाडी घेतल्यावर कॉंग्रेस कार्यकर्ते जमू लागले, मात्र तोपर्यंत शेवटीशेवटी लव्हेकर विजयी होणार हे निश्‍चित झाल्याने ते निघून गेले व तेथे जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष सुरु केला. येथे 2009 मध्ये शिवसेनेच्या यशोधर फणसे यांना 32 हजार 784 मते मिळाली होती, आता राजूल पटेल यांच्यामागे शिवसेनेची सर्व ताकद असतानाही त्यांना साधारण तेवढीच मते मिळाली. मागील निवडणुकीपेक्षा मनसे व एमआयएम ची मते घटून खोसा यांची मते 2014 च्या तुलनेत वाढली.

आजचा निकाल
-------------
भारती लव्हेकर - 41 हजार 57
बलदेव खोसा - 35 हजार 871
राजूल पटेल - 32 हजार 706

2014 ची मते
-----------------
भाजप - 49 हजार 182
कॉंग्रेस - 22 हजार 784
एमआयएम - 20 हजार 127
मनसे - 14 हजार 508   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com