BJP's agitation awakend CIDCO | Sarkarnama

भाजपाच्या "कचरा फेको' आंदोलनामुळे सिडकोला आली जाग

संदीप खांडगे पाटील
मंगळवार, 18 एप्रिल 2017

'समान कामाला समान वेतन', ही कंत्राटी कामगारांची गेल्या अनेक वर्षाची मागणी सिडको प्रशासनाने प्रलंबित ठेवल्यामुळे कामगारांनी टोकाची भूमिका घेत कचरा न उचलण्याचे आंदोलन सुरू केले. गेल्या सहा दिवसात सिडको नोडमधील कचरा उचलला न गेल्यामुळे सुमारे 2200 टन कचरा रस्त्यावर जमा झाला. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला.

नवी मुंबई - सिडको प्रशासनामध्ये सफाईचे काम करत असलेल्या कंत्राटी कामगारांनी सहा दिवसापासून आंदोलन सुरू केल्यामुळे पनवेल शहरातील सिडको नोडमध्ये ठिकठिकाणी छोटेखानी डम्पिंग ग्राऊंडचे स्वरूप निर्माण झाले होते. शहरात दुर्गंधी होवूनही सिडकोचा ताठरपणा पाहून लोकांच्या आरोग्याचा प्रश्‍न लषात घेवून सिडकोविरोधात भाजपाने सोमवारी  "कचरा फेको' आंदोलन केले. या आंदोलनामुळे जाग आलेल्या सिडकोने अखेर पोलिस बंदोबस्तात कचरा उचलण्यास सुरूवात केली आहे.

'समान कामाला समान वेतन', ही कंत्राटी कामगारांची गेल्या अनेक वर्षाची मागणी सिडको प्रशासनाने प्रलंबित ठेवल्यामुळे कामगारांनी टोकाची भूमिका घेत कचरा न उचलण्याचे आंदोलन सुरू केले. गेल्या सहा दिवसात सिडको नोडमधील कचरा उचलला न गेल्यामुळे सुमारे 2200 टन कचरा रस्त्यावर जमा झाला. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला. शहरात कचऱ्याचे ढिगारे जमा होत असतानाही सिडकोने कंत्राटी कामगारांशी चर्चाच न करण्याची आपली भूमिका कायम ठेवली.

भाजपाने सफाई कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असला तरी लोकांच्या आरोग्य लषात घेता भाजपा पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी स्वत: कचरा उचलण्याची तयारी दर्शविली. तथापि सफाई कर्मचाऱ्यांनी भाजपाच्या कचरा उचलण्याच्या भूमिकेला विरोध केला. भाजपाने याविरोधात सोमवारी सिडको मुख्यालयासमोर "कचरा फेको' आंदोलन करणार असल्याचे जाहिर केल्याने सोमवारी सिडको मुख्यालयाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

कचऱ्याचे डब्बे घेवून आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या प्रवेशद्वारावर भाजपा कार्यकर्त्यांसमवेत आंदोलन सुरू केले. दुपारचे 12.30 झाले तरी सिडको मुख्यालयाचे प्रवेशद्वार उघडण्यात आले नव्हते. याठिकाणी बघ्याची गर्दीही मोठ्या संख्येने होते. "कचरा फेको' आंदोलन कसे होते हे पाहण्यासाठी सिडकोचे कंत्राटी सफाई कामगारही या ठिकाणी उपस्थित होते. सुरूवातीला पाच जणांचे शिष्टमंडळ घेवून आतमध्ये चर्चेसाठी या असे सिडकोकडून आंदोलनकर्त्याना सांगण्यात आले. तथापि चर्चेसाठी घ्यायचे तर सर्वांनाच घ्या अन्यथा आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार अशी भूमिका आ. प्रशांत ठाकूर यांनी घेतली.

सिडकोने आंदोलनकर्त्यांची अट मान्य करत आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलविले. या शिष्टमंडळामध्ये भाजपाचे पदाधिकारी, महिला मोर्चाच्या सदस्या, युवा मोर्चाचे सदस्य, आरपीआयचे पदाधिकारी व स्थानिक रहीवाशी यांचा समावेश होता. आतमध्ये शिष्टमंडळ चर्चेसाठी गेले तरी उर्वरित आंदोलनकर्त्यांनी सिडको मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आपले आंदोलन सुरूच ठेवले होते.
सिडकोच्या वतीने सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण, आरोग्य अधिकारी डॉ. बाविस्कर, दराडे सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांमध्ये आ. प्रशांत ठाकूरांनी सिडको अधिकाऱ्यांनी आंदोलन, शहरात निर्माण झालेले कचऱ्याचे ढिगारे, कचरा उचलण्यास सिडकोची उदासिनता यावरून सिडकोच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रत्येक सिडको नोडमध्ये 2 जेसीबी व 4 डंपर लावून कचरा उचलण्याचे सिडकोकडून मान्य करण्यात आले असले तरी कचरा उचलण्यास जोपर्यत सुरूवात होणार नाही तोपर्यत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलनकर्त्या शिष्टमंडळाने सिडको अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. सांयकाळी 6 वाजता कचरा उचलण्यास सुरूवात झाल्याची खात्री पटल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

आता पोलिस संरषणात कचरा उचलण्यास सुरूवात झाली असून रात्रपाळीमध्येही सिडको नोडमधील कचरा उचलला जाणार असल्याची माहिती सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी दिली

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख