BJP yet to decide about support | Sarkarnama

उस्मानाबादेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीला भाजपचे गाजर

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 मार्च 2017

भाजप कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकते हे 21 मार्च रोजी होणाऱ्या विशेष सभेतच स्पष्ट होणार आहे. 

उस्मानाबाद : राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपकडून मतदारांना मोठ्या प्रमाणात आश्‍वासने देण्यात आली होती. त्याची सोशल मिडियावर गाजर म्हणून टिंगलही उडवण्यात आली. निवडणुक निकालानंतर उस्मानाबाद जिल्हा परिषदेत सर्वाधिक 26 जागा जिंकत राष्ट्रवादीने सत्तेवर दावा सांगितला आहे. बहुमतासाठी दोन सदस्यांचा पाठिंबा असल्याने जिल्हा बॅंकेत सोबत असलेल्या भाजपला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गळ घातली आहे. तर राष्ट्रवादीला सत्तेपासून रोखण्यासाठी व पुन्हा आपलाच अध्यक्ष करण्यासाठी कॉंग्रेसने देखील भाजपकडे मदत मागितली आहे. तुर्तास भाजपने दोघांनाही पाठिंब्याचे गाजर दाखवत झुलवत ठेवण्याची खेळी खेळली आहे.

55 सदस्य असलेल्या उस्मानाबाद जिल्हा परिषदेत सध्या त्रिशंकू स्थिती असून राष्ट्रवादीसह शिवसेना, कॉंग्रेसनेही सत्ता स्थापनेसाठी कंबर कसली आहे. मुंबईतील महापौर पदाच्या निवडीचा घोळ संपुष्टात येऊन शिवसेनेचा महापौर विराजमान झाल्याने आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उस्मानाबादेत 4 सदस्य असलेल्या भाजपची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादीने त्यांची मनधरणी सुरु केली आहे. शिवसेनेकडे अकरा तर कॉंग्रेसकडे 13 सदस्य आहेत. जिल्हा परिषदेत बहुमत सिध्द करण्यासाठी 28 चे संख्याबळ आवश्‍यक आहे. त्यामुळे भाजपचे चार सदस्य गळाला लागले तर कॉंग्रेस-सेना-भाजप अशी युती होऊन कॉंग्रेसचा जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकतो.

राष्ट्रवादीचे पारडे जड

राष्ट्रवादीचे 26 सदस्य निवडूण आल्यामुळे त्यांना केवळ दोन सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने देखील भाजपचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. स्थानिक नेत्यांनी मुंबईतील वरिष्ठांकडे बोट दाखवल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादीने थेट मुंबईशी संपर्क साधल्याची माहिती आहे. पण भाजपने कोणत्याही एका पक्षाला होकार किंवा नकार न कळवता केवळ गाजर दाखवल्याचे समजते. भाजप कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकते हे 21 मार्च रोजी होणाऱ्या विशेष सभेतच स्पष्ट होणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख