bjp win in kolhapur | Sarkarnama

कोल्हापुरात भाजपच वरचढ 

सरकारनामा न्यूजब्युरो 
बुधवार, 5 एप्रिल 2017

 जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळचे संख्याबळ कायम ठेवून भाजाप आघाडीने सभापती निवडीतही आपणच वरचढ असल्याचे दाखवून देताना दोन्ही कॉंग्रेसला धोबीपछाड दिली.

कोल्हापूर :  जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळचे संख्याबळ कायम ठेवून भाजाप आघाडीने सभापती निवडीतही आपणच वरचढ असल्याचे दाखवून देताना दोन्ही कॉंग्रेसला धोबीपछाड दिली. या घडामोडीत केंद्र व राज्यातील सत्तेबरोबरच "गोकूळ'ची सत्ता केंद्रस्थानी राहिली. त्यात एका महिला सदस्यांच्या पळवापळवीने या घडामोडीत तणावाचे वातावरण राहिले. 

जिल्हा परिषदेच्या 21 मार्च रोजी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचे सात, जनसुराज्य'चे सहा व इतर स्थानिक आघाड्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. सभापती निवडीत हेच संख्याबळ कायम राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. दुसरीकडे कॉंग्रेस आघाडीने मात्र सभापती निवडीत
चमत्कार घडण्याची भाषा सुरू केली होती. पदावरून भाजप आघाडीत वाद होतील व त्यातून निर्माण झालेल्या नाराजीचा फायदा होईल, असे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटत होते. पण पद वाटपात कोणताही वाद होणार नाही, ही दक्षता घेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आमदार महादेवराव महाडीक यांच्या मदतीने सभापती निवडीतही कॉंग्रेस आघाडीला धोबीपछाड दिली. 

जिल्हा परिषदेच्या संपूर्ण राजकारणात राज्य व केंद्रातील सत्तेबरोबरच "गोकूळ' ची सत्ता केंद्रस्थानी राहिली. या तिन्हीही सत्तास्थानासमोर विरोधक हतबल ठरल्याचे चित्र पहायला मिळाले. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत भाजप आघाडीचे संख्याबळ 37 तर विरोधकांचे संख्याबळ 28 होते. सभापती निवडीत हेच संख्याबळ कायम राखण्यात भाजप आघाडीला यश आले. दुसरीकडे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत गैरहजर राहिलेले कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे दोन सदस्य यावेळी उपस्थित होते. पण कॉंग्रेसचे सचिन बल्लाळ यांना गैरहजर ठेवण्यात श्री. महाडीक पुन्हा यशस्वी झाले. यासाठी त्यांनी "गोकूळ' च्या सत्तेचा वापर केला. श्री. बल्लाळ हे माजी मंत्री भरमू पाटील यांचे कार्यकर्ते आहेत. श्री. पाटील यांचे पुत्र दीपक हे "गोकूळ' चे संचालक आहेत. त्यातून बल्लाळ यांना गैरहजर ठेवण्याची खेळी करण्यात आली. 

जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील यांचे नेतृत्व मानणाऱ्या सदस्या सौ. राणी खलमेट्टी ह्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत भाजपसोबत होत्या. पण शुक्रवारी श्री. पाटील यांच्यावर जिल्हा बॅंकेतून दबाव आणून सौ. खलमेट्टी यांना आपल्या आघाडीत घेण्यात कॉंग्रेसच्या नेत्यांना यश आले. पण हा आनंद कॉंग्रेस आघाडीचे नेते फार काळ टिकवू शकले नाही. सौ. खलमेट्टी यांना हॉटेलमधून उचलून पुन्हा आपल्या गोटात नेण्याचे काम भाजप आघाडीने केले. यासाठी अर्थातच राज्यातील सत्तेचा वापर करण्यात आला. असाच दबाव व्ही. बी. पाटील यांच्या स्नुषा सौ. रसिका पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्याबाबतीत घडल्याचे समजते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख