BJP will investigate reasons behind Pankaja Munde & Rohini Khadses defeat | Sarkarnama

रोहिणीताई आणि पंकजाताईंच्या पराभवाच्या चौकशीसाठी चंद्रकांतदादा शनिवारी जळगावात 

कैलास शिंदे 
बुधवार, 4 डिसेंबर 2019

पक्षाचे  प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील शनिवार (ता.7) जळगावात येत  आहे. त्यांच्या आणि संघटन मंत्र्यांच्या  उपस्थितीत  याबाबत चौकशी होणार असल्याचे समजते . 

जळगाव : भाजप पक्षश्रेष्ठीनी एकनाथ  खडसेंच्या आरोपांची गंभीर दखल घेतली असून, रोहिणीताई खडसे  आणि पंकजाताईंच्या पराभवाची चौकशी सुरु करण्यात आली आहे .  या  पार्श्‍वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शनिवार (ता.7) जळगावात येत आहे. त्यांच्या आणि संघटन मंत्र्यांच्या  उपस्थितीत  याबाबत चौकशी होणार असल्याचे समजते . 

भारतीय जनता पक्षातील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. पक्षातील नाराज नेते आता खुलेपणाने बोलू लागले आहेत. भाजप नेते एकनाथराव खडसे यांनीही नाव न घेता थेट नेतृत्वावर हल्ला केला आहे. पक्षातर्गंत हितशत्रुंनी ऍड.रोहिणी खडचे यांचा पराभव केला आहे,त्यांची नावेही श्रेष्ठीकडे दिल्याचे खडसे यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपाचीही कारणमिमांसा बैठकित होण्याची शक्‍यता आहे.

विधानसभा निवडणूकीनंतर भाजप-सेना युती होण्याची शक्‍यता होती. मात्र फिसकटली आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. यानंतर भाजपचे अंतर्गत वाद बाहेर आले आहेत. माजी मंत्री व पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली अस्वस्थता व्यक्त करीत बारा डिसेंबरला गोपीनाथ गडावर मेळावा आयोजित केला आहे.  

तर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनीही थेट हल्ला चढवित पंकजा मुंडे व ऍड.रोहिणी खडसे यांना पक्षातर्गंत कारवाया करून पाडल्याचा आरोप केला आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या आरोपाच्या पार्श्‍वभूमीवर शनिवार जळगावात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित उत्तर महाराष्ट्र कोअर कमेटीची बैठक होत आहे. 

विशेष म्हणजे विधानसभा निवडणूकीत मुक्ताईनगर मतदार संघात ऍड.रोहिणी खडसे यांचा पराभव अंतर्गत पक्षाच्या हितशत्रुंनी केल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. त्यांची नावे पक्षाचे चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे,त्यामुळे त्यांच्यावरच्या कारवाईबाबतही चर्चा होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आता या बैठकिकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. 

जळगाव येथील बालाजी  लॉन येथे शनिवार (ता.7)सकाळी अकरा वाजता ही बैठक होणार आहे. यावेळी विभागीय संघटमंत्री विजयराव पुराणिक तसेच उत्तर महराष्ट्रातील कोअर कमेटीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. यावेळी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष (कै.)उदय वाघ यांचे नुकतेच निधन झाले.त्यांना श्रध्दाजंली अर्पण करण्यासाठी सभा होईल. त्यानंतर पक्षातर्गंत निवडणूकीबाबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या सुत्राकडून देण्यात आली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख