bjp will change the candidate in armori | Sarkarnama

कृष्णा गजबेंच्या जागी भाजपकडून दुसऱ्याला संधी ? कॉंग्रेसमध्येही अनेकजण स्पर्धेत

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाची मानली जाणारी आरमोरी विधानसभा जिंकण्यासाठी राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. भारतीय जनता पक्ष व कॉंग्रेसमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इच्छुकांची धडपड सुरू आहे. आतापर्यंत कॉंग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ बघायला मिळत होती. दुसरीकडे विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांची उमेदवारी भाजप कायम ठेवेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, आता "कहानी मे ट्विस्ट' आला असून भाजपने येथून नवा उमेदवार देण्याची तयारी केल्याचे समजते. एकूणच उमेदवारीसाठी इच्छुकांची वाढती संख्या बघता येथे "एक अनार, सौ बिमार', अशीच स्थिती दिसत आहे. 

आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाची मानली जाणारी आरमोरी विधानसभा जिंकण्यासाठी राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. भारतीय जनता पक्ष व कॉंग्रेसमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इच्छुकांची धडपड सुरू आहे. आतापर्यंत कॉंग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ बघायला मिळत होती. दुसरीकडे विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांची उमेदवारी भाजप कायम ठेवेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, आता "कहानी मे ट्विस्ट' आला असून भाजपने येथून नवा उमेदवार देण्याची तयारी केल्याचे समजते. एकूणच उमेदवारीसाठी इच्छुकांची वाढती संख्या बघता येथे "एक अनार, सौ बिमार', अशीच स्थिती दिसत आहे. 

विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्याचे धोरण भाजपने जवळपास निश्‍चित केले असताना आरमोरी विधानसभा क्षेत्रात मात्र स्थानिक नेत्यांकडूनच विद्यमान आमदारांना विरोध केला जात आहे. या मंडळींनी नवा उमेदवार आणण्याची धडपड सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. जिल्ह्यातील ओबीसींना केवळ 6 टक्‍के आरक्षण मिळत आहे. याविषयीचा असंतोष अनेक वर्षांपासून धुमसत आहे. 

भाजपच्या मंडळींनी 2014 च्या निवडणुकीत ओबीसींमधील हा असंतोष "कॅश' करून जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रातून विजय मिळविला. त्यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्रातून आदिवासींच्या अन्य जमातीच्या उमेदवारांना विरोध दर्शवीत "माना' जमातीच्या कृष्णा गजबे यांना भाजपने रिंगणात उतरविले. गजबे मोठ्या मताधिक्‍याने निवडूनही आले, परंतु अल्पावधीतच आदिवासींच्या अन्य जमातींकडून गजबे यांना विरोध होऊ लागला. त्यानंतर "ओरिजिनल आदिवासी हवा' हा नारा भाजपत गुंजणे सुरू झाले. त्यातही आमदार कृष्णा गजबे यांची नव्याने भाजपमध्ये आलेल्या काही नेत्यांशी सलगी वाढल्याने जुने नेते दुखावले. 

या नेत्यांनी मग नव्या उमेदवाराचा शोध घेणे सुरू केले. अशातच गोवारी जमातीचे नेते रूपेश चामलाटे यांचे नाव पुढे आले. लोकसभा निवडणुकीनंतर गोवारी समाज संघटनेच्या नेत्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते यांना निवेदन देऊन आरमोरी क्षेत्रातून गोवारी समाजाच्या उमेदवाराला संधी देण्याची मागणी केली. आदिवासींमधील सर्व जमातीच्या उमेदवारांना भाजपने आतापर्यंत संधी दिली. परंतु, विदर्भात 10 लाख लोकसंख्या असलेल्या गोवारी जमातीचा केवळ मतांसाठी वापर करून घेतला, असे या समाजाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्याअनुषंगाने गोवारी समाज संघटनेच्या वारंवार बैठका होत असून त्यांनी रूपेश चामलाटे यांना रिंगणात उतरविण्याचा चंग बांधल्याचे कळते. 

एकीकडे आमदार कृष्णा गजबे यांनी ओबीसींचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रचंड तत्परता दाखवली, त्यामुळे ओबीसींना पुन्हा गजबेच हवे आहेत, तर दुसरीकडे, आदिवासींकडून मात्र प्रचंड विरोध होत असल्याचे दिसून येते. आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेसमध्येही उमेदवारीचा तिढा अद्याप कायम आहे. मागील निवडणुकीत आनंदराव गेडाम यांचा पराभव करून कृष्णा गजबे येथे आमदार झाले. माजी आमदार आनंदराव गेडाम यांना पक्षातून विरोध वाढत असून वामनराव सावसाकडे यांचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. 

आरमोरी विधानसभा मतदार क्षेत्र अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आरमोरी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसकडून नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची दाट शक्‍यता आहे. मागील निवडणुकीत गेडाम यांचा गजबे यांनी पराभव केला होता. त्यामुळे पराभूत उमेदवाराला पुन्हा तिकीट द्यावे काय ? याबाबतदेखील पक्षात चिंतन सुरू आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी कॉंग्रेसने आदिवासी तथा गैरआदिवासींना चालणारा उमेदवार द्यावा तसेच नवीन चेहऱ्याला संधी द्यावी, अशी मागणी कार्यकर्ते करीत आहेत. या विधानसभा क्षेत्रात माना जमातीची मतदार संख्या अधिक आहे. त्यामुळे या समाजातील उमेदवार असल्यास जिंकण्याची शक्‍यता वाढते. म्हणूनही कदाचित सावसाकडे यांच्याकडे झुकते माप जाण्याची शक्‍यता आहे. शिवाय या विधानसभेसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा प्रख्यात कवयित्री कुसुम अलामसुद्धा इच्छुक आहेत. तसेच पूर्वी राजकारणात व समाजकारणात झळकून आता शासकीय सेवेत असलेल्या एका महिला नेत्यानेही उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले असल्याचे समजते. नेहमीच पुरुषांची मक्तेदारी राहिलेल्या या क्षेत्रात महिलांना संधी द्यावी, अशी मागणीही आहे. त्यामुळे कॉंग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख