bjp want mumbai muncipal rule mangalprabhat lodha | Sarkarnama

भाजपला मुंबई महापालिका स्वबळावर जिंकायचीय : लोढा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

मुंबई : मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा जबाबदारी दिलेले मंगलप्रभात लोढा हे सर्वांना बरोबर घेऊन, सर्वांच्या विचाराने वाटचाल करणार आहेत. महापालिका निवडणुकीचे आव्हान स्वीकारण्यासाठी सर्व नेते एकदिलाने लोकांसमोर जातील व पक्ष स्वबळावर मुंबई महापालिका जिंकेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

मुंबई : मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा जबाबदारी दिलेले मंगलप्रभात लोढा हे सर्वांना बरोबर घेऊन, सर्वांच्या विचाराने वाटचाल करणार आहेत. महापालिका निवडणुकीचे आव्हान स्वीकारण्यासाठी सर्व नेते एकदिलाने लोकांसमोर जातील व पक्ष स्वबळावर मुंबई महापालिका जिंकेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

अध्यक्षपदी दुसऱ्यांदा नियुक्ती झाल्यावर त्यांनी "सरकारनामा'ला मुलाखत दिली. इतके दिवस सन 2014 चा काही महिन्यांचा अपवाद वगळता अनेक वर्षे शिवसेना-भाजप एकत्रितरित्या निवडणुक लढवीत होते. नेते-कार्यकर्ते-मतदार-साधनसामुग्री यांचे एकत्रित बळ भाजपच्या वाढीला उपकारक ठरत होते.

यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही मोदी लाटेमुळे पक्षाला चांगले यश मिळाले, त्यात युतीच्या बेरजेचाही वाटा होता. पण आता युती नसल्याने मुंबई महापालिका निवडणुकांचे मोठे आव्हान लोढा यांना पेलावे लागणार आहे. मात्र सामूहिक नेतृत्व विकसित करून त्यावरही मात करण्याचा लोढा यांना प्रयत्न करावा लागेल. 

विधानसभा निवडणुकीपर्यंत मराठी-गुजराती व हिंदी भाषकांची एकगठ्ठा मते शिवसेना-भाजपला मिळाली होती, हेच त्यांचे बलस्थान होते. मात्र आता शिवसेना कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचे एकत्रित आव्हान परतून लावण्याचे शिवधनुष्य लोढा यांना उचलावे लागेल.

"सीएए' कायद्याच्या पार्श्‍वभूमीवर उठलेल्या वादळामुळे मुस्लिम मतदार त्वेषाने मतदानाला उतरले तर भाजपच्या अडचणीत वाढच होणार आहे. अशा परिस्थितीत अन्य कोणीही पक्ष साथीला नसताना भाजपला साऱ्या मुंबईभर नेणे व स्वबळावर महापालिका निवडणुका जिंकणे हे ध्येय लोढा यांच्यापुढे आहे. 

त्यासाठी आपण येते काही दिवस विचारमंथन करू, प्रमुख नेत्यांसमावेत बसून चर्चा करू आणि वरिष्ठांशी बोलून आराखडा तयार करू. याबाबत आपण येत्या काही दिवसांत नक्कीच डावपेच निश्‍चित करू, असेही त्यांनी सांगितले.

शहरात भाजपची संघटनशक्ती मोठी आहे, त्यामुळे सर्वांचे मत विचारात घेऊनच पुढील रणनीती ठरवू. आता महापालिका आम्हाला स्वबळावर जिंकायचीच आहे, त्यात आम्ही यशस्वी होऊ, सामूहिक नेतृत्वच ही निवडणुक लढवेल, असेही ते म्हणाले. 

लोकसभा व त्याहीपेक्षा विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी अत्यंत सुंदर झाली. विधानसभा निवडणुकात मुंबईत पक्षाला 99 टक्के यश मिळाले. आपल्या नेतृत्वाखाली पक्षाची कामगिरी उजवी झाल्यानेच पक्षाने आपल्यावर पुन्हा ही जबाबदारी सोपविली असावी, असेही त्यांना वाटते.

याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री व माजी पक्षाध्यक्ष अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानले. 

आगामी काळात पक्षापुढील व तुमच्यासमोरील प्रमुख आव्हाने कोणती वाटतात, या प्रश्‍नावर त्यांनी सांगितले की, राजकारणात रोजच आव्हानांना सामोरे जावे लागते. आज काहीही परिस्थिती असली तरी आपण उद्याचे ठाम सांगू शकत नाही. पण प्रमुख नेते, मेहनती कार्यकर्ते ही आपली शक्ती असते, त्यांच्या साथीने आपली वाटचाल सोपी होईल हे निश्‍चित. 

युती तुटल्यावर सन 2014 ची विधानसभा निवडणुक व त्यानंतर 2017 ची मुंबई महापालिका निवडणुक भाजपने स्वतंत्रपणेच लढविली होती. त्यावेळी त्यांना व शिवसेनेला साधारण समसमान जागा मिळाल्या होत्या. मुंबईत वेगळे लढूनही शिवसेनेवर निर्विवादपणे मात करणे भाजपला जमले नव्हते. उलट आता शिवसेनेच्या बाजूने कॉंग्रेस उभी राहिल्याने भाजपपुढील अडचणींमध्ये निश्‍चितच वाढ झाली आहे. 

या महापालिका निवडणुकीत भाजपचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. येती पालिका निवडणूक कठीण वाटते की सोपी, या प्रश्‍नावर लोढा म्हणाले की, सोपे-कठीण असे राजकारणात काहीही नसते. आपण आपल्या परीने कसून प्रयत्न करायचे, शेवटी लोकांच्या मनात काय आहे, त्यावर निकाल ठरतो. 

अध्यक्षपदी नियुक्ती होऊनही गेले सहा महिने लोढा हे लो प्रोफाईल राहिले होते, ते फारसे आक्रमकपणे प्रसारमाध्यांपुढेही आले नव्हते. ते बहुदा आजच्या दिवसाचीच वाट पहात होते, आता पुन्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर आक्रमकपणे पक्षाची करणारी धोरणे राबविणे त्यांना शक्‍य होईल. आपले अन्य काही वेगळे प्लॅन, डावपेच याबाबत लौकरच बोलू, असेही आश्‍वासन त्यांनी दिले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख