Is BJP trying to corner Shiv sena | Sarkarnama

सेनेची कोंडी करण्याची भाजपची डिप्लोमसी? 

महेश पांचाळ : सरकारनामा न्युज ब्युरो 
सोमवार, 27 मार्च 2017

संबंध पुन्हा सुधारण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीर मुनंगटीवार हे गुढीपाडव्याच्या आधी मातोश्रीवर जाउन उध्दव ठाकरे यांची भेट घेणार अशी माहितीही भाजपाच्या सूत्रांकडून देण्यात आली होती. परंतु भाजपाचे दोन मंत्री शिष्टाईसाठी येणार असल्याचा निरोप मातोश्रीकडे नसल्याचे खात्रीलायकरित्या समजते. 

मुंबई ता. 27 : कॉंग्रेस राष्ट्रवादीसह शिवसेनेचे आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत, अशी एकीकडे माहिती देताना, दुसरीकडे सेनेसोबतचे ताणलेले संबंध सुधारण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ मंत्री मातोश्रीवर जाणार असल्याचे भाजपाच्या गोटातून सांगितले जात आहे. मात्र मातोश्रीवर भाजपाचे कोण मंत्री येणार याची अद्याप माहिती नसल्याने, हा डिप्लोमसी चा भाग आहे का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात केली जात आहे. 

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएतील घटक पक्षांना स्नेहभोजनासाठी निमंत्रित केले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही बोलावण्यात आल्याचे माध्यमांतून सांगण्यात आले . परंतु, या अशाप्रकारच्या स्नेहभोजनाचे निमंत्रण मातोश्रीवर आले नसून, गुढीपाडव्याच्या दिवशी दिल्लीतील मोदींच्या कार्यक्रमात उध्दव ठाकरे सहभागी होणार नसल्याचे खात्रीलायकरित्या समजते.

गेल्या दोन दिवसात उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणाऱ्या कार्यक्रमाला जाणार की नाही अशी चर्चा केली गेली. मोदी यांच्या कार्यक्रमाला ठाकरे उपस्थित राहणे म्हणजे सेनेचा विरोध मावळला, असे चित्र निर्माण झाले असते. उध्दव ठाकरे यांना कोणतेही स्नेहभोजनाचे निमंत्रण आले असल्याचे सेनेचे खासदार संजय राउत यांनी स्पष्ट केले. 

29 मार्चपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्दयावर कॉंग्रेस राष्ट्रवादीकडून राज्यात संघर्ष यात्रा काढली जात आहे. या संघर्ष यात्रेला शिवसेनेकडून छुपा पाठिंबा मिळू नये, असेही भाजपाला वाटत आहे. तसेच या संघर्ष यात्रेला स्थानिक लोकांकडून प्रतिसाद मिळाला तर गलितगात्र झालेल्या विरोधकांना बळ मिळेल, अशी शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेवरही दबाव असायला हवा, अशी व्युहरचना भाजपाच्या थिंक टॅंककडून केली जात असल्याचे समजते. 

कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांबरोबर सत्तेतील सहकारी मित्र सेनेतील आमदारही भाजपात येण्यास उत्सुक आहेत, असे भाजपाच्या नेत्यांकडून खाजगीत बोलले जात असले तरी, त्याचा हवाला देत, सेनेच्या गोटात संभ्रमाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण करण्यास भाजपाला आतापर्यंत यश आल्याचे दिसून येत आहे. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने विरोधी पक्षातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंवा दिला होता. तर विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेचे आमदारांनी कर्जमाफीच्या मुद्यांवर सुरुवातीला भाजपाला एकाकी पाडले होते.

अर्थसंकल्प सादर व्हावा यासाठी सेनेने थोडी नरमाईची भूमिका घेतली असली तरी, सत्तेत असतानाही सेना भाजपातील संबंध ताणले गेलेले दिसून येत आहेत. हे संबंध पुन्हा सुधारण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीर मुनंगटीवार हे गुढीपाडव्याच्या आधी मातोश्रीवर जाउन उध्दव ठाकरे यांची भेट घेणार अशी माहितीही भाजपाच्या सूत्रांकडून देण्यात आली होती. परंतु भाजपाचे दोन मंत्री शिष्टाईसाठी येणार असल्याचा निरोप मातोश्रीकडे नसल्याचे खात्रीलायकरित्या समजते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख