bjp tries to split ncp in baramati | Sarkarnama

बारामतीत राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याची भाजपची तयारी.....

मिलिंद संगई
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

बारामती शहर : राज्यात एकीकडे भाजपची मेगाभरती सुरु असताना आता बारामती विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावण्याची व्यूहरचना भाजपच्या स्थानिक पदाधिका-यांनी आखली आहे.

बारामती शहर : राज्यात एकीकडे भाजपची मेगाभरती सुरु असताना आता बारामती विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावण्याची व्यूहरचना भाजपच्या स्थानिक पदाधिका-यांनी आखली आहे.

बारामती तालुक्यातील तब्बल 21 ग्रामपंचायतीचे सदस्य भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. 14) हे प्रवेश करण्याचे नियोजन होते, मात्र मुख्यमंत्र्यांच्या वेळेचे गणित जमत नसल्याने इंदापूर व बारामतीच्या पदाधिका-यांचा प्रवेश इंदापूरच्या कार्यक्रमात करण्याचे नियोजन केल्याचे गावडे यांनी सांगितले. 

राज्यात भाजपकडे सर्वांचाच ओढा असल्याने बारामती तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींनीही भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी लेखी पत्रे दिली असल्याचे बाळासाहेब गावडे म्हणाले. अजूनही अनेक महत्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये येऊ इच्छित असून त्यांना टप्याटप्याने आम्ही सामावून घेणार आहोत. भाजपमध्ये येऊ इच्छिणा-या सर्वांसाठीच आम्ही आमचे दरवाजे खुले ठेवले असल्याचेही गावडे यांनी सांगितले. 

आम्ही निवडणूक सोडलेली नाही...
चंद्रकांत पाटील यांनी जरी बारामतीची निवडणूक जिंकणे हा आशावाद ठरेल असे नमूद केलेले असले तरी आम्ही ही निवडणूक सोडून दिलेली नाही, तुम्हाला काही दिवसानंतर या बाबत काही बाबी समोर आलेल्या दिसतील, असे सूचक वक्तव्य बाळासाहेब गावडे यांनी केले. 

उदयनराजे भोसले महाजनादेश यात्रेत सहभागी होणार...
दरम्यान रविवारपासून (ता. 15) उदयनमहाराज भोसले हे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत सहभागी होणार असल्याचेही बाळासाहेब गावडे यांनी सांगितले. भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केल्यानंतर ते मुख्यमंत्र्यांसमवेत पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख