वादग्रस्त विधानांसाठी भाजपकडूनच नेत्यांना प्रशिक्षण : राष्ट्रवादीची टीका 

वादग्रस्त विधानांसाठी भाजपकडूनच नेत्यांना प्रशिक्षण : राष्ट्रवादीची टीका 

दौंड : आमदार राम कदम यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांची वादग्रस्त वक्तव्ये अचानकपणे निघालेली नसून त्यांना त्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. कोणी कोणावर बोलायचे याचेदेखील प्रशिक्षण पक्षाकडून त्यांना दिले जात आहे, असा आरोप पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांनी केला आहे.
 
दौंड शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोरून गुरुवारी (ता. 6) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने इंधन दरवाढीकडे लक्ष वेधण्यासाठी काढण्यात आलेल्या सायकल रॅलीनंतर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोरील सभेत बोलताना आमदार थोरात यांनी हा आरोप केला.

 
पंचायत समिती सभापती झुंबर गायकवाड, उपसभापती प्रकाश नवले, उपनगराध्यक्ष राजेश जाधव, वैशाली नागवडे, राणी शेळके, अप्पासाहेब पवार, ऍड. अजित बलदोटा, बादशहा शेख, गुरुमुख नारंग, सोहेल खान, योगिनी दिवेकर, विकास खळदकर, रामचंद्र चौधरी, सयाजी ताकवणे, मीना धायगुडे, ताराबाई देवकाते, सचिन गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, ""लष्करातील सैनिक, छत्रपती शिवाजी महाराज आणि महिलांविषयी भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. आमदार राम कदम यांच्यासह महिलांचा अनादर करणाऱ्यांचा समाचार घेतलाच पाहिजे. इंधन दरवाढ आणि वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणूस भरडला गेला आहे. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्‍वासने न पाळता सरकार जनतेची फसवणूक करीत आहे. जाती-धर्मात भांडणे लावणारे सरकार मराठा, धनगर व मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर निर्णय घेत नाही.'' 

एरवी कोणत्याही घटनेवर ट्विट करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम कदम यांच्या विधानावर कोणतेही ट्विट न केल्याने महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी मुख्यमंत्री यांचा या वेळी निषेध केला. 

राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या पुढाकाराने राम कदम यांच्या प्रतिमेस जोडे मारून शहरातून धिंड काढण्यात आली. अप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे व प्रणोती चलवादी यांची या वेळी भाषणे झाली. नायब तहसीलदार धनाजी पाटील यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com