काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते भाजपने भिती दाखवून पळवले - अजित पवारांचा आरोप

''चौकशीची भीती दाखवून कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते भाजपने पळवले, भाजपचे सर्वच ज्येष्ठ नेत्यांना घरची वाट दाखवून तेथे लोकशाही नाही तर हुकूमशाही आहे हे मोदी शहांनी दाखवून दिले आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी साम दाम दंड भेद नीतीचा वापर भाजपकडून केला जात आहे. अशा शब्दात अजित पवार यांनी आज नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला बोल केला.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते भाजपने भिती दाखवून पळवले - अजित पवारांचा आरोप

बारामती शहर : ''चौकशीची भीती दाखवून कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते भाजपने पळवले, भाजपचे सर्वच ज्येष्ठ नेत्यांना घरची वाट दाखवून तेथे लोकशाही नाही तर हुकूमशाही आहे हे मोदी शहांनी दाखवून दिले आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी साम दाम दंड भेद नीतीचा वापर भाजपकडून केला जात आहे. अशा शब्दात अजित पवार यांनी आज नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला बोल केला.

राष्ट्रवादीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा श्री क्षेत्र कण्हेरी येथून आज प्रारंभ झाला. त्या वेळी झालेल्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. आजच्या मेळाव्यात अजित पवार यांनी केंद्र व राज्याच्या धोरणांवर कडाडून टीका केली. पवार म्हणाले, "राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यावर मोदी फडणवीस बोलायला तयारी नाहीत, बेरोजगारी, विकासाची झालेली अधोगती, अर्थव्यवस्थेला लागलेली घरघर या बाबत बोलायचे सोडून हिंदुत्ववाद आणि पवार कुटुंबियांवर टीका करण्यात पंतप्रधान वेळ घालवतात हे दुर्देवी आहे, या देशातील सर्वच घटक भाजपच्या सरकारला कंटाळले असून मतदारच निवडणुकीत परिवर्तन घडवतील. विकास सोडून इतर सर्व मुद्यांवर मोदींची सुरु असलेली चर्चा आश्चर्यकारक आहे. आमच्या काळात आम्ही परिपूर्ण विकासाचा प्रयत्न केला आणि शेतकरी व कष्टक-यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला."

धनगर समाजाची तर या सरकारने थेट फसवणूक केली असून धनगर समाजाने या निवडणुकीत या सरकारला जागा दाखवून द्यावी असे आवाहन पवार यांनी केले. भीमा पाटस कारखान्याला मदतीचे आमिष दाखवून राहुल कुल यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात तयार केल्याचाही आरोप त्यांनी केला.

गुणवत्तेवर मते मागते आहे.....
गेल्या दहा वर्षात लोकसभेत मेरीटमध्ये उत्तीर्ण झालेली खासदार असून गुणवत्तेच्या जोरावर मी मते मागायला आलेली आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. बारामतीकरांमुळे मी दिल्लीपासून ते युनोपर्यंत काम करु शकले याचे ऋण त्यांनी भाषणातून व्यक्त केले. कुपोषणमुक्त तालुका करण्यासह रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याच्या प्रयत्नांची ग्वाही त्यांनी दिली.

शिवतारे म्हणजे बोलका पोपट....
राज्यमंत्री विजय शिवतारे हा आमच्या तालुक्यातील बोलका पोपट आहे, अशा शब्दात कॉंग्रेसचे संजय जगताप यांनी शिवतारेंवर टीका केली. तुमच्या गावात पाणी नाही ते आधी बघा आणि मग आमच्यावर टीका करा, असा सल्ला त्यांनी शिवतारेंना दिला. भोर वेल्ह्यापासून इंदापूर व दौंडपासून खडकवासल्यापर्यंत सुप्रिया सुळेंबाबत सगळे आलबेल आहे, कॉंग्रेस त्यांच्यासोबत असून अफवांवर विश्वास ठेवू नका असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com