भाजप प्रदेशाध्यपदी कोणाची वर्णी, शिंदे, ठाकूर की हळवणकर

 भाजप प्रदेशाध्यपदी कोणाची वर्णी, शिंदे, ठाकूर की हळवणकर

पुणे : प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळातील प्रवेशानंतर प्रदेश भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. अनेक नावे समोर येऊ लागली आहेत. मात्र, आमदार सुरेश हळवणकर, सुरजितसिंग ठाकूर व जलसंधारण मंत्री राम शिंदे या तिघांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता असल्याचे पक्षातील विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. 

हळवणकर इचलकरंजीचे आमदार आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातून असल्याने त्यांच्या नावाला विशेष महत्व आहे. त्यांच्या नावाला पक्षातील अनेक महत्वाच्या नेत्यांची पसंती असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरजितसिंग ठाकूर हे पक्षातील युवा नेतृत्व म्हणून पुढे आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा हे त्यांचे मूळ गाव आहे. ठाकूर यांच्या संघटन कौशल्याचा पक्षात बोलबाला आहे. ते विधानपरिषदेवर आमदार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या "टीम'मध्ये सरचिटणीस म्हणून ठाकूर यांचे काम उल्लेखनीय आहे. ठाकूर सध्यादेखील पक्षाचे सरचिटणीस असून प्रदेश मुख्यालयाची मुंबईतील जबाबदारी त्यांच्याकडे आहे. 

राम शिंदे हे राज्य मंत्रीमंडळात जलसंधारण विभागाचे मंत्री आहेत. शिंदे हेदेखील आमदार हळवणकर व ठाकूर यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मर्जीतले मानले जातात. लोकसभा निवडणुकीत राज्यातील धनगर समाज भाजपाच्या विरोधात गेल्याचे दिसत आहे. या विरोधामुळे लोकसभेला फार नुकसान झाले नसले तरी विधानसभेचा विचार पक्षाला करावा लागणार आहे. राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाची मते निर्णायक ठरू शकतात. या पार्श्‍वभूमीवर शिंदे यांना प्रदेशाध्यक्षपद देऊन धनगर समाजाला शांत करण्याचा प्रयत्न पक्षाकडून होऊ शकतो. 

विधानसभा निवडणुकीची आचारसहिंता लागू होण्यास अवघा अडीच महिन्यांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाबाबत पक्षाला लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या संदर्भातील चित्र स्पष्ट होईल, असे या सूत्रांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com