संघर्ष यात्रेची भाजपलाही धास्ती
मुंबई : विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना, कॉंग्रेस राष्ट्रवादीकडून 29 मार्चपासून राज्य सरकारच्या विरोधात चांदा ते बांदा अशी संघर्ष यात्रा काढण्याचा कार्यक्रम जाहीर झाला असून, ग्रामीण भागात या संघर्ष यात्रेला जनतेतून किती प्रतिसाद मिळेल, याबाबत भाजपच्या थिंक टॅंकमध्ये विचार केला जात असून, सत्ताधारी भाजपला या संघर्ष यात्रेची थोडी धास्ती वाटत आहे.

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर कॉंग्रेस राष्ट्रवादीकडून आक्रमक पवित्रा घेत, कामकाज सुरळीत होऊ दिले नव्हते. विधानसभेतील 19 आमदारांना निलंबित केल्यानंतर कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.अर्थसंकल्पीय बिले मंजूर केली जात असली तरी, विरोधी पक्षाचा सदस्य नसल्यामुळे, जनतेत चुकीचा संदेश जावू नये यासाठीचा प्रयत्न सत्ताधारी भाजपकडून विरोधकांची मने वळविण्याचाही प्रयत्न केला जात आहे.
संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी 29 मार्चपासून सभागृहाच्या कामकाजात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. सत्ताधारी आणि विरोधक ही एकाच रथाची दोन चाके असून आमच्या सहकाऱ्यांना बाहेर ठेवणे योग्य वाटत नसल्याचे मतही गिरीश बापट यांनी व्यक्त केले. त्यातून जनतेचे प्रश्न सभागृहात मांडा, असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
विरोधी पक्षातील काही आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत असले तरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांकडून काढण्यात येणाऱ्या संघर्ष यात्रेला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळाल्यास राज्य सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या मागणीबरोबर, मंत्रालयात न्याय मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधी भावना जागृत करण्यास विरोधक यशस्वी होवू शकतात. तसे झाल्यास, सरकारच्या प्रतिमेला तडा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवार 29 मार्च 2017 रोजी चंद्रपूर येथून निघणारी संघर्ष यात्रा यवतमाळ, नागपूर, अमरावती,हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुण्याहून पनवेल येथे 3 एप्रिल 2017 रोजी समाप्त होणार आहे.