मराठेशाहीचे दोन छत्रपती आणि एक सरदार घराणे एकाच वेळी भाजपकडून राज्यसभेत!

....
sambajiraje-udayn-jyotiradi
sambajiraje-udayn-jyotiradi

सातारा : भाजपच्या केंद्रीय निवडणुक समितीची बैठक दिल्लीत केंद्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली. यामध्ये राज्यसभेच्या रिक्त सात जागांसाठी उमेदवारांची नावे निश्‍चित करण्यात आली. या यादीत साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा समावेश आहे. उदयनराजेंना राज्यसभेची उमेदवारी मिळणार का, याकडे समस्त सातारकरांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांचे नाव उमेदवारांच्या यादीत आले, त्यामुळे त्यांच्या समर्थकांसह सातारकरांचा जीव भांड्यात पडला.

मध्य प्रदेशमधून ज्योतिरादित्य शिंदे यांनाही भाजपने उमेदवारी दिली आहे. मराठेशाहीचे दोन्ही छत्रपती म्हणजे सातारा गादीचे उदयनराजे, कोल्हापूर गादीचे छत्रपती संभाजीराजे यामुळे आता राज्यसभेत असतील. दोन्ही छत्रपती कायदेमंडळाच्या एकाच सभागृहात असण्याची ही पहिलीच वेळ असेल. त्याच वेळी मराठेशाहीचे मातब्बर सरदार घराणे असलेले ग्वाल्हेरचे शिंदेही भाजपमध्ये गेले आहे. योगायोगाचा भाग म्हणजे हे तिघेही भाजपचे खासदार असणार आहेत. संभाजीराजे यांना तीन वर्षांपूर्वीच भाजपने राज्यसभेवर घेतले होते.

कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही गाद्यांच्या छत्रपतींना  देशातील इतर सरदार घराणी मान देत असतात. छत्रपतींना मुजरा करण्याची सरदारांची परंपरा आजही लग्न समारंभ किंवा इतर कौटुंबिक समारंभात पाळली जाते. मराठेशाहीचे मानबिंदू असलेली घराणी यानिमित्ताने अशीही एकत्र येणार आहेत. भाजपकडे महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशमध्य पुरेसे बहुमत असल्याने शिंदे आणि उदयनराजे यांना निवडून येण्यात अडचण नसल्याचे सांगण्यात आले.  

सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील पराभवानंतर उदयनराजेंना राज्यसभेवर घेण्याबाबत भाजपकडून प्रयत्न सुरू होते. त्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. मार्चमध्ये राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत आहेत. या जागांवर भाजपकडून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काल (मंगळवारी) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखानी भाजपच्या केंद्रीय निवडणुक समितीची बैठक झाली. या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी तसेच निवडणुक समितीचे सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपचे नऊ आणि मित्र पक्षातील दोघांचा उमेदवारांमध्ये समावेश केला आहे. यामध्ये आसाममधून भुवनेश्‍वर कालिता, बिहार मधून विवेक ठाकुर, गुजरातमधून अभय भारव्दाज, श्रीमती रमीलाबेन बारा, मणिपूरमधून लिएसेंबा महारांजा, मध्य प्रदेशातून ज्योतिरादित्य सिंधिया, महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले, राजस्थानमधून राजेंद्र गेहलोत तसेच मित्रपक्षांतून महाराष्ट्रातून आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, आसाममधून बीपीएफचे बुस्वजीत डाइमरी यांचा सामवेश आहे. दरम्यान, उद्या (गुरूवारी) दुपारी एक वाजता उदयनराजे भोसले आपल्या समर्थकांसह जाऊन मुंबईत अर्ज दाखल करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com