शिवसेनेला चुचकारत निवडणुकीची तयारी : भाजपाच्या रणनितीची संघाकडून अंमलबजावणी सुरू

एकीकडे शिवसेनेला चुचकारायचे आणि दुसरीकडे स्वबळावर आगामी निवडणुका लढण्याची जोरदार तयारी करायची, अशी रणनिती भारतीय जनता पक्षाने आखली आहे. या रणनितीच्या अंमलबजावणीस प्रत्यक्ष सुरूवात झाली असून बुथपातळीवर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले असून स्थानिक पातळीवर सर्वपक्षिय नेते, पदाधिकारी यांच्या ताकदीचा अंदाज घेतला जात आहे.
शिवसेनेला चुचकारत निवडणुकीची तयारी : भाजपाच्या रणनितीची संघाकडून अंमलबजावणी सुरू

मुंबई : एकीकडे शिवसेनेला चुचकारायचे आणि दुसरीकडे स्वबळावर आगामी निवडणुका लढण्याची जोरदार तयारी करायची, अशी रणनिती भारतीय जनता पक्षाने आखली आहे. या रणनितीच्या अंमलबजावणीस प्रत्यक्ष सुरूवात झाली असून बुथपातळीवर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले असून स्थानिक पातळीवर सर्वपक्षिय नेते, पदाधिकारी यांच्या ताकदीचा अंदाज घेतला जात आहे.

पाच हजार मतांचा मनसबदार ते विधानसभा निवडणुकीतील सक्षम उमेदवार यांचा शोध घेतला जात आहे. अशा पुढा-यांना गळाला लावण्याचे काम सुरू असून यासाठी आर्थिक बोलाचाली सुरू असून कागदावर आकडेमोड सुरू आहे.

केंद्रात आणि राज्यात शिवसेना हा पक्ष सध्या भाजपबरोबर सत्तेत असला तरी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेने अलिकडेच झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केली आहे. ही घोषणा भाजपाने गांभीर्याने घेतली आहे. मात्र, तसे न दाखवता तळागाळातून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिवसेना हा पक्ष स्वबळावर पुढील निवडणुका लढणार याची जाणीव झाल्यामुळे भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपा पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांना कामास लागण्याचे आवाहन केले होते.
त्यानुसार अगदी बुथ पातळीवरील भाजपाचे कार्यकर्ते, संघटनांचे पदाधिकारी, संघाचे कार्यकर्ते कामास लागले असून त्यांच्या गुप्त बैठकांना जोर आला आहे. यामध्ये इतर पक्षांतील ताकदवार नेत्यांना भाजपात येण्यास भाग पाडले जात आहे. अशा नेत्यांच्या मुख्यमंत्री फडणवीस, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, यांच्याशी फोनवरून बोलणे करून दिले जात आहे. तसेच आर्थिक रसद पुरवण्याची खात्री करून दिली जात आहे. यासाठी कोटीकोटींच्या आकडयांची बोलाचाली होत असल्याचे समजते.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका देशात एकाचवेळी घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी केल्यामुळे निवडणुका केव्हाही होउ शकतात याची खुणगाळ बांधून संघ परिवार कामास लागला आहे. 2014 मध्ये देशभरात नरेंद्र मोदी यांच्या बाजूने तर कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात लाट होती. या लाटेवर स्वार होउन भाजपाने केंद्रात स्वबळाचा आकडा गाठला तर राज्यात सर्वांत मोठा पक्ष म्हणून नोंद होताना सरकार स्थापन केले. मात्र, मागील साडेतीन वर्षांत मोदी लाटेचा करिष्मा ओसरला असल्याचे गुजरात विधानसभा निवडणुकीवरून स्पष्ट झाले आहे. याची जाणीव भाजपाच्या चाणक्‍यांना असल्याने स्वबळाची तयारी करायचीच मात्र शिवसेनेला दुखवायचे नाही, हे धोरण भाजपाने आखले आहे.

त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादाचे जाळे टाकून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असल्याचे मानले जाते. त्यामुळे स्वबळावर निवडणुका लढवताना शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांना मदत करणार का? असा प्रत्यक्ष सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे सध्या तरी शिवसेनेला चुचकारायची भुमिका भाजपाने घेतली असल्याचे मानले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com