शिवसेनेला सोबत घेण्यास भाजप एका पायावर तयार!

भाजप शिवसेनेला अर्थात श्री. रघुवंशी यांना सोबत घ्यायला एका पायावर तयार आहे. निवडणुकीपूर्वी सत्ता व जागा वाटपाची तडजोड डॉ. गावित व श्री. रघुवंशी यांच्यात होणार होती. मात्र जागा वाटपाचे समिकरण जुळले नाही म्हणून फिसकटले.
devendra-fadanvis-uddhav-thackray
devendra-fadanvis-uddhav-thackray

नंदुरबार : ः जिल्हा परिषदेच्या निकालानंतर भाजप, कॉंग्रेस आणि शिवसेनेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मुंबई दरबारी याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा, बैठकांना सरूवात झाली आहे. निवडणुका स्वबळावर लढल्या तरी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्याचा फार्मुला नंदुरबारात अंमलात आणला जाणार आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा पक्ष आणि उमेदवारांची संख्याही वाढली. सत्ता संघर्षापेक्षा सत्तेसाठी स्वार्थाचे राजकारण चव्हाट्यावर आले आहे. निवडणुकीतील घराणेशाहीसोबतच स्वार्थासाठी तुझे माझे जमेना, तुझ्या वाचूनि करमेना अशा घडामोडी दिसून आल्या. निवडणूकीपूर्वीच्या हालचाली, प्रत्यक्ष निवडणुकीतील चित्र यावरून मतदारही सतर्क झाले अन त्यांनी कुणालाच थेट सत्ता दिली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे चित्र निवडणुकीपूर्वीच स्पष्ट होते. त्यांना ज्या जागा मिळाल्या आहेत, त्याही भाजपप्रणित आहेत. तरीही त्यांनी स्वबळावर निवडणुकीची घेतलेली भूमिका चकीत करणारी आहे.

शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा प्रमुख डॉ. विक्रांत मोरे महाविकास आघाडीसाठी आग्रही होते. मात्र काँग्रेसने त्यांना प्रतिसाद दिला नाही. एकप्रकारे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीसाठी शिवसेनेला धुडकावून लावले होते. ती परिस्थिती म्हणजे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी अप्रत्यक्ष विरोध दर्शविणारी होती. ते माजी आमदार श्री. रघुवंशी यांच्या जिव्हारी लागली आहे.

विधानसभेतील रोष

श्री. रघुवंशी यांनी विधानसभा निवडणुकीत के.सी. पाडवी यांना पाडण्यासाठी सर्व ताकदीनिशी प्रयत्न केल्याचा राग के. सी. पाडवी यांना आहे. श्री. रघुवंशी यांनी पक्षादेशाचे पालन केले. त्यात त्यांचे काय चुकले? अशी चर्चा आहे. ते काँग्रेसमध्ये होते, तेव्हाही के.सी. यांना निवडून आणण्यासाठी आपली ताकद वापरलेली सर्वश्रृत आहे. त्यामुळे पक्षादेशाचे पालन करतांना वैयक्तिक कटूता बाळगून दोन्ही नेत्यांमध्ये विदुष्टता निर्माण झाली. शिवसेनेचे नेते रघुवंशी आहेत तर काँग्रेसचे नेते आता मंत्री श्री. पाडवी आहेत. त्यामुळे या दोघांच्याही बेबनावमुळे जिल्हा परिषदेत सत्तेचे समीकरण जुळणार नसल्याची चर्चा आहे.

सत्तेसाठी तडजोड़

जिल्हा परिषदेत काँग्रेस,भाजपचे प्रत्येकी २३ सदस्य आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे भाजप असो की, काँग्रेस दोघांनाही शिवसेनेला सोबत घ्यावेच लागेल. त्यासाठी भाजप नेत्यांकडून बैठका, चर्चांना सुरूवात झाली आहे. काँग्रेसचे नेते के. सी. पाडवी यांचा श्री. रघुवंशी यांच्यावर रोष असला तरी हातातून सत्ता जाऊ नये, हेही मंत्री म्हणून त्यांच्यावर तेवढेच जबाबदारी व प्रतिष्ठेचे आहे. भाजप शिवसेनेला अर्थात श्री. रघुवंशी यांना सोबत घ्यायला एका पायावर तयार आहे. निवडणुकीपूर्वी सत्ता व जागा वाटपाची तडजोड डॉ. गावित व श्री. रघुवंशी यांच्यात होणार होती. मात्र जागा वाटपाचे समिकरण जुळले नाही म्हणून फिसकटले. त्यामुळे काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांकडून शिवसेनेला म्हणजेच माजी आमदार श्री. रघुवंशी यांना आस लावून दूर सारल्यागत झाले. त्यामुळे दोन्ही पक्षांवर श्री. रघुवंशी स्वतः नाराज आहेत. मात्र शेवटी सत्तेसाठी त्यांनाही रागरोष विसरून तडजोड करावीच लागणार आहे.

भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत. स्थानिक नेत्यांवर प्रेशर सुरू झाला आहे. काहीही करा, जि. प. ताब्यात घ्या, त्यामुळे घडामोडींना वेग आला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री. रघुवंशी यांच्याशी जवळचे संबध आहेत. फडणवीस यांनी श्री. रघुवंशी यांना मदत केली आहे. त्याची परतफेड म्हणून ते भाजपशी जुळवून घेतात की काय असेही बोलले जात आहे. दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी यात लक्ष घातले आहे. भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी काँग्रेससोबतच जाण्यास त्यांचे प्राधान्य आहे. त्यासाठी आज मुंबईत महत्वपूर्ण बैठका झाल्या.त्यामुळे श्री. रघुवंशी व के.सी.पाडवी यांचे स्थानिक रागरोष असले तरी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्याचे सूत्र वापरले जाणार आहे. काँग्रेस व शिवसेनाच जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करेल. असा सूर उमटत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com