दिल्ली विधानसभेसाठी भाजपची भिस्त धार्मिक ध्रुवीकरणावरच !

 दिल्ली विधानसभेसाठी भाजपची भिस्त धार्मिक ध्रुवीकरणावरच !

नवी दिल्ली : काळा कायदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून (सीएए) दिल्लीच्या जामिया भागात झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा बनवून दिल्ली विधानसभेची अशक्‍यप्राय लढाई धार्मिक ध्रुवीकरणाच्या हत्याराने लढण्याचे भाजपचे मनसुबे उघड झाले आहेत. भाजप प्रभारी व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या हिंसाचाराबद्दल आम आदमी पक्ष व कॉंग्रेसला जबाबदार धरून दोन्ही पक्षांनी माफी मागावी अशी मागणी आज केली व त्यांच्यावर आरोपांची राळ उडविली. दिल्लीतील विधानसभा निवडणूक ही अराजकता विरूध्द राष्ट्रवाद अशी असेल असेही जावडेकर म्हणाले. 

दिल्ली विधानसभेच्या निवडणुका पुढील महिन्यात होण्याची चिन्हे आहेत. येथे अरविंद केजरीवाल यांच्या आपच्या झंझावातासमोर मोदींच्या चेहऱ्याचा आधार असूनही भाजप गलितगात्र अवस्थेत दिसत आहे. केजरीवाल सरकार दिल्लीकरांना पाणी, वीज, महिलांना बसप्रवास आदी गोष्टी अक्षरशः फुकट देत असताना मोदी सरकारने मात्र नव्या वर्षाच्या स्वागतालाच, स्वयंपाकाच्या गॅसपासून रेल्वे प्रवासापर्यंत महागाईचा जोरदार तडाखा जनतेला दिला. अनधिकृत कॉलनीज नियमित केल्याचा डिंडोरा पिटणाऱ्या मोदी सरकारने फक्त तोंडी मालकी देण्याचा खेळ चालविला असून या लाखो जागामालकांच्या नावावर त्या त्या घरांच्या नोंदणीची तरतूदच नसल्याचे बिंग "आप'ने नुकतेच फोडले. विकासाच्या मुद्यावर केजरीवालांना टक्कर देणे केवळ अशक्‍य असल्याचे जाणूनच भाजप नेतृत्वाने आता तुरळक हिंसाचाराच्या निमित्ताने ध्रुवीकरणाचा हुकमी पत्ता बाहेर काढल्याचे चित्र आहे. 

अंतर्गत गटबाजी व दिल्लीच्या नेत्यांमधील भांडणाने पोखरलेल्या दिल्ली भाजपच्या प्रभारीपदाची सूत्रे निवडणुकीच्या तोंडावर जावडेकर यांच्याकडे आली असून त्यांनी नव्या वर्षात जवळपास रोज पत्रकार परिषदांद्वारे आपवर हल्ले करण्याची रणनीती आखल्याचे दिसते. अमित शहा यांच्या गृहखात्याच्या ताब्यातील दिल्ली पोलिसांची जामियाच्या ग्रंथालयातील कथित घुसखोरी, डीटीसी बस जाळण्याआधी पोलिसांच्या संशयास्पद हालचाली यासारख्या घटनांमुळे दिल्लीतील तुरळक हिंसाचाराबाबत दिल्लीकरांच्या मनात संशय आहे. कारण त्या एक दोन तप्त दिवसांनंतर गेले महिनाभर शाहीन बाग-जामिया परिसरात कडाक्‍याच्या थंडीतही अत्यंत शांततेने अक्षरशः हजारोंची निदर्शने सुरूच आहेत. जावडेकर यांनी मात्र हिंसाचाराच्या चौकशीआधीच आप व कॉंग्रेसवर थेट आरोपपत्र ठेवले. 

सीएए कायद्याबाबत जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करून दोन्ही पक्षांनीच दंगल भडकावली असा त्यांनी आरोप केला. आपचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या जुन्या व कथित भाषणांचे दाखले देत जावडेकर यांनी, अमानतुल्ला हेच जामियातील दंगलींचे सूत्रधार असल्याचा आव आणला. प्रत्यक्षात मात्र त्या जाळपोळीच्या घटनांच्यावेळी तेथून कित्येक मैल दूर एका सभेत भाषण करत होतो असा खान यांनी दावा केला आहे. जावडेकर यांनी मात्र दोन्ही पक्षांनी सीएएबद्दल चुकीची माहिती देऊन लोकांना चिथावले असा ठपका ठेवला. सीलमपूरचे कांग्रेस नेते चौधरी मतीन, आप नेते इशराक खान, अब्दुल रहमान,अमानतुल्ला यांची नावे घेऊन जावडेकर यांनी आरोप केले. 

अजानवर बंदी येईल, बुरख्यावर बंदी येईल असे सांगून अमानतुल्ला यांनी जमावाला भडकावले असे सांगून ते म्हणाले की दिल्लीसारख्या शांत शहरात या दोन्ही पक्षांनी हिंसाचाराची आग लावली. दोघांनीही जनतेची जाहीर माफी मागावी. हा कायदा शरणार्थींना नागरिकत्व देण्याचा आहे व कोणाचेही काही घेण्याचा नाही हे जनतेच्या लक्षात आल्याने आता दिल्ली शांत आहे. मोदी सरकारने अनधिकृत कॉलनीज नियमित करून 40 लाख लोकांना न्याय दिला. आप कोणत्याही कामाचे श्रेय घेते व दिल्लीत, " काम करे कोई और टोपी पहेने कोई ' अशी अवस्था आहे. या कायद्याला राज्यसभेत आपनेही पाठिंबा दिला व आता हाच पक्ष त्यावर टीका करत आहे. 

प्रवेश वर्मा बोहल्यावर ! 
महाराष्ट्र व झारखंडपाठोपाठ दिल्लीत भाजपच्या दणकून पराभवाची हॅटट्रीक होण्याची चिन्हे उघड आहेत. भाजपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा शोधणेही कठीण झाले आहे. मनोज तिवारी, हरदीपसिंह पुरी, विजय गोयल आदी अनेक नेते स्पर्धेत आहेत. माजी मुख्यमंत्री साहेबसिंह वर्मा यांचे पुत्र, खासदार प्रवेश वर्मा यांचे नाव संभाव्य मुख्यमंत्री म्हणून भाजपाध्यक्षांच्या मनात घोळत असल्याचे दिसते. स्थानिक नेत्यांत मान्यता असलेल्या चेहऱ्याऐवजी लादलेला मुख्यमंत्री चेहरा जाहीर करण्याची चाल भाजप नेतृत्व दिल्लीतही खेळणार अशी चिन्हे आहेत. मात्र वर्मा यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आवश्‍यक जागांच्या एक पंचमांश जागाही भाजपला मिळतील का, असा प्रश्‍न भाजप कार्यकर्त्यांच्याच चेहऱ्यावर दिसत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com