जगत प्रकाश नड्डा पुढच्या आठवड्यात बनणार भाजपाध्यक्ष

भाजपच्या घटनेनुसार भाजपच्या राज्य शाखांपैकी किमान 20 शाखांतील प्रदेशाध्यक्षांनी ठरविलेल्या नेत्याची शिफारस नवे अध्यक्ष म्हणून करायची असते. संबंधित नेता किमान 15 वर्षे पक्षाचा सक्रिय सदस्य असावा लागतो. त्यानंतर पक्षाच्या संसदीय मंडळातील बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होते व नव्या अध्यक्षांची निवड जाहीर होते. भाजपच्या 50 टक्के प्रदेशाध्यक्षांची निवड होणे ही राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी अनिवार्य असते.
जगत प्रकाश नड्डा पुढच्या आठवड्यात बनणार भाजपाध्यक्ष

नवी दिल्ली : केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते जगत प्रकाश नड्डा यांची पुढील आठवड्यात अधिकृतपणे नियुक्ती करण्यात येईल. भाजपच्या राज्य शाखांच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अमित शहा यांची जागा नड्डा घेतील. 20 ते 22 जानेवारी दरम्यान पंतप्रधानांच्या सोयीनुसार हा बिनविरोध सोहळा पार पडेल. राज्यसभा सदस्य असलेले व शहांच्या तुलनेत मवाळ मानले जाणारे नड्डा हे सध्या पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. 

पक्षाध्यक्षपदाच्या जबाबदारीमुळे शहा यांना गृहमंत्रालयाकडे "अपेक्षित लक्ष' व वेळ देण्यास पुरेशी सवड मिळत नाही त्यामुळे भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने नड्डा यांच्याकडे पक्षाध्यक्षपद देण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारीच्या 8 तारखेस होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुका शहा यांच्याच नेतृत्वाखाली लढविण्याचा आग्रह दिल्लीतील काही नेत्यांनी धरला असला तरी दिल्लीत "आप'च्या प्रचंड आव्हानासमोर भाजपने ध्रुवीकरणाचे कार्ड खेळले तरी पक्षाला फारशी आशा नसल्याचे उमगल्यावर पक्षनेतृत्वाने नड्डा यांच्याकडे सूत्रे देण्याचे ठरविल्याचे समजते. 

बिहार व उत्तर प्रदेशाच्या निवडणुकाही नड्डा यांच्याच अध्यक्षतेखाली भाजप लढवेल हेही स्पष्ट आहे. नड्डा यांना मोदी व शहा दोघांचाही पाठिंबा असल्याने त्यांची बिनविरोध नियुक्ती काही आडकाठी न येता होणार हेही स्पष्ट झाले आहे. भाजपच्या राज्य निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रविवारी (ता.19) नड्डा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करतील. त्यानंतर 20 जानेवारी (पौष एकादशी) किंवा 22 तारखेला (मेरू त्रयोदशी) नड्डा यांची अधिकृत नियुक्ती केल्याचे पंतप्रधान व शहा यांच्या उपस्थितीत जाहीर केले जाईल. संक्रांतीनंतरच नड्डा यांच्या नावाची घोषणा करण्याचे भाजपने ठरविले होते. दरम्यानच्या काळात नड्डा यांनी भाजपच्या मातृसंस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांबरोबर दिल्लीत चर्चा केल्याची माहिती आहे. 

भाजपच्या घटनेनुसार भाजपच्या राज्य शाखांपैकी किमान 20 शाखांतील प्रदेशाध्यक्षांनी ठरविलेल्या नेत्याची शिफारस नवे अध्यक्ष म्हणून करायची असते. संबंधित नेता किमान 15 वर्षे पक्षाचा सक्रिय सदस्य असावा लागतो. त्यानंतर पक्षाच्या संसदीय मंडळातील बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होते व नव्या अध्यक्षांची निवड जाहीर होते. भाजपच्या 50 टक्के प्रदेशाध्यक्षांची निवड होणे ही राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी अनिवार्य असते. पुढच्या चार ते पाच दिवसांत पंजाबसह किमान सहा राज्यांमधील या निवडणुका पार पडतील. पक्षाच्या अंतर्गत संघटनात्मक निवडणुकींचे वेळापत्रकही यंदा गडबडले आहे. मात्र मोदी-शहांनी अंतिम आदेश दिल्यावर त्याही प्रक्रिया झटपट झाल्या व नड्डा यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com