मुंडेंच्या उपस्थितीत धसांनी उमेदवारी अर्ज भरला पण चर्चा निलंगेकरांच्या गैरहजेरीची

राजकारणात अनेक गोष्टी प्रतीकात्मक केल्या जातात . सुरेश धस यांच्या अर्ज भरण्याच्या प्रसंगी संभाजी निलंगेकर हजर असते तर भाजप कार्यकर्त्यांमध्ये या विजयासाठी पंकजा मुंडे आणि संभाजी निलंगेकर एकत्र आहेत असा संदेश गेला असता . निलंगेकरांना त्यांच्या भावासाठी ही जागा सुटावी असे वाटत होते . पण तसे झाले नाही त्यामुळे निलंगेकर नाराज आहेत असे सूत्रांचे म्हणणे आहे .
Nilangekar-Dhas-Munde
Nilangekar-Dhas-Munde

बीड :  लातूर -उस्मानाबाद- बीड स्थानिक स्वराज संस्था विधान परिषद मतदारसंघासाठी भाजपतर्फे सुरेश धस यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला पण राजकीय वर्तुळात चर्चा रंगले ती  मंत्री महोदय संभाजी पाटील निलंगेकर यांच्या गैरहजेरीची ! 

राजकारणात अनेक गोष्टी प्रतीकात्मक  केल्या जातात . सुरेश धस यांच्या अर्ज भरण्याच्या प्रसंगी संभाजी निलंगेकर हजर असते तर भाजप कार्यकर्त्यांमध्ये या विजयासाठी पंकजा मुंडे आणि संभाजी निलंगेकर एकत्र आहेत असा संदेश गेला असता . निलंगेकरांना त्यांच्या भावासाठी ही  जागा सुटावी असे वाटत होते . पण तसे झाले नाही त्यामुळे निलंगेकर नाराज आहेत असे सूत्रांचे म्हणणे आहे .  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांच्यातील राजकीय दुही सर्वश्रुत आहे. मात्र, या दोघांनी एकत्र येऊन राजकीय ताकद पणाला लावली तरच भाजपला येथे संधी आहे .  

काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या लातूर-उस्मानाबाद-बीड मतदार संघावर यावेळी  आपला झेंडा फडकावा अशी रणनीती  आखत भाजपने  सुरेश धस यांना रिंगणात उतरविले आहे. धसांच्या विजयाची मदार  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर राहणार आहे .  


काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या मतदार संघात राष्ट्रवादीने कुरघोडी करत भाजपमधून रमेश कराड यांना फोडून त्यांना उमेदवारीही दिली आणि त्यांचा अर्जही भरला. आता तर अधिकृतपणे हा मतदारसंघ काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडला आहे तर, सुरेश धस यांची उमेदवारी निश्चित असतानाही राजकीय खेळीचा भाग म्हणून उशिरापर्यंत नावाची घोषणा केली नाही. या मतदार संघात आजघडीला राष्ट्रवादी व काँग्रेसच्या मतांची बेरीज भाजप - शिवसेनेपेक्षा अधिक आहे. एकतर आघाडीचे पारडे जड आणि वरुन उमेदवारही तगडा आहे. 

दरम्यान, आगामी सार्वत्रिक निवडणुकांची रंगीत तालीम  समजल्या जाणाऱ्या विधान परिषद निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याचे ध्येय भाजपने आखले आहे. त्यामुळे आघाडीला टक्कर देण्याची राजकीय क्षमता आणि राजकीय डावपेचांत पारांगत असल्याने फोडाफोडीची क्षमता लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांना उमेदवारी दिली आहे. धस यांचे नाव निश्चित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे व संभाजी पाटील निलंगेकर यांचे एकमत घडविण्याबरोबरच प्रचाराची धुरा आणि विजयाची जबाबदारी या दोघांच्या खांद्यावर टाकली आहे. 

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गुरुवार (ता. तीन) अंतिम मुदत असल्याने बुधवारी रात्री उशिरा पत्रकातून तशी माहिती देण्यात आली. यामध्ये पंकजा मुंडेंसह संभाजी निलंगेकर व भाजपचे तीन जिल्ह्यातील आमदारांच्या उपस्थितीत उस्मानाबादेत अर्ज दाखल करण्याचे घोषीत करण्यात आले. मात्र, गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करायला पंकजा मुंडे आणि जिल्ह्यातील त्यांचे सर्व शिलेदार हजर होते. अगदी सुरेश धसांचे राजकीय प्रतिस्पर्धी आमदार भीमराव धोंडेही हजर असताना मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची गैरहजेरी प्रकर्षाने दिसली.

 सुरेश धस हे शिवसेना, रासप, शिवसंग्राम, रिपाईं महायतीचे उमेदवार असे जाहिर केले असले तरी या पक्षांचेही कोणी बडे नेते उमेदवारी अर्ज दाखल करताना नव्हते. मात्र, लातूरचे खासदार सुनिल गायकवाड आमदार विनायकराव पाटील, आमदार सुधाकर भालेकर, उस्मानाबादचे सुरजितसिंह ठाकूर हजर होते. बीड जिल्ह्यातील खासदारांसह सर्व आमदार आणि भाजप नेते हजर असले तरी चर्चा झाली ती संभाजी पाटलांच्या अनुपस्थितीची. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com