BJP plans to go every household | Sarkarnama

भाजपा 15 दिवस राबविणार देशभरात घरटी जनसंपर्क अभियान

संदीप खांडगेपाटील
शनिवार, 29 एप्रिल 2017

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीही केंद्र सरकारचा कार्यक्रम तळागाळात समजावून सांगण्यासाठी 95 दिवसाचा काश्मिर ते कन्याकुमारीपर्यतचा दौरा आयोजित केला आहे. महाराष्ट्रामधील कार्यकर्त्यांना व पक्षीय पदाधिकार्‍यांना तसेच लोकप्रतिनिधींना त्यांनी सतत घरटी संपर्कात राहावे याकरिता जून महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यामध्ये अमित शाह महाराष्ट्र दौर्‍यावर येणार आहेत.

मुंबई : केंद्रात व विविध राज्यांमध्ये तसेच त्या त्या राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाला मिळत असलेल्या यशामुळे पक्षामध्ये शैथिल्य आणि कार्यकर्त्यांमध्ये स्थिरता येवू नये या उद्देशाने केंद्र सरकार व त्या त्या राज्य सरकारच्या माध्यमातून केलेल्या लोककल्याणकारी कामाची माहिती देशाच्या कानाकोपर्‍यातील घराघरामध्ये पोहोचविण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून 15 दिवस देशभरात घरटी जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे.

पक्षाला मिळत असलेल्या यशामुळे कार्यकर्ते, पक्षीय पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांच्यामध्ये यशाचा कैफ चढू नये याकरीता भाजपाकडून देशभरात जनसंपर्क अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 25 मे ते 8 जून 2017 या कालावधीत भाजपाकडून देशभरात हे घरटी जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपाकडून महाराष्ट्रात हे अभियान राबविण्याकरीता स्थानिक पातळीवरील बैठकांना सुरूवातही झालेली आहे.

केंद्र सरकारने तीन वर्षाच्या कालावधीत आणि महाराष्ट्र सरकारने मागील अडीच वर्षाच्या काळात कोणकोणते लोकल्याणकारी निर्णय घेतले, कोणकोणत्या योजना राबविल्या, मागच्या सरकारच्या तुलनेत आपली कामगिरी कशी उजवी व कशी प्रभावी आहे, हे घराघरात जावून प्रत्येक नागरिकाला भाजपाचे लोकप्रतिनिधी, पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते पटवून देणार आहे. भाजपा हे अभियान केवळ कागदोपत्री न राबविता अगदी गावपातळीवर बुथनिहाय हे अभियान राबविणार आहे. शहरी भागातील पदाधिकार्‍यांवर ग्रामीण भागाची जबाबदारी सोपविण्यात येणार असून त्यांना अभियान पूर्ण होईपर्यत, त्या भागातील शेवटच्या माणसाचा संपर्क होईपर्यत मुक्काम ठोकण्याचे आदेशही भाजपाकडून देण्यात आले आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीही केंद्र सरकारचा कार्यक्रम तळागाळात समजावून सांगण्यासाठी 95 दिवसाचा काश्मिर ते कन्याकुमारीपर्यतचा दौरा आयोजित केला आहे. महाराष्ट्रामधील कार्यकर्त्यांना व पक्षीय पदाधिकार्‍यांना तसेच लोकप्रतिनिधींना त्यांनी सतत घरटी संपर्कात राहावे याकरिता जून महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यामध्ये अमित शाह महाराष्ट्र दौर्‍यावर येणार आहेत.

या अभियानामध्ये शहरी, ग्रामीण, डोंगराळ, आदिवासी यासह झोपडपट्टी सर्वच भागात बुथनिहाय घरटी संपर्क अभियान करण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले असून कोठे कोठे कितपत प्रभावी अभियान राबविण्यात आले आहे, याचा आढावाही पक्षसंघटनेकडून घेण्यात येणार आहे. 25 ते 8 जून या कालावधीत आपल्या परिसरात घरटी जनसंपर्क सुसंवाद अभियान राबविण्याकरित्या त्या त्या भागातील आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित करण्यास सुरूवात केली आहे. घरटी जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून तळागाळातील घटकांपर्यत सरकारची माहिती पोहोचविणे, काम करणार्‍या कार्यकर्त्यांना पारखून घेणे असा दुहेरी उद्देश यानिमित्ताने भाजपाचा यशस्वी होणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख