भाजप,राष्ट्रवादीच्या तोफा शनिवारी पिंपरीत धडाडणार 

 भाजप,राष्ट्रवादीच्या तोफा शनिवारी पिंपरीत धडाडणार 

पिंपरी ः येत्या 3 नोव्हेबररोजी पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा राजकीय धुरळा उडणार आहे. कारण यादिवशी भाजप आणि राष्ट्रवादीच्या मुलूखमैदानी तोफा शहरात धडाडणार आहेत. एकूणच पुणे जिल्ह्मातील मावळ व शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघावर व त्यातील पिंपरी-चिंचवडवर शिवसेना,भाजपसह राष्ट्रवादीनेही लक्ष केंद्रीत केल्याचे 
यातून स्पष्ट होत आहे. 

भाजपच्या राज्यातील आगामी लोकसभा प्रचाराचा अप्रत्यक्ष प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे शहरातील परवाच्या सभेने करणार आहेत. तर, याच दिवशी राष्ट्रवादीचे मावळमधील लोकसभेचे इच्छूक संजोग वाघेरे-पाटील यांच्या कै. भिकू वाघेरे प्रतिष्ठान आयोजित कामगार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राज्यातील नेते अजित पवार हे शहरात उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त वाघेरे शक्तीप्रदर्शन करतील. तर, दुसरीकडे भाजपचे मावळमधील इच्छूक आणि शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप हे सुद्धा आपली ताकद मुख्यमंत्र्यांसमोर दाखवतील, असा अंदाज आहे. तशी तयारीही त्यांनी सुरु केली आहे. 

पहिली सभा अराजकीय असली,तरी त्यात पवार काय बोलतात,याकडे शहराचे लक्ष लागले आहे. त्यात त्यांनी राजकीय भाष्य केले,तर त्यानंतर होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री त्याला काय उत्तर देतात, याकडेही राजकीय क्षेत्राचे कान लागले आहेत. 

शिवसेना,भाजपसह राष्ट्रवादीनेही पुणे जिल्ह्मातील चारपैकी शिरूर व मावळवरच अधिक लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील जागा राष्ट्रवादी ही कॉंग्रेसला सोडण्याची शक्‍यता आहे.तर, बारामतीत ते निर्धास्त आहेत. त्यामुळे एकेकाळचे आपले गड असलेले शिरूर व मावळवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. दुसरीकडे शिवसेना हे दोन्ही गड शाबूत ठेवण्याच्या तयारीत आहे. त्यातूनच शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गेल्या महिन्यात 22 तारखेला खेड (जि.पुणे) येथे जंगी सभा घेतली.तर, आज मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी त्यांनी जाहीर सभा घाटाखाली घेतली. 

दरम्यान, केंद्रात स्वबळावर सत्तेत येण्यासाठी साडेतीनशे खासदार निवडून आणण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे.त्यातूनच त्यांनी शिरूर व मावळपैकी मावळमध्ये कमळ फुलविण्याचा निश्‍चय केला आहे. त्याच्या तयारीचा भाग म्हणून खेडच्या ठाकरे यांच्या सभेनंतर चार दिवसांतच 26 तारखेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिरूर व मावळमधील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा शहरात घेतला. तर, परवा मुख्यमंत्री राज्यातील लोकसभा प्रचाराची तुतारीच पिंपरीतून फुंकणार आहे. एकूणच काही महिने अवकाश असला व निवडणूक जाहीर झाली नसली,तरी उद्योगनगरीत, मात्र आतापासूनच राजकीय घमासान सुरु झाले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com