पवारांचा बालेकिल्ला अन्‌ भाजपची अपरिहार्यता!

महाराष्ट्राच्या राजकारणातील 'पॉवर' आणि भाजपचा बलाढ्य प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अर्थात पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख... मात्र, लोकसभा आणि विधानसभा तसेच, त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पुणे जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली खरी... पण, तीन वर्षांच्या काळात भाजपचा जिल्ह्यातील जोर ओसरलेला दिसतो.
पवारांचा बालेकिल्ला अन्‌ भाजपची अपरिहार्यता!

पिंपरी : महाराष्ट्राच्या राजकारणातील 'पॉवर' आणि भाजपचा बलाढ्य प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अर्थात पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख... मात्र, लोकसभा आणि विधानसभा तसेच, त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पुणे जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली खरी... पण, तीन वर्षांच्या काळात भाजपचा जिल्ह्यातील जोर ओसरलेला दिसतो. कारण, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात अवघ्या ९ ग्रामपंचातींवर भाजपचे सरपंच निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आपली पाळेमुळे घट्ट करण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींना आता गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.

पुणे जिल्हा म्हटले की, भाजपचा प्रमुख चेहरा म्हणून पालकमंत्री गिरीश बापट यांचे नाव समोर येते. राज्याचे संसदीय कामकाज आणि अन्न व पुरवठा मंत्रीपदाची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या बापट यांना ग्रामीण भागात भाजप रुजवता आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. पुण्यातील राजकारणात व्यग्र असलेल्या बापट यांना जिल्ह्यावर पक्कड असलेल्या अजित पवार यांच्या तोडीचे काम गेल्या तीन वर्षांत करता आलेले नाही. वास्तविक, जिल्ह्यात मराठा आणि माळी समाजाचे वर्चस्व आहे. पेशाने शेतकरी व माळी-मराठा समाजाची संख्या सुमारे ६० टक्के आहे. त्यामुळे मराठा आणि माळी समाजाशी नाळ असलेल्या नेतृत्त्वाची पुणे जिल्ह्यात भाजपला नितांत गरज आहे.

विशेष म्हणजे, प्रचंड मोदी लाटेत, बारामतीमध्ये पवार यांनी विजय खेचून आणला होता. तसेच, आंबेगाव, इंदापूर, पुरंदर, खेड, पिंपरी, दौंड, जुन्नर, भोर आदी ठिकाणी भाजपच्या विरोधी पक्षातील आमदार आहेत. सध्या जिल्ह्यात भाजपने गिरीश बापट आणि दिलीप कांबळे यांना मंत्रिपदाची धुरा देवून जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजप वाढण्याची जबाबदारी दिली होती. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामीण भागात आजही काँग्रेस, राष्ट्रवादी मजबूत असल्याचे निकालांवरुन दिसत आहे.

दुसरीकडे, पुणे जिल्ह्यात बारामती, पुणे, शिरुर आणि मावळ असे चार लोकसभा मतदार संघ येतात. यापैकी, केवळ एक म्हणजे पुणे मतदार संघात भाजपकडून अनिल शिरोळे निवडून आले आहेत. मावळ आणि शिरुरमधून शिवसेनेचे खासदार आहेत. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी बालेकिल्ला कायम ठेवला आहे. लोकसभा आणि विधानसभा सदस्यांचा विचार केला असता, सध्यस्थितीला जिल्ह्यात भाजपला 'मास लीडर' नाही. जिल्ह्यात २१ पैकी केवळ १२ आमदार भाजपचे आहेत. तसेच, अन्य चार विधान परिषद सदस्यही अन्य पक्षाचे आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आगामी काळात होणा-या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप ग्रामीण भागाशी नाळ जोडलेल्या चेह-याला संधी देवून, पक्ष विस्ताराची रणनिती आखावी लागणार आहे. अन्यथा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला 'बॅकफूट'वर जावे लागेल, अशी शक्यता राजकीय जाणकारांमधून वर्तवण्यात येत आहे.  

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्याबाबत विधान केले होते. दिवाळीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात पुणे जिल्ह्यातून ग्रामीण भागाचे नेतृत्त्व करु शकेल, शेतक-यांच्या प्रश्नांची जाण असलेला आणि शहरी भागातील युवकांचे नेतृत्त्व करण्यास सक्षम असलेल्या आमदारला मंत्रिपदाची संधी देण्याची आवश्यकता आहे.

सध्यस्थितीला मावळातून भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेडगे, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, हडपसरचे आमदार योगेश टिळेकर आणि भाजपचे सहयोगी सदस्य व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यापैकी एकाला मंत्रिपदाची 'लॉटरी' लागणार, अशी चर्चा आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांची कसरत...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दबदबा असलेल्या पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला रोखण्याचे पहिले आव्‍हान भाजपसमोर आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांना 'टक्कर' देवू शकेल, असा चेहरा मुख्यमंत्री फडणवीस यांना शोधावा लागणार आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री फडणवीस आणि पालमंत्री बापट यांच्यात 'पारदर्शी सख्य' दिसत नाही. परिणामी, मंत्रिपदाची संधी मुख्यमंत्र्यांना आपल्या विश्वासातील आमदारला द्यावी लागणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात पुणे जिल्ह्याचा विचार करताना मुख्यमंत्री फडणवीस यांची कसरत होणार आहे.

भाजपला शेतक-यांची गरज नाही?
राज्यातील बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्याबाबत चाकण येथे नुकतेच राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आमदार महेश लांडगे यांच्या व्यतिरिक्त भाजपचा एकही नेता फिरकला नाही. वास्तविक, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यतीवरुन भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. मात्र, आमदार लांडगे यांनी 'पेटा' ही संस्था शेतक-यांचा खरा शत्रू आहे, असे सांगत भाजप सरकारची बाजू घेतली. विशेष म्हणजे, आमदार लांडगे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. पण, शेतक-यांच्या आंदोलनात सरकारची थेट बाजू घेण्याचे धाडस त्यांनी दाखवले. पण, पालकमंत्री अथवा भाजपचा एकही बडा नेता सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने घेतलेल्या बैलगाडा आंदोलनात सहभागी झाला नाही. त्यामुळे भाजपला आता शेतक-यांची गरज नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शेतकरी संपाची भाजपला झळ..?
शेतक-यांच्या संपामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाला होती. आता शेतक-यांचा संपाचे केंद्रबिंदू पुणे जिल्हा होणार आहे. शेतक-यांचा दुसरा संप पुणे जिल्ह्यातील दौंडमधून सुरू होणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या संपाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते 'फुंकर' घालणार आहेत. जिल्ह्यात दिलीप वळसे-पाटील, विजय शिवतारे, संग्राम थोपटे, दत्तात्रय भरणे आदी नेत्यांनी आपआपला गड 'चिरेबंदी' ठेवला आहे. त्यामुळे शेतक-यांच्या संपाची प्रमुख झळ भारतीय जनता पक्षाला बसणार आहे. त्यामुळे शेतक-यांच्या हक्कासाठी लढणारा चेहरा भाजपकडे जिल्ह्यात तयार करण्याची अपरिहार्यता भाजपश्रेष्ठांवर आहे.

बाळा भेगडे अपयशी जिल्हाध्यक्ष..?
पुणे जिल्ह्यातील साखर कारखाने आणि सहकारी दूध संघांवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे वर्चस्व आहे. सहकारी संस्था या राष्ट्रवादीची बलस्थाने आहेत. शेतकरी पिढ्यान पिढ्या या संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रवादी आणि संबंधित नेत्यांच्या घराण्याशी जोडलेले आहेत. पुणे जिल्ह्यातील ९ सहकारी साखर कारखान्यांवर राष्ट्रवादी-काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे भाजपला ग्रामीण भागात ताकद वाढविण्यासाठी प्रभावी नियोजन करावे लागणार आहे. मात्र, देशात आणि राज्यात भाजप सरकार असतानाही जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांना जिल्ह्यात भाजपचे बस्थान बसविता आले नाही. त्यामुळे भाजपला आता 'मास लीडर'ची गरज आहे. त्यामुळे पवारांची अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसची वतनदारी घालवायची असेल, तर भाजपला नव्या दमाचा दमदार सुभेदार निवडण्याची गरज आहे, ही वस्तुस्थिती आता मान्य करावी लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com