bjp mp meeting | Sarkarnama

भाजपच्या 265 खासदारांपैकी जेमतेम 100 जणांची उपस्थिती 

सकाळ न्यूज नेटवर्क 
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या आज सकाळी झालेल्या संसदीय बैठकीत खासदारांची उपस्थिती चांगलीच रोडावल्याचे बघायला मिळाले. पक्षाच्या सुमारे 265 खासदारांपैकी जेमतेम 100 खासदारच बैठकीला उपस्थित असल्याचे यातील छायाचित्रच बोलत आहेत. 

नवी दिल्ली : सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या आज सकाळी झालेल्या संसदीय बैठकीत खासदारांची उपस्थिती चांगलीच रोडावल्याचे बघायला मिळाले. पक्षाच्या सुमारे 265 खासदारांपैकी जेमतेम 100 खासदारच बैठकीला उपस्थित असल्याचे यातील छायाचित्रच बोलत आहेत. 

तीन हिंदी भाषक राज्यांच्या निवडणूक निकालांनंतर झालेली ही पहिलीच संसदीय बैठक होती, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या पराभवाचे पितृत्व स्वीकारणे तर दूरच; पण आपल्या सुमारे सव्वा तासाच्या भाषणात निवडणुकीचा "न'देखील उच्चारला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. सायंकाळी होणाऱ्या प्रदेशाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा विषय चर्चेला येईल, असे सांगण्यात आले. 

मोदी राजवटीत भाजप संसदीय बैठकांना हजर राहाणे, खासदारांवर बंधनकारक असल्याने अधिवेशनाच्या काळातील या साप्ताहिक बैठकांत संसद ग्रंथालय इमारतीतील बालयोगी सभागृह भरून गेलेले असे. किंबहुना मोदी सत्तेवर आल्यावर अगदी सुरवातीला तर उशिरा आलेल्या खासदारांना दारातच उभे करणे, मागे बसवून ठेवणे, काही लाख जनतेचे प्रतिनिधी असलेल्या या लोकप्रतिनिधींचा उशीर झाल्याबद्दल जाहीर उल्लेख करणे अशाही "शिक्षा' दिल्या गेल्याच्या बातम्या होत्या. 

मोदींना देवाच्या दूतासारख्या उपमा दिल्या गेल्या, त्याही अशाच एका बैठकीत. मात्र, गेल्या 11 तारखेच्या राज्यांच्या विधानसभा निकालांनंतर अपराजित नेतृत्व या मोदींच्या प्रतिमेला जोरदार धक्का बसला. यापूर्वी दिल्ली, बिहार, ओडिशा आदी राज्यांत मोदींच्या नेतृत्वाची जादू चालली नव्हती, तरी ताजा पराभव हा भाजपच्या गड मानल्या जाणाऱ्या राज्यांतील असल्याने तेथील पराभव खासदारांच्या मनोधैर्यावरही विपरीत परिणाम करणारा ठरल्याचे चित्र हिवाळी अधिवेशनात दिसते आहे. 

मोदी-अमित शहा यांचा धाक जाणविण्याचे प्रमाणही कमी झाले की काय, असी शंका यावी, असे चित्र आज संसदीय बैठकीत पाहायला मिळाले. पक्षाचे केवळ 100 खासदारच बैठकीस हजर होते. सुरवातीच्या रांगा सोडल्या, तर बालयोगी सभागृहातील मागच्या संपूर्ण रांगा रिकाम्याच होत्या. अर्थात, अनेक खासदार उशिरा पोहोचले, दिल्लीच्या थंडीमुळे त्यांना उशीर झाला किंवा छायाचित्रकारांना बाहेर घालविल्यानंतर अनेक खासदार आले, अशी सारवासारव पक्षसूत्रांनी केली. 

पंतप्रधानांनी आज माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून अटलजींच्या आठवणी जागविल्या. त्याचप्रमाणे संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार, ज्येष्ठ खासदार भोला सिंह आदींच्या निधनाबद्दलही त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. अनंतकुमार यांच्याही आठवणींचा पट त्यांनी उलगडला. अटलजींच्या मार्गदर्शनानुसार चालून खासदारांनी देशाची सेवा करावी, असे आवाहन त्यांनी केले. मात्र, खासदारांना अपेक्षा होती ती मोदींकडून विधानसभा निकालांबद्दल काही भाष्य होईल याची. तथापि, मोदींनी या बैठकीत पक्षाच्या पराभवाबद्दल बोलण्याचे संपूर्णपणे टाळले. यामुळे खासदारांतही आश्‍चर्य व्यक्त होत होते. 

राज्यसभेत आज "कावेरी'वर चर्चा? 
भाजप संसदीय बैठकीनंतर संसद हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहून खासदार धावतपळत राज्यभेत पोहोचले. मात्र, आजही तमिळनाडूच्या खासदारांनी कावेरी पाणीवाटपाच्या मुद्यावरून कामकाज रोखून धरल्याने अवघ्या पाच-सात मिनिटांत कामकाज दिवसभरासाठी गुंडाळले गेले. राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू हे काहीही करून कामकाज चालवायचेच, यासाठी आग्रही आहेत. त्यासाठी उद्या (ता.14) प्रश्‍नोत्तर तास व शून्य प्रहर रद्द करून कावेरी मुद्यावर विशेष चर्चा घेण्याचा तोडगा नायडू यांनी काढला आहे. तो मान्य झाल्यास उद्या राज्यसभा कामकाज पूर्वार्धात तरी सुरळीत चालेल, अशी आशा आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख