आमदार पै.राहुल ढिकलेंचा दिवस सुरू होतो तासभर धावल्यानंतर !  - bjp mla rahul dhikale fitness fanda | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार पै.राहुल ढिकलेंचा दिवस सुरू होतो तासभर धावल्यानंतर ! 

संपत देवगिरे 
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

"प्रत्येकाने दैनंदीन जीवनात व्यायाम केलाच पाहिजे. केवळ तंदुरुस्तीसाठी नव्हे तर धावपळीच्या आयुष्यात ताणतणाव मुक्त व आनंदी राहता येते. कामाचा ताण येत नाही. आनंदी राहण्यासाठीच मी नियमीत व्यायाम करतो.' 
राहुल ढिकले, आमदार, भाजप 

शरीर कमावण्याचं आणि तंदुरूस्त राहण्याचा बाळकडू वडील कै. उत्तमराव ढिकले यांनी पाजले. घरात राजकारण होतं. तेही खासदार होते. वयाच्या बाराव्या वर्षी तालमीतील लाल मातीत उतरलो पुढे पहिलवान झालो. अनेक वर्षे तालमीत घाम गाळत, खडाखडी केली. मी आमदार आहे. घाईगडबड असते, वेळ कमी पडतो हे खरं असली तरी सकाळी तासभर धावल्याशिवाय माझ्या दिवसाला सुरवातच होत नाही. धावलो नाही की मला अस्वस्थ वाटते असे भाजपचे आमदार राहुल ढिकले सांगून जातात. 

राहुल ढिकले नाशिक पूर्व मतदारसंघातून निवडून आले आहेत. वडील खासदार होते आता मुलगा आमदार बनला आहे. आमदार होण्यापूर्वी नगरसेवक, महापालिका स्थायी समितीचे सभापती तसेच विविध संस्थांसह सामाजिक उपक्रमांत विविध जबाबदाऱ्या पार पाडलेल्या राहुल यांनी राजकारणात राहुनही आपली व्यायामाची आवड कधी थांबविली नाही.

राहुल यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले, की उत्तमराव ढिकले यांनी नगरपालिकेचे नगराध्यक्ष, महापालिकेचे नगरसेवक, नाशिक साखर कारखान्याचे अध्यक्ष, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष, नाशिकचे महापौर, खासदार, आमदार अशा जवळ जवळ सर्वच पदावर काम केले आहे. हा वारसा फक्त राजकारणापुरता सिमीत नाही. माझ्या वडीलांनाही तालमीची आवड होती. जिल्हा तालीम संघाचे अनेक वर्षे ते अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांनी तालमीचे हे संस्कार माझ्यात रुजवले. 

े वयाच्या बाराव्या वर्षापासून शहरातील दांडेकर- दीक्षित तालमीच्या आखाड्यात मी जात असे. येथे त्यांनी रोजच्या कसरतीबरोबरच बी. बी. क्षिरसागर, सेना दलाचे प्रशिक्षक रामदास सुरोडे यांच्याकडून कुस्तीचे प्रशिक्षण घेतले. शालेयस्तरापासूनच ते विविध स्पर्धांत भाग घेतला. एक मल्ल म्हणून माझे नाव झळकत होते.

मी गावपातळीपासून ते आंतरविद्यापिठीय स्पर्धात, तीन वेळा महाराष्ट्र हिंद केसरी स्पर्धेसह विविध स्पर्धांत सहभागी झालो होतो. 1995 मध्ये झालेल्या नाशिकच्या महापौर कसेरी स्पर्धेत ते विजयी होत मानाच्या गदेचे मी मानकरी ठरलो याचा आजही आनंद वाटतो हे सांगण्यासही आमदार ढिकले विसरले नाहीत. 

बालपणापासून तालमीची सवय असल्याने आता रोज व्यायाम केल्याशिवाय स्वस्थता लाभत नाही असेही त्यांचे म्हणणे आहे. 

नाशिकातील गोल्फ क्‍लबच्या मैदानावर अथवा अन्य ट्रॅकवर किमान तासभर ते धावतात. पोहण्याच्या व्यायामामुळे कार्यक्षमता वाढते. अगदी निवडणूक प्रचारात दहा दाह तास चालणे असेल किंवा प्रत्येक घरापर्यंत पोचणे असेल अथवा मतदारसंघ पिंजून काढणे असेल. ज्या लोकप्रतिनिधींची फिटनेस असतो त्यांना थकवा जाणवत नाही. आयुष्यात व्यायामाला किती महत्त्व आहे हे ढिकले यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख