BJP Mla Namita Mundada Donated Handsomely for Patient Relatives Food | Sarkarnama

आमदार नमिता मुंदडांमुळे रुग्णांच्या चारशे नातेवाईकांची महिनाभराचा जेवणाचा प्रश्न सुटला

दत्ता देशमुख
शुक्रवार, 27 मार्च 2020

अंबाजोगाईच्या स्वामी रामानंदतीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दूरवरुन रुग्ण येतात. संचारबंदीमुळे या रुग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणाचे हाल होत होते. त्यांच्या किराणा मालासाठी नमिता मुंदडा यांनी स्वत:ही मोठी रक्कम देऊन चारशे व्यक्तींना महिनाभर पुरेल येवढा किराणा सामान दिले.

अंबाजोगाई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदी, संचारबंदी आदी उपाय योजना राबविण्यात येत आहेत. परिणामी, हॉटेल आणि खानावळी बंद आहेत. गावाकडून जेवण आणायचे तर वाहतूकही बंद आहे. यामुळे येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचे तीन दिवसांपासून जेवणाचे हाल सुरु होते. मात्र, आमदार नमिता मुंदडा यांनी यासाठी पुढाकार घेतल्याने चारशे नातेवाईकांना महिनाभर जेवणाची सोय होणार आहे.

यासाठी लागणारा किराणा गुरुवारी ज्येष्ठ नेते आणि त्यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांनी रुग्णालय प्रशासनाला सुपूर्द केला. आता या अडचणीच्या काळातील रुग्णांच्या नातेवाईकांची महिनाभर जेवणाची भ्रांत संपणार आहे. अंबाजोगाई येथे आशिया खंडातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. जिल्ह्यातील एकमेव या महाविद्यालयात हिंगोली, परभणी जिल्ह्यातूनही रुग्ण येतात. दरम्यान, ता. २४ रोजी जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली संचारबंदी आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचे जाहीर केलेले लॉकडाऊन यामुळे हॉटेल, वाहतूक सर्व बंद आहे. रुग्णांना रुग्णालयाकडून जेवण दिले जाते. पण, त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाचा यक्षप्रश्न निर्माण झाला हेता.

गावाकडून जेवण मागवायाचे तर वाहतूकही बंद. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. यामुळे नातेवाईकांचा हा प्रश्न सोडविण्यासाठी केज मतदार संघाच्या भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी पुढाकार घेत रुग्णांच्या नातेवाईकांचा जेवणाचा प्रश्न सोडविला. आमदार मुंदडा यांच्या वतीने ज्येष्ठ नेते व त्यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांनी दिड लाख रुपये यासाठी दिले. तर, त्यांच्या ताब्यात असलेल्या अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीनेही या कामात एक लाख रुपये दिले. त्यातून ४०० व्यक्तींसाठी महिनाभर चहा, नाश्ता आणि दोन वेळेसच्या जेवणासाठीचे गहू, तांदूळ, डाळ, तेल, मसाला, साखर, चहापत्ती, पोहे आदी किराणा सामान खरेदी करुन ते स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. 

यावेळी नंदकिशोर मुंदडा, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, सभापती मधुकर काचगुंडे, डॉ. संदीप थोरात, ॲड. जयसिंग चव्हाण, व्यापारी राजेश भन्साळी, वैजनाथ देशमुख, ॲड. संतोष लोमटे, अभिजीत गाठाळ आदी उपस्थित होते. यापुढे रुग्णालय प्रशासनाकडून पाकशाळेत भोजन तयार करून ते नातेवाईकांनाही देण्यात येणार आहे. स्वतः पुढाकार घेऊन योगदान देत रुग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणाचा प्रश्न सोडविल्याबद्दल अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी आमदार मुंदडा आणि बाजार समितीचे आभार मानले आहेत. प्रतिदिन ४०० व्यक्तींना महिनाभर म्हणजेच एकूण १२ हजार व्यक्तींना याचा लाभ होणार आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख