कर्जमाफीआधीच भाजप आमदार कुचे यांची पोस्टरबाजी - bjp mla kuche | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

कर्जमाफीआधीच भाजप आमदार कुचे यांची पोस्टरबाजी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 जून 2017

औरंगाबाद : कर्जमाफीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतानाच भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच सत्ताधारी पक्षाचे बदनापूर येथील आमदार नारायण कुचे यांनी आपल्या मतदारसंघात सरकारचे अभिनंदन करणारे पोस्टर लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

औरंगाबाद : कर्जमाफीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतानाच भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच सत्ताधारी पक्षाचे बदनापूर येथील आमदार नारायण कुचे यांनी आपल्या मतदारसंघात सरकारचे अभिनंदन करणारे पोस्टर लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

विशेष म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष दानवे यांचे आभार व अभिनंदन या पोस्टमधून करण्यात आले आहे. शेतकरी संपाचा भडका उडालेला असताना शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याचे सांगत कॉंग्रेससह विविध संघटनांनी या पोस्टरबाजी विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

कर्जमाफीसह इतर मागण्यासाठी राज्यातील शेतकरी 1 जूनपासून संपावर गेला आहे. शेतकरी संघटनेच्या एका कोअर कमिटीशी झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांचा संप मागे घेण्यात आल्याची घोषणा देखील करण्यात आली होती. यावरून बरेच वादंग निर्माण झाले होते. काल शेतकऱ्यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंद हाकेला देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. दरम्यान, जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघाचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी अंबड व बदनापूर परिसरात शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याबद्दल अभिनंदन करणारे पोस्टर जागोजागी लावले.

रात्रीतून लावण्यात आलेले हे पोस्टर सकाळी जेव्हा शेतकरी व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पाहिले तेव्हा त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा कधी केली? याची चौकशी व तपास जो तो आपापल्या परीने करत होता. दुसरीकडे मात्र शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन करत होता. सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा कुठलाही अधिकृत निर्णय घेतलेला नसताना नारायण कुचे यांनी ही पोस्टरबाजी का केली? असा सवाल शेतकरी व सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत होते. 

कॉंग्रेसकडून निषेध 
बदनापूरसह अंबड तालुक्‍यात देखील नारायण कुचे यांनी सरकारचे अभिनंदन करणारे पोस्टर लावले होते. हा प्रकार समजताच कॉंग्रेसने आंदोलन करत आमदार कुचे व भाजप सरकारचा निषेध केला. शेतकऱ्यांची चेष्टा करणारा हा प्रकार असून हे पोस्टर तत्काळ हटवावे अशी मागणी देखील कॉंग्रेसने केली आहे. दरम्यान, मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बदनापूरजवळ लावण्यात आलेल्या पोस्टरजवळ जाऊन बोंबा मारो आंदोलन करत नारायण कुचे व मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 
पोस्टरमध्ये गैर काय? 
अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे अभिनंदन 
करणारे पोस्टर मी मतदारसंघात लावले आहेत. मुख्यमंत्र्यानी घेतलेला निर्णय सगळ्यांनाच माहीत आहे. मी लावलेल्या पोस्टरवरून विनाकारण राजकारण केले जात आहे. असा युक्तिवाद आमदार नारायण कुचे यांनी या साऱ्या प्रकाराबद्दल केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख