आमदार संजीवरेड्डी बोदकुरवारांनी हाणली होमगार्डच्या कानशिलात ? - bjp mla bodkurwar slaps homeguard? | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवारांनी हाणली होमगार्डच्या कानशिलात ?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 डिसेंबर 2019

कर्तव्यावर असलेल्या होमगार्डने दुचाकी चलन केल्याच्या कारणावरून वणीचे भाजप आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी काल सायंकाळी सात वाजताच्या सुमारास टिळक चौकात होमगार्डच्या कानशिलात हाणल्याची जोरदार चर्चा आहे. पण या घटनेचा प्रत्यक्षदर्शी नसल्याचे सांगण्यात येते. होमगार्डच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी आमदार बोदकुरवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वणी (जि. यवतमाळ) ः कर्तव्यावर असलेल्या होमगार्डने दुचाकी चलन केल्याच्या कारणावरून वणीचे भाजप आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी काल सायंकाळी सात वाजताच्या सुमारास टिळक चौकात होमगार्डच्या कानशिलात हाणल्याची जोरदार चर्चा आहे. पण या घटनेचा प्रत्यक्षदर्शी नसल्याचे सांगण्यात येते. होमगार्डच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी आमदार बोदकुरवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी जिल्हा वाहतूक विभागाची उपशाखा सुरू करण्यात आली. या विभागात पोलीस कर्मचारी कमी असल्याने त्यांच्या मदतीकरिता 20 होमगार्ड देण्यात आले. सोमवारी होमगार्ड प्रकाश बोढे हे टीळक चौकात वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक व्यवस्था सुरळीत करीत असताना एम.एच. 29 - ए.क्‍यू. 7853 या दुचाकीने ट्रीपल सीट जाणाऱ्या युवकांना थांबवले आणि चलन फाडावे लागेल, असे सांगितले. त्या तिघांपैकी एका युवकाने आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना माहिती दिली.

आमदार बोदकुरवार आपल्या वाहनाने टिळक चौकात आले. कर्तव्यावरील होमगार्ड खाकी पॅंट आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट घालून होता. आमदारांनी त्याला "गणवेशात का नाही', असा प्रश्न केला आणि कानशिलात हाणली, असे सांगण्यात येते.

होमगार्ड प्रकाश बोढे यांनी तात्काळ वाहतूक विभागाचे कार्यालय गाठले आणि घडलेली हकीकत अधिकाऱ्यांना सांगितली. मात्र काही वेळाने मला मारले नसल्याचा पवित्रा होमगार्ड ने घेतला व शासकीय काम करीत असताना आमदार बोदकुरवार यांनी माझ्या कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार वणी पोलिसांत दिली. आमदार बोदकुरवार यांच्या विरोधात पोलिसांनी कलम 186 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टी पॉईंट वर केला होता चक्का जाम
वाहतूक पोलीस गावाबाहेर उभे राहुन शहरात येणाऱ्यांना अडवून विविध नियमांचा धाक दाखवून वसुली करत असल्याने आमदार बोदकुरवार यांनी काही दिवसांपूर्वी वरोरा मार्गावरील टी पॉईंट वर रास्ता रोको आंदोलन केले होते.

मारहाण केली नाही
शहरात आमदारांनी होमगार्डला मारहाण केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आमदार बोदकुरवार यांनी मात्र मी मारहाण केली नसल्याचे सांगितले. सदर होमगार्ड हा कर्तव्यावर असताना गणवेशात नव्हता. त्यामुळे मी त्याचा हात धरून गणवेशात का नाही, येवढेच फक्त विचारले, असेही ते म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख