BJP May loose one seat in Rajyasabha due to MahaViaks Aghadi
BJP May loose one seat in Rajyasabha due to MahaViaks Aghadi

महाविकास आघाडीचा भाजपला 'असा' बसू शकतो फटका!

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्याने येत्या राज्यसभा निवडणुकीत भाजपला एका जागचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. येत्या मार्च महिन्यात होऊ घातलेल्या राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत अपक्ष तसेच छोट्या पक्षांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे

मुंबई :  राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्याने येत्या राज्यसभा निवडणुकीत भाजपला एका जागचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. येत्या मार्च महिन्यात होऊ घातलेल्या राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत अपक्ष तसेच छोट्या पक्षांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. या निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार दिल्यास सातव्या जागेसाठी चुरस होण्याची शक्‍यता आहे. राज्यसभेसाठी खुले मतदान असल्याने आघाडीचे पाच आणि भाजपचे दोन उमेदवार निवडून जाऊ शकतात. सध्या भाजपचे तीन खासदार निवृत्त होत आहेत.

शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्र येत महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन केली. आघाडीने आगामी निवडणुका एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक आघाडी म्हणूनच लढवली जाईल. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी पहिल्या पसंतीची 37 मते आवश्‍यक आहेत. त्यामुळे आघाडीचे चार तर भाजपचे दोन उमेदवार आरामात निवडून येतील. शिल्लक राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न राहिल. 

मात्र अपक्ष आणि अन्य लहान पक्षाचे आमदार सत्तेच्या बाजूने उभे राहत असल्याची उदाहरणे असल्याने ही मते आघाडीच्या पारडयात पडू शकतात. त्यामुळे राज्यसभेसाठी निवडणूक झाल्यास सातव्या जागेसाठी चुरस रंगणार आहे. मात्र, अलिकडच्या काळात राज्यसभेची निवडणूक टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा कल राहिला आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्याचेही प्रयत्न दोन्ही बाजूने होऊ शकतात.

महाराष्ट्र विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात सदस्यांची मुदत येत्या 2 एप्रिल 2020 रोजी संपत आहे. राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये राष्ट्रवादीच्या दोन तर कॉंग्रेस, शिवसेना, भाजप, आरपीआयच्या प्रत्येकी एक आणि भाजपचे समर्थक अपक्ष खासदार संजय काकडे यांचा समावेश आहे. त्यामुळे या सात जागांसाठी फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक घोषित होण्याची शक्‍यता आहे.

विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानावेळी आघाडीच्या बाजूने 169 मते पडली होती. आघाडीकडे 170 मते आहेत. मतदानावेळी एमआयएम, मनसे आणि कम्युनिस्ट पक्षाचे आमदार तटस्थ राहिले होते. त्यामुळे भाजपकडे स्वत:ची 105 आणि इतर 9 अशी एकूण 114 मते आहेत.

राज्यसभेतून निवृत्त होणारे सदस्य

राष्ट्रवादी कॉंग्रेस : शरद पवार, अॅड. माजिद मेमन, कॉंग्रेस : हुसेन दलवाई, शिवसेना : राजकुमार धूत, भाजप : अमर साबळे, रामदास आठवले, भाजप समर्थक अपक्ष खासदार : संजय काकडे

विधानसभेतील पक्षनिहाय संख्याबळ

भाजप- 105, शिवसेना- 56, राष्ट्रवादी कॉंग्रेस- 54, कॉंग्रेस- 44, बहुजन विकास आघाडी - 03, समाजवादी पक्ष - 02, एमआयएम-02, प्रहार जनशक्ति - 02, मनसे-01, सीपीआयएम 01, स्वाभिमानी पक्ष -01, रासप-01, जनसुराज्य 01, क्रांतीकारी शेतकरी पक्ष - 01, अपक्ष -13

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com