जयंत पाटील यांच्या विरोधात वैभव नायकवडींना भाजप उमेदवारी देणार?

Vaibhav Naikawdi - Jayant Patil - Nishikant Patil
Vaibhav Naikawdi - Jayant Patil - Nishikant Patil

इस्लामपूर  : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी भाजपतर्फे हुतात्मा उद्योग समूहाचे नेते वैभव नायकवडी याना पक्षात घेण्याचे युद्धपातळीवर हालचाली सुरू असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. इस्लामपूरचे नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांना इस्लामपूर मतदारसंघातील जयंत पाटील विरोधी निर्माण झालेल्या सर्वपक्षीय विकास आघाडीतूनच टोकाचा विरोध असल्याचे समोर येत आहे. निशिकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्याविरोधात लढण्याची जोरदार तयारी केली असली तरी त्यांना विविध पातळ्यांवर रोखण्यासाठी एक गट सक्रिय झाला आहे.

2016 ला झालेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील यांच्याविरोधात सर्वपक्षीय विकास आघाडी एकवटली. परिणामी चांगले यश त्यांच्या पदरात पडले. दरम्यान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला. विकास आघाडीत फूट पडली. आता हीच विकास आघाडी निशिकांत पाटील यांना जमेत न धरता आगामी विधानसभा निवडणुकीत लढण्यासाठी सज्ज झाली आहे.

येत्या निवडणुकीत जयंत पाटील यांना कोण चांगले आव्हान देऊ शकेल याची चाचपणी सुरू आहे. 2009 ला हुतात्मा समूहाचे नेते वैभव नायकवडी यांनी जयंत पाटील यांच्याविरोधात चांगली लढत दिली होती. तोच धागा पकडून आताही त्यांनाच पुढे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विकास आघाडीने अलीकडेच घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्या, आम्ही तो निवडून आणू, असे जाहीर वक्तव्य केले आहे. त्यामध्ये रयत क्रांतीचे सागर खोत, शिवसेनेचे आनंदराव पवार, भाजपचे विक्रम पाटील, राहुल महाडिक, गौरव नायकवडी यांनी भूमिका मांडली. यात त्यांनी चुकूनही निशिकांत पाटील यांचा संदर्भ येऊ दिला नाही.

दुसरीकडे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी थेट जयंत पाटील यांना वेळोवेळी आव्हान देत उरावर घेतले आहे. इस्लामपूर मतदारसंघात चांगली संपर्कयंत्रणा राबवून निशिकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेतली आहे. मतदारसंघात लागलेल्या 'अबकी बार, दादा आमदार' या डिजिटलची दखल खुद्द राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही एका दौऱ्यात घेतली होती. भाषणात 'डिजिटल लावून कुणी आमदार होत नसते, त्याला लोकांची कामे करावी लागतात' असा टोला हाणला होता. 

निशिकांत पाटील यांना विविध पातळ्यांवर घेरण्याचे प्रयत्न सुरू असताना ते मात्र 'एकला चलो रे' च्या भूमिकेत आहेत. वैभव नायकवडी याना भाजपात आणण्यासाठी विकास आघाडी प्रयत्नशील आहे. 2009 ला जयंत पाटील यांना 1,10,673 इतकी तर नायकवडी याना 56165 इतकी मते पडली होती. जयंत पाटील यांच्याविरोधात आजवर सर्वाधिक मते घेणारे विरोधक उमेदवार नायकवडी ठरले आहेत. पाटील यांच्या सहावेळच्या निवडणुकीत सर्वात कमी मताधिक्य याच निवडणुकीतील आहे. त्यामुळे विकास आघाडीत नायकवडी यांच्या नावासाठी सहमती मिळण्याचे संकेत आहेत.

जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या पराभवासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रकांत पाटील स्वतः जबाबदारी घेणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांच्या प्रतिष्ठेची ठरणार यात शंका नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com