ठाणे : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्यावर किरीट सोमय्यांची स्वारी

शिवसेना विरोधक अशी प्रतिमा असलेले भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडे ठाण्याची जबाबदारी दिली असल्यने या मतदारसंघात भाजप अधिक आक्रमकपणे रिंगणत उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
eknath_shinde_
eknath_shinde_

ठाणे : विधानसभेचे पडघम वाजू लागल्यानंतर भले भाजपा आणि शिवसेना नेते जाहीरपणे युतीच्या आणाभाका घेत असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यंमध्ये चलबिचल सुरु आहे. अशावेळी भाजपाने तर ठाणे जिल्ह्यातील आपले विधानसभा मतदारसंघ बांधण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत.

त्यातही शिवसेना विरोधक अशी प्रतिमा असलेले भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडे ठाण्याची जबाबदारी दिली असल्यने या मतदारसंघात भाजप अधिक आक्रमकपणे रिंगणत उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठाणे शहराला शिवसेनेच्या इतिहासात एक वेगळे स्थान आहे. विकासापेक्षा शिवसेना ही अस्मितेच्या विषयावर आरुढ होऊन यशाची शिखरे पादाक्रांत राहीली आहे. कधी मराठीचा मुद्दा, तर कधी परप्रांतीय, राम मंदिर अशा विषयावर शिवसेना कायम पुढे राहीली आहे. अशावेळी ठाणे शहर देखील शिवसेनेसाठी अस्मितेचा विषय ठरला आहे.

 शिवसेनेची स्थापना भले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मंुबईत केली असली तरी शिवसेनेला खऱया अर्थाने पहिली सत्ता दिली ती ठाणे शहराने. या शहराने शिवसेनेला सतिश प्रधान यांच्या रुपाने पहिला नगराध्यक्ष दिला होता. त्यानंतरही ठाणे महापालिकेतील महापैारपद मोजक्या चार वर्षाचा अपवाद वगळता कायम शिवसेनेकडे राहिले आहे. अशावेळी ठाणे शहराला राजकीय दृष्टया शिवसेनेला बालेकिल्ला ही ओळख मिळाली होती.

पण गेल्या विधानसभेत भाजपाचे संजय केळकर यांनी या बालेकिल्यावर जोरदार आक्रमण करुन शिवसेनेचे रविंद्र फाटक यांचा पराभव केला होता. हा पराभव ठाण्यातील नाही तर मंुबईतील शिवसेना नेत्यांच्या जिव्हारी लागला होता. विशेष म्हणजे विधानसभेनंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणूकीत शहरातील मतदारांनी भरभरुन भाजपाच्या पारडयात मते दिल्याने मुख्य शहर परिसरातून तब्बल एकोणीस नगरसेवक भाजपाचे निवडून आलेले आहेत.

 अशा वातावरणात शिवसेनेच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यात आता भाजपाची मजबुत तटबंदी उभी राहिली आहे. असे असतानाही पुढील विधानसभेत ही जागा वाटपात शिवसेनेला मिळेल असा आशावाद काही शिवसेना नेत्यांना आहे. पण ठाण्याची जबाबदारी थेट किरीट सोमय्या यांच्याकडे दिली असल्याने भाजपा ही जागा कितपत सेनेला सोडेल याबाबत सांशकता आहे.

मंुबईत वारंवार शिवसेनेच्या विरोधात बोलल्याने सोमय्या यांना यंदाच्या लोकसभेच्या निवडणूकीत भाजपाला तिकिट नाकारावे लागले होते. असा शिवसेना विरोधाचा सल असलेल्या नेत्याला ठाण्याची जबाबदारी देऊन भाजपाच्या नेतृत्त्वाने ठाण्याबाबतचे संकेत स्पष्ट केले असल्याची माहिती भाजपमधील सुत्रांनी दिली. विशेष म्हणजे सोमय्या यांनी सुत्रे हाती घेतल्यापासून प्रत्येक नगरसेवकाच्या घरी चहापानासाठी जाण्यास सुरवात केली आहे. 

केवळ चहापानासाठी हा विषय मर्यादीत नसून यावेळी त्या प्रभागातील भाजपाच्या पदाधिकऱयांना त्यातही बुथप्रमुख, शक्तीप्रमुख या पदावरील कार्यकर्त्यांना आर्वजून बोलाविले जात आहे. सध्या या कार्यकर्त्यांना दिवसाला किमान पंचवीस लोकांबरोबर संवाद साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

त्यातही या बैठकीत भाजपाचे अनेक कार्यकर्ते युतीच्या विरोधात वारंवार भूमिका मांडत असल्याचे कळते. त्याबाबत वरिष्ठ नेते जाहिपणे काही बोलत नसले तरी ठाण्याची तटबंदी मजबुत करण्यासाठी भाजापाने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. अशावेळी शिवसेनेला भले त्यांच्या अस्मितेसाठी ठाणे हवे असले तरी भाजपा जिंकलेला हा गड कितपत सोडेल याबाबत आजच्या घडीला सांशकता निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com