bjp leaders will take tea at your home | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

आधण ठेवा..! भाजप नेते तुमच्याकडे चहा प्यायला येणार...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

निवडणूक तयारीसाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढविण्यात भाजप नेते सध्या आघाडीवर आहेत. पाच राज्यांतील निवडणुकांसह लोकसभा निवडणुकीसाठी अशा क्लुप्त्या आखण्यात आल्या आहेत. आता नाराज मंडळींच्या घरी मंत्र्यांसह जाऊन तेथे चहा घ्यायचा आहे. ते नुसता चहा घेणार नाहीत तर तुम्हाला सरकारची कामगिरीही सांगणार आहेत.

नवी दिल्ली : तेलंगणासह आगामी पाच राज्यांच्या निवडणुका व पाठोपाठ येणाऱ्या 2019 च्या रणधुमाळीसाठी सत्तारूढ भाजपने प्रत्यक्ष "ग्राउंड वर्क'ची जोरदार आखणी सुरू केली आहे. यात "टी-20' हा प्रचाराचा नवा फॉर्म्यूला तयार करण्यात आला असून, "नमो ऍप'चा नवा अवतारही लवकरच समोर आणण्यात येणार आहे.

 
"टी-20' अंतर्गत भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने, नेत्याने, तसेच आमदार-खासदार व मंत्र्यांनी प्रत्येकी 20 लोकांच्या घरी जाऊन चहापान करण्याची योजना आखण्यात आली आहे. या चहापानाचा गोषवारा सर्व नेत्यांना थेट दिल्लीत पक्षप्रमुखांना देणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचे भाजप सूत्रांनी सांगितले. 

नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत भाजपकडे पुन्हा सत्तेत येण्यासाठी नरेंद्र मोदी हे एकमेव नेते असल्याचे पक्षनेत्यांच्या मनावर ठसविण्यात आले. जेथे जेथे सामाजिक अस्थिरता, दलितांमधील नाराजी व पक्षाविरुद्ध रोष दिसेल त्या-त्या भागांची नावे दिल्लीला पाठवा, तेथे मोदीजींच्या सभा लावण्यात येतील, असा शब्द पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पक्षनेत्यांना दिल्याचे समजते. 

स्वतः शहा यांनी राजस्थानपासून मध्य प्रदेशापर्यंतचा भाग पिंजून काढण्याची मोहीम सुरू केलेली असतानाच कार्यकर्त्यांसाठी अन्य कार्यक्रमांचीही आखणी करण्यात आली आहे. यातच "टी-20' या नव्या योजनेचा अंतर्भाव आहे. या चहापान मोहिमेत प्रत्येक कार्यकर्ता वा नेता ज्या 10घरी जाईल तेथे चहा घेता घेता तो मोदी सरकारने केलेल्या उज्ज्वला, जन धन, मुद्रा आदी लोककल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती संबंधितांना देईल. 

पुढच्या आठवड्यात "नमो ऍप'चे आधुनिक प्रारूप समोर येणार आहे. यात पक्षकार्यकर्त्यांसाठी एक नवा विभाग जोडला जाणार आहे. कॉंग्रेससह विरोधकांच्या आरोपांमधील फोलपणा उलगडून दाखविणारा खास दृकश्राव्य विभागही यात असेल. 

ग्रामीण भागांत जा! 

मतदान केंद्रे मजबूत करण्याचा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वीच दिलेला आहे. त्यानुसार "बूथ टोळी' व "एक बूथ-दस यूथ' ही मोहीमही लवकरच पुन्हा कार्यान्वित केली जाईल. "टी-20' योजनेबाबत पक्षाचे खासदार-आमदार, मंत्री आदींना पक्षाध्यक्षांनी पत्र पाठवून माहिती दिली आहे. याद्वारे देशातील एकही घर सुटता कामा नये, असा दंडक घालण्यात आला आहे. मंत्री-खासदार-आमदार यांनी ग्रामीण भागांतच जावे, असेही बजावण्यात आल्याचे सूत्रांनी नमूद केले. निवडणुकीच्या तोंडावर त्या-त्या राज्यांत व नंतर देशभरात मोदींच्या "थ्री-डी' सभांचेही नियोजन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात यासाठीचे "रथ' सज्ज होत आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख