शिवसेनेच्या   शिवराळ  भाषेतील घोषणांनी आणि आंदोलनामुळे भाजप नेते  अस्वस्थ  

bjp-shivesen
bjp-shivesen

मुंबई  :  केंद्रात आणि राज्यात सत्तेत राहून विरोधकांची भूमिका निभावणाऱ्या शिवसेनेच्या पेट्रोल - डिझेल भाववाढी विरोधातील  आंदोलनामुळे  आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात शिवराळ भाषेतील  घोषणाबाजीमुळे  भाजपमध्ये  अस्वस्थता निर्माण झाली आहे .   

महागाई, पेट्रोल-डिझेलचे गगनाला भडकलेले दर याविरोधात राज्यभरात शिवसेनेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. शिवसेनेच्या या नव्या भूमिकेमुळे भाजपत अस्वस्थता वाढली असून शिवसेनेला कसे थोपवायचे, याची चिंता भाजपला लागली आहे. 

केंद्र सरकार अथवा राज्य सरकार यांची ध्येयधोरणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात खरमरीत टीका करण्यास शिवसेना मागेपुढे पाहत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून ते शिवसेनेचे मंत्री, नेते, पदाधिकारी भाजपवर तोंडसुख घेत असतात. 

सत्तेत राहून भाजपवर टीकेच्या फैरी झाडण्याची विरोधकाची भूमिका शिवसेना बजावत आहे. मात्र शिवसेनेने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची पहिलीच वेळ आहे. जनतेच्या जिव्हाळयाचे, शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्‍नांवर बोलत राहणारच! सरकारमध्ये सामील असलो तरीही जनतेच्या हितापोटी राज्य सरकारला, केंद्र सरकारला झोडत राहणारच, अशी शिवसेनेची भूमिका आहे. 

मात्र गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोलचे भाव चढे राहिले आहेत. पेट्रोलच्या किमतीने उच्चांक गाठला आहे. याचा जनतेच्या जीवनमानावर प्रतिकूल परिणाम होतो. या कारणावरून शिवसेनेने नागपूरपासून मुंबई शहरासह राज्यातील कानाकोपऱ्यात आंदोलन केले. 

रस्त्यावर उतरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार निषेधाच्या घोषणा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात शिवसेनेने आंदोलनात वापरलेली शिवराळ भाषा आणि घोषणांमुळे भाजप कार्यकर्त्यात कटुतेची भावना आहे .  यापूर्वी जाहीर सभा, वृत्तपत्रांतून भाजपवर फटकारे शिवसेनेकडून ओढले जात होते. मात्र या रस्त्यावरील आंदोलनामुळे शिवसेनेची ही भूमिका भाजपला हैराण करणारी असल्याचे मानले जाते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com