भाजपची शिवसेनेवर प्रेमाची लाइन कायम! महाराष्ट्रात म्हणे भाजपचे नाही तर एनडीएचे सरकार येणार!

भाजपची शिवसेनेवर प्रेमाची लाइन कायम! महाराष्ट्रात म्हणे भाजपचे नाही तर एनडीएचे सरकार येणार!

पुणे ः भारतीय जनता पक्षाने ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजप शक्तिशाली पार्टी झाल्याचा संदेश दिला. या मेळाव्यात काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस या दोन्ही पक्षांवर अपेक्षेप्रमाणे कडवट टीका झाली. मात्र रोज सरकारवर विरोधी पक्षांइतक्याच आक्रमकपणे तुटून पडणाऱ्या शिवसेनेवरील प्रेमाची लाइन भाजपने कायम ठेवली आहे. 

शिवसेना त्यांच्या मेळाव्यात भाजपवर कडवट टीका करत असताना भाजपने शिवसेनेला मात्र दुखावले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरवातील भाजपच्या स्थापनेसाठी कष्ट घेतलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जींपासून ते अटलबिहारी वाजपेयी अशा सर्व नेत्यांच्या नावांचा उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव त्यांनी भाषणात वारंवार घेतले.

``मी इथे एका व्यक्तीचा उल्लेख करणार आहे. ती व्यक्ती आपल्या पक्षाची नसेल. मात्र ज्यांनी हिंदुत्वाचा जागर ज्यांनी केला. भारतीय जनता पक्षासोबत महाराष्ट्रात युती करून ज्यांनी महाराष्ट्र धर्म जागवला. त्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा देखील उल्लेख करणे महत्त्वाचे आहे. त्यांना या ठिकाणी अभिवादन करतो,``अशा शब्दांत फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंविषयी आदर व्यक्त केला.

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर या पुढे पाऊल टाकले होते. शिवसेनेला गांडूळ म्हणणाऱया अजित पवार यांच्यावर पाटील यांनी भाजपच्या मेळाव्यात सडकून टीका केली. शिवसेना आणि भाजपचे सरकार उत्तम सुरू आहे. शिवसेनेचे काम चांगले असल्याचे प्रमाणपत्र पाटील यांनी या वेळी दिले.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीही शिवसेना दुखावली जाणार नाही, याची काळजी या वेळी घेतली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली २०१९ ची निवडणूक जिंकण्याचा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी करावी, असे आवाहन त्यांनी केले. त्यासाठी घरोघरी जाऊन मतदारांत जागृती करण्याचा आदेश त्यांनी दिला. देशातील वीस राज्यांत भाजपची सत्ता असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. पण पश्चिम बंगाल आणि ओरिसा या राज्यांत भाजपची पूर्ण बहुमताने सत्ता आल्याशिवाय खरा सुवर्णकाळ येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात पुन्हा भाजपच्या नेतृत्त्वाखाली एनडीचे सरकार पुन्हा आल्यानंतर हा सुवर्णकाळ बहरेल, असा त्यांनी जाणीवपूर्वक उल्लेख केला.

प्रत्येक राज्याचे स्वतंत्रपणे नाव घेऊन तेथे भाजपची सत्ता आणण्याचे आवाहन करणाऱ्या शहा यांनी महाराष्ठ्रात मात्र भाजपच्या नेतृत्त्वाखाली एनडीएचे सरकार आणा, असा जाणीवपूर्वक सांगितल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवेसनेला राज्यसभेतील उपाध्यक्ष पद देण्याची चर्चा सध्या सुरू आहेच. एनडीएतील अनेक सहकारी पक्ष भाजपला सोडून जात असताना शिवसेनेशी पंगा न घेण्याचे धोरण भाजपने सध्या ठेवल्याचे या मेळाव्यातून अधोरेखित झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com