दोन बळी घेणाऱ्या कारचालकाला वाचवण्यासाठी भाजप नेत्याची मध्यस्थी? 

दोन बळी घेणाऱ्या कारचालकाला वाचवण्यासाठी भाजप नेत्याची मध्यस्थी? 

नवीन पनवेल : कामोठे शहरासह संपूर्ण नवी मुंबईला हादरून सोडणाऱ्या अपघात प्रकरणी पुन्हा एकदा पोलिस आणि राजकीय नेते हातात हात घालून आरोपीच्या बचावासाठी सरसावल्याचे दिसून आले आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास भरधाव कारने रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांसहीत दुचाकींना चिरडणाऱ्या हरविंदर हरभजन माथेरो हा 75 वर्षांचा आरोपी थेट पनवेलच्या लाईफ लाईन रुग्णालयात जाऊन भरती होण्यात यशस्वी झाला आहे.

पोलिसांनी अद्यापपर्यंत फक्त चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून निवांत बसण्याचे काम केले आहे. कामोठे वसाहतीत सेक्‍टर 6 मध्ये रविवारी (ता. 21) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास बेदरकारपणे गाडी चालवून दोघांचा बळी घेणाऱ्या स्कोडा कारच्या मालक रुगणालयात वातानुकुलित अतिदक्षता विभागात उपचार घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणी तो आरोपी जोपर्यंत रुग्णालयातून बाहेर येणार नाही, तोपर्यंत कामोठे पोलिस हतबल आहेत. दुपारच्या सुमारास त्या आरोपीला यातून सोडवण्यासाठी एक भाजपचा स्थानिक नेता पोलिसांकडे गेल्याचे सुत्रांकडून समजले आहे. 

अगदी तासभर चर्चा करून या प्रकरणाला कशी कलाटणी देता येईल, अशी खिचडी शिजल्याची चर्चा कामोठ्यात रंगली आहे. त्यामुळे आतापर्यंत पोलिसांना हरविंदरवर भा.द.वि 304 अ 279/337/338 /427 मोटर वाहन कायदा 184 /137 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात मोठे यश आले आहे. या अपघात प्रकरणी पोलिसांवर राजकीय दबाव नसल्याचे सोनावणे यांनी स्पष्ट केले. परंतू अपघातातील श्रद्धा जगताप या महिला कुठे उपचार घेत होत्या, याची कल्पनासुद्धा पोलिसांना नव्हती. श्रद्धा यांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले आहे. 
 कामोठे कार अपघात प्रकरणात कोणाचीही हयगय केली जाणार नाही. मग तो आरोपी असोत वा त्याला वाचवण्यासाठी सरसावलेले कोणीही असोत असा सज्जड दम वजा इशारा नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिला. रविवारी संध्याकाळी कार चालकाने भरधाव वेगात 2 जणांना चिरडून टाकल्यानंतर संबंधित कार चालकाला भाजप नेत्याच्या मध्यस्थीने पोलीस वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी बातमी `सकाळ`ने सोमवारच्या अंकात दिली होती. त्याचे पडसास आज पोलीस आयुक्तलयात उमटले.
 
पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या कार्यालयात सकाळी पार पडलेल्या बैठकीत कुमार यांनी कामोठे अपघात प्रकरणातील तपासाची माहिती जाणून घेतली. यावेळी `सकाळ`च्या बातमीचा हवाला देत परिमंडळ -2 च्या पोलीस अधिकाऱ्यांची झाडाझडती केली. या प्रकरणात आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा कशी होईल. या दिशेने तपास करण्याच्या सूचना कुमार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com