BJP Leader Ramesh Adaskar Became More Active After Defeat | Sarkarnama

रमेश आडसकर विधानसभेला पडले पण हरले नाहीत

दत्ता देशमुख
सोमवार, 9 मार्च 2020

फारशी तयारी नसतानाही ऐनवेळी उमेदवारी मिळाल्यानंतर रमेश आडसकर यांनी तगडी लढत देत लाखभर मते मिळविली. पराभवानंतरही ते माजलगाव मतदार संघात तळ ठोकून आहेत.

माजलगाव (जि. बीड) : भाजपचे रमेशराव आडसकर यांचा विधानसभा निवडणुकीत माजलगाव संघातून पराभव झाला. पराभव झाला असले तरी रमेश आडसकर हारले नाहीत. पराभवानंतर मतदार संघातील संपर्क त्यांनी तसुभरही कमी होऊ दिला नाही. सामान्यांच्या प्रश्नावर त्यांचा पाठपुरावा आणि वैयक्तीक कार्यक्रमांना हजेरी नित्याने सुरु आहे.

मागच्या वेळी माजलगाव मतदार संघातून भाजपचे आर. टी. देशमुख प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्याबद्दलची नाराजी आणि प्रकृतीच्या कारणामुळे ऐनवेळी त्यांची उमेदवारी काटून पंकजा मुंडे यांनी रमेश आडसकर यांना उमेदवारी दिली. परंतु, रमेश आडसकर यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यांची लढत राष्ट्रवादीचे तगडे नेते प्रकाश सोळंके यांच्यासोबत झाली. एकीकडे भाजपच्या तत्कालिन आमदारांबद्दल नाराजी, पक्षांतर्गत गट - तट या भाजपच्या उणिवा होत्या. त्यातच रमेश आडसकर देखील मतदार संघात नवखे असल्याने त्यांना मतदार संघातील भाजप नेत्यांचीच नाडी ओळखता आली नाही. 

प्रकाश सोळंकेंचा हा मतदार संघ बालेकिल्ला मानला जातो. त्यांचे वडिल सुंदरराव सोळंके यांनी रचलेला पाया आणि प्रकाश सोळंके यांनी तीन वेळा मतदार संघाचे केलेले प्रतिनिधित्व या जमेच्या बाजू. मतदार संघातच सहकारी साखर कारखाना आणि स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांवरही सोळंकेंचेचे वर्चस्व. प्रकाश सोळंके यांच्या या सर्व जमेच्या बाजू असतानाही रमेश आडसकर यांनी पंधरा दिवसांच्या तयारीत लाभखर मते मिळविली. परंतु, त्यांचा पराभव झाला. परंतु, पराभव झाला असला तरी रमेश आडसकर हरले नाहीत. निकालानंतरच्या पाच महिन्यांत त्यांनी मतदार संघाचा संपर्क तसुभरही तुटू दिला नाही.

मतदार संघातील लग्नसमारंभ, यात्रोत्सवांना रमेश आडसकर न चुकता हजर राहत आहेत. पक्षाच्या संघटात्मक निवडीतही त्यांनी लक्ष हटू दिले नाही. निवडणुकीनंतर नैसर्गीक आपत्तीत आडकलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कार्यालयांचे खेटे, कापूस विक्रीतील अडणींसाठी शेतकऱ्यांसोबत आंदोलनातही ते पुढे आहेत. त्यांनी संपर्कात खंड पडू न दिल्याने भाजप कार्यकर्त्यांमधील उत्साह कायम आहे. परका उमेदवार निवडणुक झाल्यानंतर फिरकणार नाही अशी टिका त्यांच्यावर निवडणुकीत झाली. परंतु, पराभवानंतर संपर्कात सातत्य ठेवून त्यांनी विरोधकांना कृतीतून उत्तर दिले आहे. पराभव म्हणजे हार नाही हे देखील त्यांनी दाखवून दिले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख