BJP Leader Ram Shinde Criticism on Congress Leader Rahul Gandhi | Sarkarnama

राहुल गांधी हे हायब्रीड व्हर्जन : राम शिंदेंची बोचरी टिका

दिलीप कांबळे
रविवार, 15 डिसेंबर 2019

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत माजी मंत्री व भाजप नेते प्रा. राम शिंदे यांनी गांधी यांच्यावर बोचरी टिका केली आहे. राहुल गांधी हायब्रीड व्हर्जन असल्याचे शिंदे आज पिंपरीत बोलताना म्हणाले. 

पिंपरी : राहुल गांधी हे हायब्रीड व्हर्जन आहेत. इंडो-इटलियन व्हर्जन असल्यामुळे त्यांना भारतीय संस्कृतीच माहिती नाही. त्यामुळेच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अशा पद्धतीने वक्तव्य केले असल्याची बोचरी टीका भाजप नेते राम शिंदे यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड शहर भाजपाच्या संघनात्मक निवडणुकीसाठी ते आज शहरात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

भाजप नेते राधाकृष्ण विखे यांच्या बद्दल असलेल्या आक्षेपांचा पुनरुच्चार करताना शिंदे म्हणाले, ''नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार येथील पराभूत उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आशिष शेलार आले होते. पाच पराभूत उमेदवार हे नगर जिल्ह्यातील होते. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपाममध्ये प्रवेश केल्यानंतर १२-० करु म्हणाले. पण तसे झाले नाही. पूर्वीचे चार आमदार पडले आणि आमदारांची संख्या तीनवर आली. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाला तोटा झाला आहे. त्या मतावर मी ठाम आहे. त्यांची ताकद, शक्ती भाजपच्या उपयोगी आली नाही. किंबहुना त्याचा दुरूपयोग झाला. पक्षाच्या विरोधात त्यांनी ती ताकद वापरली. पक्षाने आमचे म्हणणे ऐकून घेतले. कोअर कमिटीत त्यात विचार होईल व कारवाई होईल असा मला विश्वास आहे.''

पक्षांतर्गत नाराजीबाबत विचारले असता शिंदे म्हणाले, "मला वाटते याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकूण कोअर कमिटी व केंद्रीय नेतृत्वाने याची दखल घेतलेली आहे. आता सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले जात आहे. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर योग्य तो निर्णय होईल."

भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेबाबत केलेल्या वक्तव्याबाबत शिंदे म्हणाले, "आशिष शेलारांनी कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही. किंबहुना नागरी सुधारणा विधेयकाबाबत शिवसेनेने मूळ धोरणावर राहून जर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सहकार्य केले नाही तर भाजप त्यांना सहकार्य करेल, एवढेच शेलार यांचे म्हणणे होते व त्यावर ते ठाम आहेत आणि पक्षाचेही तसे मत आहे. 

सध्याच्या सरकारबाबत बोलताना शिंदे म्हणाले ''सरकार स्थापन होऊन सहा मंत्री झाले. पंधरा दिवस खातेवाटप करायला लागले. नंतर पुन्हा फेरबदल केले. आता अधिवेशनाला सामोरे जाताना कुणाचाच कुणाला मेळ लागणार नाही. हे तिघाडीचे सरकार राज्यात लोकशाहीचा घात करणार आहे. या सरकारकडून फारशा अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. हे तीन पक्ष फार काळ एकत्र टिकणार नाहीत."

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख